Tuesday 27 June 2017

आई सध्या राहते कुठे

ठाऊक नाही मज काही !
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?

मधुसूदन कालेलंकरांच्या या काव्यात आई विना बालकाच्या हृदय पिळून टाकणाऱ्या वेदना बघून मन हेलावले. जेंव्हा छोटे छोटे चिमुकले गोजिरवाणे पैंजणाचे पाय आईकडे धावत येतात आणि त्या पायातली चंचलता आणि कोमलता तिला वेलीसारखी बिलगते तेंव्हा जगातली सर्व महान काव्ये गळून सुकलेल्या फुलांसारखी निपचीत पडतात. विश्वाची निर्मिती केल्यानंतर परमेश्वराने ही कोमलता तिच्या पदरात टाकण्याची त्याला इच्छा झाली असेल, सरळ मागे त्रेयांशी वर्षांपूर्वीच साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात श्यामची आई हे अनमोल संस्कारांनी ओथंबलेलं पुस्तक लिहून आईचं महती सांगणारं दैवत, जगाच्या पाठीवर घराघरात पोहोचलं. तरी वेदना देणारी, घायाळ करणारी,  मातृ प्रेमासाठी व्याकुळ झालेला अजून कोणी तरी, 

आई म्हणोनी कोणी 
आईस हाक मारी
ती हाक येइ कानी
मज होय शोककारी
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

हे कवी  यशवंत यांनी लिहलेलं काव्य काळजाचा ठाव घेते. आई या दोन अक्षरात जगातली सारी महाकाव्ये सामावलेली असली तरी सर्व विश्वाचा पसारा उलगडून आई बद्दलचे लिखाण आणि विचार अजून चालूच आहेत. तरी सुद्धा आई सध्या राहते कुठे, असा काळजी वाटणारा दुर्मिळ प्रश्न जेंव्हा विचारला जातो तेंव्हा विचारणाऱ्याला दोन हात नक्कीच जोडावेसे वाटतात. परंतु हाथ न जोडता सरळ अहंकाराची पुसटशी छाया असलेलं भरकटलेलं उत्तर मिळतं, "ती माझ्याकडे राहते". हे उत्तर चुकीचं नाही, पण पाण्यात पडलेल्या निराधार सावलीचाही त्याने आधार घेतलेला असतो. कधी कधी ही निराधार सावली वृद्धाश्रमाच्या अंगणा पर्यंत पोहचते. तेंव्हा त्या सावलीला किती वेदना होत असतील.

परंतु ही कथा येथेच पूर्णविराम घेत नाही. अशाच आशयाची कथा साधारण 2005 साली सकाळ वर्तमान पत्रात छापून आली होती. ते सकाळचे कात्रण मोरपीस म्हणून अजून पर्यंत हुदयाशी जपून ठेवलेलं होतं, ते खाली नमूद करीत आहे.



डॉ.स.वि. सरदेसाई यांचे वडील व लालचंद हिराचंद हे डेक्कन कॉलेज मधील सहाध्यायी (मित्र) होते. डॉ. सरदेसाईंचे वडील निवर्तल्यानंतर काही दिवसांनी डॉ. सरदेसाई व लालचंदजी यांची भेट झाली. लालचंदजींनी त्यांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली. आणि विचारलं, "आई तुझ्याकडेच राहते का ?
"नाही"
"तुझ्या भावाकडे राहते का ती"
"नाही"
आता लालचंदजी अचंबित झाले. आपली मित्राची पत्नी, मुलाकडे राहत नसेल तर कुठे राहत असेल, असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला. त्यांनी तसे विचारलेही.
"अरे मग ती असते तरी कुठे ?"
डॉ. सरदेसाई शांत स्वरात नम्रपणे उत्तरले.
"ती तिच्या घरीच राहते, मी तिच्याकडे राहतो. आईने माझ्याकडे राहावे इतका मी मोठा झालेलो नाही."

आईचे घरातील मानाचे स्थान दर्शविणाऱ्या या उत्तराने लालचंदजीही आनंदीत झालेत. पुण्याच्या वि.स. खांडेकर चौकातील घर डॉ. सरदेसाई यांनी विकत घेतल्याचे लालचंदजींना माहीत होते. त्यामुळे फिरकी घ्यावी म्हणून त्यांनी विचारले.

"अरे हे घर तुझे आहे ना"
डॉ. सरदेसाई उत्तरले. "नाही, माझे फक्त पैसे होते, घर आईचेच आहे."

No comments:

Post a Comment