Wednesday, 4 March 2020

शीतचंद्रलोकच्या कट्ट्यावर उलगडणार महिला दिनाचं पहिलं पुष्प

गाईच्या शेणाने अंगणात सुंदर सडा टाकला जाणार आणि रांगोळी सुद्धा छान काढली जाणार, तरी सुद्धा त्या दिवसाचा कार्यक्रम कसा असेल! छोट्याशा तृणपात्यांवर असंख्य दवबिंदू साचलेले आपण पाहिले असतील परंतु नितळ
कांती असलेल्या कमळाच्या लालसर लुसलुशीत पाकळ्यांवर पाण्याचे थेंब का साचत नाहीत याचं रहस्य त्या दिवशी उलगडले जाणार आणि शीतचंद्रलोकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

आयुष्यात आपल्या पत्नीचं योगदान आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतं हे कोणताही पुरुष मनोमनी  स्वीकारत नाही. मग आपली पत्नी आपल्यापेक्षा कितीतरी पटीने बुद्धिमान आहे अशी थट्टा जर कोणी केली तरी त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. तरी सुद्धा महिला दिनची सुट्टी एन्जॉय करायला पुरुष मंडळींना मोह मात्र आवरता येत नाही. "आपली बायको माहेरी कधी जाईल आणि आपल्याला हवे तसे उकिरडे कसे फुंकता येतील अशी चातका प्रमाणे वाट बघणारा नवरा हा काळाच्या पडद्याआड जमा झाला आहे. हे एकविसाव्ये शतक चालू आहे आणि याच शतकात शीतचंद्रलोकने आपले अनोखे पण जपले आहे. शीतचंद्रलोक नगरीची बातच न्यारी आहे. येथली संस्कृतीच वेगळी, येथे दिवाळी पहाट साजरी केली जाते, तर येथे कोजागिरी पौर्णिमेचा आनंद लुटला जातो, कला मंचावर येथील कलाकारांची कला जोपासली जावून त्याच कौतुक केलं जातं. वार्षिक सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने येथे तीन ते चार दिवस भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन केले जाते. येथील मुले मुली आपली कला सादर करून, हेच पंख घेऊनच ते बाहेरच्या जगात भरारी घेतात. आमच्या शीतचंद्रलोक सोसायटीत कला ही रुजवली गेली आणि ती नसा नसातून भिनली. कुंभाराच्या चाकावर रुळणाऱ्या मातीला लवचिक पणा येतो तसा आदर्श निर्माण झाला. त्याच्यामागे आपल्या सोसायटीत एक अदृश्य झरा वाहतो. त्याची ओल आतपर्यंत झिरपते. नविन पणाच्या नवीन विचारांच्या बिया रुजतात. असाच एक विचार येथील वरिष्ठांच्या संकल्पनेतून दरवळला आणि तो प्रत्यक्षात आणायचं धनुष्य उचललं गेलं. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, शीतचंद्रलोकच्या रौप्यमहोत्सव वर्षी शीतचंद्रलोक सख्यांचा सन्मान करण्याच एक नवी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मनात लिहिण्याचे तरंग तर भरपूर निर्माण झाले आहेत, लेखणीला सुद्धा कागदावर चिरभडायला खूप उत आला होता! परंतु शीतचंद्रलोक सोसायटीत ताजे गुलाब फुलतात कसे याचं रहस्य मात्र त्याच दिवशी उलगडले जाणार आहे. हे पुष्प ही तेवढेच सुंदर आणि देखणे असेल.


No comments:

Post a Comment