Wednesday, 27 September 2017

ऋण जया व्याज नाही

रात्रीचा दीड वाजलाय. लाईट बंद करून अंथरुणावर पडलो. डोळ्यात झोपेचं नामो निशाण नाही. झोप येईना म्हणून परत उठलो आणि खिडकी उघडली, मुसळधार पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज होता, तोही दिशाभूल करणारा ठरला. हवेत गारवा जरूर होता. परंतु मन बेचैन होतं. काहीतरी हरवलेलं शोधत होतं. वी.स. खांडेकरांचं सुखाचा शोध हे अर्ध राहिलेलं पुस्तक परत वाचायला घेतलं. खरं सांगायचं म्हणजे बायकोमुळेच मला वाचनाची गोडी लागली होती आणि ती मात्र दिवसभर काम करून बिचारी झोपी गेली होती. पुस्तक वाचता वाचता पेज नंबर 28 पानावर येवून पोहचलो. आणि एका वाक्यावर थांबलो. "काही केल्या मन पूर्वीसारखे स्थिर होईना, परंतु त्याचा तरी काय अपराध होता." हो खरं आहे. अचानक मन कोळशाचं इंजिन उलटया दिशेने धावतं तसं धावायला लागलं. उलटं धावतांना जरा जास्तच धूर सोडत होतं असं चित्र डोळ्यासमोर तरंगत होतं. धुळ्याच्या एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेजचा तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय असा पहिलाच दिवस होता. कॉलेजला जाण्यासाठी पॅन्ट शर्ट असा फुल ड्रेस माझ्याकडे नव्हता. सफेद विजार आणि पांढरा शर्ट घालून मी कॉलेजला गेलो. काही मुलं माझ्याकडे संशयित नजरेने बघत होती परंतु ते माझ्या लक्षात आले नाही. प्री डिग्री कॉमर्स ला प्रवेश घ्यायचा अजून बाकी होतं. माझ्याकडे पैसे पण नव्हते. आई शेतावर मजुरी करायची, बारा आणे दिवसाला रोजंदारी होती. कॉलेजच्या शोकेसेस मधल्या नोटिसा वाचून मधल्या सुटीचा वेळ घालवला खरा, परंतु प्रवेश घेण्यासंबंधी अनिश्चितता होती. नोटिसच्या खाली "प्राचार्य सही" या शब्दावर नजर खिळली. आपण प्राचार्य यांनाच अर्ज लिहून मोफत प्रवेश घेता येईल का असा विचार मनात चालून आला. मला कोणी मित्र ही नव्हते. अर्ज कसा लिहायचा तेही समजेना. शोकेसेस मधल्या नोटिसांचा मजकूर, मायना कशा पद्धतीने लिहिल्या आहेत ते ध्यानात आलं, आणि लगेचच एका कोऱ्या कागदावर अर्ज लिहून मोकळा केला. घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या फारच कमकुवत असल्यामुळे मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाची प्रवेश फी भरण्यास असमर्थ आहे, तेंव्हा मला एक रुपयात प्रवेश देण्यात यावा असं मी अर्जात आर्जव केली. माझा अर्ज वाचून प्रिन्सिपॉल साहेबांनी एक टक नजरेने मला नखशिखान्त न्याहाळले आणि शाईच्या पेनने एक रुपयावर सर्कल करून तीन रुपयात प्रवेश घेण्याची सवलत दिली. मला खूप आनंद झाला. प्रिन्सिपॉल साहेबांच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि प्री डिग्री कॉमर्सला रीतसर प्रवेश घेतला. वार्षिक परीक्षेची फी भरण्यासाठी पुअर बॉईज फंडातून 20 रुपयांची मदत देखील मिळाली. अश्या पद्धतीने माझ्या आयुष्याच्या प्रवासात संकटकालीन खिडकीतून खूप सहाय्य मिळालं. एस एस व्ही.पी.एस. कॉलेजच्या मागच्या बाजूला वीटाभट्टी नावांची वस्ती अजून आहे, तेथे आईने गबा परबत पाटील यांची ओळख काढून त्यांचीच खोली दहा रुपये महिना भाडयाने मिळवून दिली. कॉलेज मधील सर्व मुलं मुली इस्टमन कलर कपडे घालून येत असत. कोणी माझ्याकडे बघू नये म्हणून मी शेवटच्या बेंचवर बसत असे आणि सर्वांच्या उशिरा बाहेर पडत असे. दिवसामागून दिवस जात होते. पोळ्याला मी धमाणगांवी घरी आलो. माझे काका मराठी शिक्षक होते. त्यांचं नांव पंढरीनाथ. आम्ही सर्वजण त्यांना तात्या म्हणून हाक मारायचो. ते पण पोळ्यासाठी गांवी आले होते. मला त्यांनी कॉलेजच्या प्रवेशासंबंधी विचारपूस केली. ह्याच ड्रेसवर तू कॉलेजला जातोस का असं त्यांनी मला विचारलं. त्यांना काय वाटलं माहीत नाही. त्यांनी घरातल्या शेवटच्या अंधारकिर्द कोठडीतून जुना टरंग (पेटी) काढून आणली. त्यांचा लग्नाचा सूट त्याच्यात होता. त्यांचं लग्न झाल्यापासून त्यांनी जपून ठेवला होता. त्यांनी त्यांच्यातली सफेद रंगाची पॅन्ट काढून माझ्या हातात सुपूर्द केली. जणू काय ती याच क्षणाची वाट बघत होती. मला प्रचंड आनंद झाला. काकांनी दिलेली पॅन्ट घेऊन मी पळतच घरी आलो. पॅन्ट घालून बघितल्यावर समजलं ती सर्वांगाने मोठी म्हणजे सैल होत होती. धुळ्याला वीटभट्टी वस्तीच्या नाल्यापलीकडे एक मुसलमान वस्ती आहे. तेथे एक गरीब मुसलमान टेलरिंगचं काम करीत असे. माझ्या मापाची बनविण्यासाठी मी त्याच्याकडे ही पॅन्ट घेवून गेलो. त्याने, बिचाऱ्याने रात्रीतून ही पॅन्ट उसवून माझ्या मापाची बनवून दिली. मजुरी 20 रुपये झाली होती. परंतु त्याने माझ्याकडून त्यावेळेस पैसे मागितले नाहीत आणि सांगितले की तुझ्याकडे येतील तेंव्हा दे. त्याच्यानंतर मी त्याला बऱ्याच वेळा भेटलो देखील परंतु मी त्याला पैसे दिले नाहीत. काकांनी दिलेली पॅन्ट मी सलग दोन वर्षे वापरली. हळू हळू आयुष्य आकार घेत होतं. माझं ग्रॅज्युएशन झाल्या नंतर मला त्याच एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेज मध्ये क्लार्क नोकरीची संधी चालून आली, परंतु मी पुणे येथे जाणे पसंत केले. मी सुरुवातीला पुणे आणि नंतर मुंबई येथे स्थिर स्थावर झालो. चांगल्या एम.एन.सी. कंपनीत नोकरी मिळाली. पस्तीस वर्षे नोकरी करून वयाच्या साठाव्या वर्षी रिटायर झालो. हवेश्या वाटणाऱ्या वाटेवरून वाटचाल मला करता आली नसेल हे मान्य, परंतु आयुष्यात आलेलं प्रत्येक वळण आपलंसं करून घेतलं तर जगणं सोपं होतं हे कळलं. परंतु तेथे कर माझे जुळती या माझ्या किशोर वयातल्या त्या अनमोल स्मृती मला अजून अस्वस्थ करतात. रात्रीच्या प्रहरी भिंतीवरच्या कॅलेंडरची पाने जेंव्हा फडफडू लागतात, तेंव्हा ती पाने माझ्याशी हितगुज करतात. मला आठवण करून देतात. त्या टेलरचं ते वीस रुपयाचं अनमोल ओझं अजून मी माझ्या माझ्या मनाच्या तिजोरीत सांभाळून ठेवलं आहे. मी जर त्याला ते वीस रुपये वापस करण्याचा प्रयत्न केला तर तो एक माझा अपराधच ठरेल. मी त्याचा अपमान करतो आहे असा अर्थ होईल. कॅलेंडर वरून खिडकीच्या बाहेरील काळ्याकुट्ट अंधाराकडे जेंव्हा मी बघतो तेंव्हा, प्रिन्सिपॉल साहेब अजून माझ्या अर्जावर शाईच्या पेनने सर्कल करत आहेत आणि विचारताहेत अजून किती दिवस तुम्ही सवलत मागणार आहात. एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेजच्या पाठीमागील बाजूस विटाभट्टी वस्तीत मिळालेल्या रूमच्या मालकाने सुरुवातीचा पहिला महीना सोडून चार वर्षात माझ्याकडून कधीही भाडं मागितलं नाही. ते ऋण उराशी बाळगून आयुष्यभर वाटचाल करीत राहिलो. अकौंटंन्सी या विषयाची प्रायव्हेट टीचेरने कधीही ट्यूशन फी मागितली नाही. उलट त्यांच्या चार्टर्ड अकाउंट्स फर्म मध्ये पन्नास रुपये महिना पगार देवून मला हिशेब तपासणीचे काम मिळाले. हे सर्व अनमोल ऋण माझ्या आयुष्यातले महत्वाचे अविभाज्य घटक आहेत आणि ते मी माझ्या स्मृतीत अजून जपून ठेवले आहेत. तेच तर माझ्या आयुष्यातले अनमोल रत्न आहेत.
S.S.V.P.S Arts, Commerce & Scienc College Dhule

No comments:

Post a Comment