Friday, 20 March 2020

जामर

कोरोना बद्दल आतापर्यंत कितीतरी अगणिक पाल्हाळ जोक्स व्हाट्सअप वर ओतले गेले आहेत, आणि ते वाचून आपण गालातल्या गालात स्वतःवर हसत राहतो. एक बाजूला कोरोना मरिजचं आयुष्याचं काऊंट डाऊन चालू आहे आणि आपल्यातले काही लोक निराराळे प्रकारचे विनोद सप्लाय करण्यात मशगुल आहेत. ही तर आपल्या सृजनशीलतेची दिवाळखोरीच आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागते. रोज हजारो ट्रक्स भरतील एवढे वाढ दिवसांचे केक्स व्हाट्सअप्प आणि फेसबुक वर पाठविले जातात. असे ई केक भरवण्यासाठी जणू स्पर्धा चालू असते. असे अन प्रॉडक्टिव्ह मेसेजेस पाठविण्यासाठी आपल्या जवळ भरमसाठ वेळ आहे आणि एवढा वेळ असून आपल्याला एकमेकांशी बोलायला वेळ नाही. अशी बरीच उदाहरणे फेसबूक आणि व्हाट्सअप्प संदर्भात देता येतील. व्हाट्सअप्प आणि फेसबुक वरून दसऱ्याच्या दिवशी ई-आपट्याच्या झाडाची पाने भरमसाठ पाठविली जातात, मकर संक्रातीला तर याचं रेकॉर्ड ब्रेक होतं, तिळगुळाचे छायाचित्रांचे एवढे लाडू पाठविले जातात अनु तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला चे मेसेजेस वाचून भारतातील कुटुंबे किती गुण्यागोविंदाने नांदत असतील असं वाटल्या शिवाय राहत नाही, परंतु हा भ्रमाचा भोपळा दुसऱ्या दिवशी लगेच फुटतो. दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पाण्याच्या नळावर कश्या एकमेकांच्या झिंज्या धरतात ते बघा. नवीन वर्ष सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो असे मेसेजेस तर हंडीभर पाठविली जातात, पण दुसऱ्या दिवशी हीच माणसे कुस्ती खेळायला मोकळे असतात. टाईम आला तर एकमेकांवर कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. स्वर्गवासी झालेल्या माणसाला अग्नी दिल्याबरोबर त्याच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहायला सांगितले जाते खरे परंतु तेरा ते चौदा सेकंदाच्या आत सर्वांची समाधी तुटते, कारण स्मशानात गेलेला कधी वापस येणार नाही हे चांगलं आपल्याला माहीत असतं. व्हाट्सअप्पवर मात्र शोक संदेश एकामागून एक ढिगाऱ्याने पाठविले जातात. तिरडीच्या बांबूंना काय त्याचे सुख दुःख, त्याने त्याचे काम चोख केलेले असते.

देशपातळीवर पंतप्रधान आणि त्यांची टीम कोरोना व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. परंतु आमचे राजकीय विरोधक पंतप्रधानांवर टिका करण्यासाठी नवनवीन आरोप करण्यात व्यस्त आहेत. काही राजपुत्र नेते म्हणतात पंतप्रधानां कोरोनाबद्दल काहीच माहिती नाही आणि देशाला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. पण त्याच्यावर उपाय काय असे लाडके नेत्यांना विचारले असता त्यांना काहीच सांगता पण येत नाही. लोकांमध्ये भ्रम पैदा करण्याचा वसा यांनीच घेतलेला असतो. हत्यार स्वतःजवळ बाळगणे भले कायद्याने गुन्हा असेल परंतु तोंडाच्या शस्त्राचं काय. चांगले नावाजलेले लोक आपला तोंडाच्या तोफखाना दिवसभर चालवत असतात. मीडिया एव्हढा आगलावू कारखाना आहे की, त्यांना त्यामुळे चांगले आयते आणि फुकटचे खाद्यच मिळते परंतु तोंडाचे तोफखाने चालवणाऱ्यांना ऊर्जा कुठून मिळते हे एक खुद परमेश्वराला पडलेले कोडे असावे. लांब कशाला जाता, जो नाही तो आजकाल उठसूठ पंतप्रधान असलेल्या व्यक्तीला नाही तशा शिव्या देण्याची विकृती या लोकांनी अंगिकारली आहे. वृत्तपत्रे तर या गोष्टीचा धिक्कार सुद्धा करतांना दिसत नाहीत. काही हेकेखोर मंडळी आपली सर्जनशीलता गुंडाळून उगीच मैदानात उतरतात आणि एकदाचा आखाडा सुरू झाला तर मीडियाला बघायलाच नको, कारण मिडियाने सर्व जगाचा प्रसूतिगृहाचा मक्ताच घेतलेला असतो. मग टीव्हीवर आग न लावता गवताच्या गंज्या कशा जळत असतात हे आपण रोज पाहतो. आरोप प्रत्यारोप करून एकमेकांच्या अंगार कडकडीत तेल ओतत असतात.

अजून पर्यंत तरी संवेदनशीलता तरी अभादित होती, परंतु आता ती अदृश्य होत चालली आहे आणि सर्जनसजीलता ही तर तिच्या पाठीवरच आरूढ होवून तिला पण ही दुनियादारी झेपत नाही. वि.स. खांडेकरा म्हणतात प्रातःकाल आणि संध्याकाळचं वर्ण करतांना कवी लेखकांनी तर त्यांना देव्हाऱ्यात बसविले आहेत, दुपारचं वर्णन करतांना जणू त्यांना खरोखरच चटके बसतात. निसर्गाने मऊ गवत, फुले वेली निर्माण केल्या तसे मोठमोठे दगड धोंडे, दऱ्या, समुद्र आणि उंच उंच पहाड देखिल निर्माण केलेत. एव्हढी क्रूरता निर्माण केल्यानंतर त्याने सुंदर जलधारा, फ्लॉवर व्हॅली सुद्धा निर्माण केल्या. एव्हढं सुंदर विश्व निर्माण केल्या नंतर ही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी तोंडाने अणुचाचण्या घेत बसते. इंटरनेटला काही संवेदनशील ठिकाणी जामर लावले जाते असे ऐकले आहे परंतु या सर्व गोष्टींना जामर लावण्याची आपल्याकडे कायदा तयार झाला नाही अजून.

No comments:

Post a Comment