Friday 13 March 2020

आणि शीतचंद्रलोकच्या कट्ट्यावर उलगडलं होतं महिला दिनाचं पहिलं पुष्प


०८ मार्च २०२०

आज सकाळी निरव शांततेत कोकिळेचा मधुर आवाज कानावर पडला, एक शुभ संकेताने दिवसाची सुरुवात झाली होती. आंब्याच्या झाडाला मोहोर यावा त्याप्रमाणे शीतचंद्रलोक  सोसायटीतील वातावरणाला विशेष बहर आला होता. आठ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून शीतचंद्रलोक सख्यांचा मनःपूर्वक सन्मानाची जय्यत तयारी सुरू झाली होती. असंख्य तारकांमध्ये शुक्राची चांदणी उठून दिसावी त्या प्रमाणे एबीपी माझाच्या प्रमुख अँकर ज्ञानदा कदम ह्या महिला दिनी शीतचंद्रलोक सख्यांच्या वलयामध्ये सामील झाल्यात.

वि.स. खांडेकर म्हणतात, "नभोमंडपात अगणिक तारका चमकत असतांना शुक्राची चांदणी ओळखायला ज्योतिष शास्राचे ज्ञान कशाला हवे" साहित्यिकाच्या सृजनशीलतेच्या  उक्तीप्रमाणे शीतचंद्रलोक पुरुषांच्या सर्जनशीलतेला एक नवीन पालवी फुटली आणि तिथेच एक "शीतचंद्रलोकच्या सख्यांना मानाचा मुजरा" असं सुंदर काव्य निर्माण झाले.

परंतु दोन किनाऱ्याच्या सहवासात वाहत असलेल्या नदीला कुठे ठाऊक होते की, तिची मंजिल कुठे आहे ! म्हणून कोणत्याही गोष्टीचा गाजावाजा न करता श्रीयुत कांडके आणि श्रीयुत पोंक्षे यांच्या टीमने शीतचंद्रलोक च्या तमाम स्त्रीवर्गाला मानाचा मुजरा करून त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या आश्चर्याची पाळेमुळे रुजली गेली होती त्या भरीत भाकरीच्या पार्टीतून. वांग्याचं भरीत आणि  हिरव्या मिरचीच्या ठेच्याची चव चाखतां चाखतां  कांडके सरांच्या संकल्पनेतून एक रत्न बाहेर पडलं की, आपणही खडकावर जल विहिर खोदू शकतो. सहकाऱ्यांनी एकमतांने सहमती दर्शविल्यावर शीतचंद्रलोकच्या भव्य प्रांगणात सर्व सख्यांसामोर छोटीसी औपचारिक घोषणा करण्यात आली की एक दिवस तुमच्या साठी.

बस, खलबते सुरू झाली, लखोटे व्हाट्सएपच्या माध्यमातून इकडून तिकडे ट्रान्सफर होऊ लागले, गुप्त मिटींग्ज आणि बैठका होऊ लागल्यात, मॅनेजमेंट हे एक सिक्रेटच होतं. ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो, प्रत्यक्षात तो दिवस उजाडला, शीतचंद्रलोकच्या गेटवर शीतचंद्रलोक सख्यांचा सन्मान असे होर्डिंग्ज लावण्यात आले , गेटवरचा वृक्ष जसा कटेवरी हात, युगे अठ्ठावीस उभा या घटनेला साक्ष देत होता. गेटवर रांगोळी काढण्यात आली होती, गेटपासून ते रंगमंच पर्यंत लाल कार्पेट अंथरण्यात आले होते. रस्त्याच्या बाजूला सुशोभित कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या, शार्प संध्याकाळी सात वाजता शीतचंद्रलोक सख्यां नटून, लाल किरमिजी रंगाचे फेटे आणि "स्त्री कर्तुत्वाला मानाचा मुजरा" असा बॅज परिधान करून गेटवर एकत्र जमल्यात. आणि तेवढ्यात त्या शुक्राच्या चांदणीचे म्हणजे ज्ञानदा कदम यांचे आगमन झाले. त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शीतचंद्रलोकच्या सख्यांसमवेत त्यांना मानापानाने झान्झ पथक आणि लेजिमच्या गजरात वाजत गाजत भव्य रंगमंचकाकडे त्यांना पाचारण करण्यात आले. दिप प्रज्वललाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कांडके साहेबांचं अँकरिंगचं पहिलं पुष्प शीतचंद्रलोकच्या मंचावर झळकत होतं. त्यांचं प्रेझेन्टेशन आणि  त्यांना लाभलेला भारदस्त आवाज यात कमालीचा आत्मविश्वास दिसून आला.

मावळलीस जर कधी तू, विनाश इथला निश्चित आहे              ब्रह्मांडालाही उजळणारी तू परमेश्वराचं रूप आहे.

रंगमंचकावर खुर्च्यांची संख्या अठ्ठावीस तर सख्यांची संख्या पन्नास आणि प्रत्येक सखीला ज्ञानदा कदम समवेत बसण्याचं सौभाग्य मिळालं कसं आणि तेही कसलीही चलबिचल न होता!  याचं गणित, हा प्रोटोकॉल  मंत्र्यांच्या शपतविधीपेक्षा अवर्णनीय होता असं म्हणण्याचं कारण म्हणजे, जागेची क्षमता, बजेट, मॅनेजमेंट, सुविधा  या सर्व बाबी लक्षात घेता टीम लीडर आणि टीम मेंबर्सची ही चाणक्य नीतीचा कुशल नमुना होता.

यश, हर्ष, आर्यन आणि ऋषी यांनी अतिथीचं स्वागतम या गितवर नृत्य सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, श्री कांडके यांनी निरनिराळ्या क्षेत्रातील स्त्री कर्तृत्वाची महती सांगताना झाशीची राणी ते इंदिरा गांधीपर्यंत यांनी केलेल्या आपल्या कर्तृत्वाचा महिमा वर्णिला, पृथ्वी प्रदक्षिणा करावी त्याप्रमाणे कांडकें साहेबांच्या निवेदनाला धार चढत होती. त्यांच्या आवाजातील प्रगल्भताने आसमंत उजळून निघाला. ज्ञानदा कदम यांना प्रतितात्मक मानचिन्ह देण्यात आले. नंतर त्यांच्या हस्ते सर्व महिलांना छोटीसी भेट वस्तू देण्यात आली, ही शीतचंद्रलोक पुरुषांची मानवंदना होती.

श्रीयुत कांडके यांनी  ज्ञानदा कदम यांचा अल्पसा परिचय करून त्यांच्या कर्तुत्वाला सलामी दिली. घरातील सर्व मंडळींची इच्छा होती की ज्ञानदाने शिक्षिका व्हावं, पण नियतीला वेगळंच मान्य होतं, ज्ञानदाने जर्नालिजम क्षेत्रात उतरून, एबीपी माझा या वाहिनीने त्यांच्यासाठी दरवाजे उघडे करून दिलेत. त्यांच्या छोटेखानी भाषणात त्या आपलं मत प्रांजलपणाने व्यक्त करतात की,  मोठमोठया संस्थेत, शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस मध्ये कार्यक्रमांसाठी गेलेले आहे, परंतु येथील नियोजन हे अप्रतिम आणि सर्वोत्तम आहे. हा कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी सरप्राईज होता हे जेंव्हा त्यांना कळलं तेंव्हा त्यांनी आश्चर्याचं कौतुक केलं. पुरुष वर्गाने कोणतीही गोष्टीची चाहूल न लागू देता एवढा मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करणं हे नक्कीच सोपी गोष्ट नव्हती अशी त्यांनी समस्त मंडळींना जाण करून दिली, पुढे त्या म्हणाल्या की, मी शीतचंद्रलोक सोसायटीबद्दल खूप काही ऐकले आहे,  तुम्ही हा एकच कार्यक्रम नव्हे तर वर्षभरातून अनेक असे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करतात , याचं त्यांनी मोठ्या मनाने तोंड भरून कौतुक केलं. सोसायटीत हेवेदावे, चुगली,चिमटे, हमरी तुमरी असे असंख्य वादविवाद असतांत, या सर्वांना छेद देवून तुम्ही मंडळी एवढ्या एकोप्याने आणि पॉझिटिव्ह एनर्जीने राहतात ही फार भारी गोष्ट आहे, तुमची वास्तू खूप चांगली आहे आणि तुमच्या वास्तूत चंद्र आहे साक्षीला असे गौरवोद्गार काढून त्यांनी उभयंतांची मने जिंकलीत. शुक्राच्या चांदणीला कार्यक्रमातून चंद्राचा निरोप घेतांना खूप गहिवरून आले होते. निरोप घ्यायच्या अगोदर, पाहुणी कलाकार नेहाने ज्ञानदा कदम यांच्यासमोर साताऱ्याचे गुलछडी मला रोखून पाहू नका या गाण्यावर अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं नृत्य केलं.

राहुल डिंगळे यांनी झेंड्याचं नाचवणं अतिशय सुंदर केलं होतं आणि जयूने त्यांना आवेशपूर्ण आणि जोशात साद दिली त्यामुळे या कार्यक्रमाला वेगळीच चकाकणारी किनार लाभली. ज्ञानदा कदम सुद्धा सरप्राईज झाल्यात. राहुल आणि जयूचं कौतुक करण्यासाठी रायगडावर पौर्णिमेच्या रात्रीची निवड करून त्यांचा चंद्रप्रकाशात गौरव केला पाहिजे.

रंगमंच फुलांनी नव्हे तर चंद्रलोक सख्यांनी नटला होता, कार्यक्रमाने प्रत्यक्षात अशी काही उंची गाठली होती की, नदीला आपल्या भावना व्यक्त करताना तिचा उर दाटून आला, तिच्या भावनांना आवर घालणे तिला जमले नाही, कधी कधी तिचे शब्द तुटत होते तर कधी तिच्या शब्दांना धार चढत होती, कोणी शब्दातून व्यथा मांडली तर कोणी कवितेतून पुरुष वर्गाने केलेल्या कृतीचा गौरव केला. ती इथेही कमी पडली नाही. तिच्या डोळ्यातले अश्रूंना ती थांबवू शकली नाही. पोडीयामला सुद्धा गहिवरून आले.

मला माहेरी करमत नाही

दक्षा गिरकर आपल्या मनोगत व्यक्त करताना  म्हणाल्यात की स्त्री चं एवढं स्वागत आणि कौतुक होत असेल तर आम्हाला माहेर ची आठवण येणारच नाही, पुरुष वर्ग स्त्रीचा एवढा सन्मान करेल असं आम्हाला स्वप्नात देखीलही वाटलं नव्हतं. या सन्मान सोहळाची त्यांनी जी तयारी केली ते सर्वं सस्पेन्स ठेवण्यात आलं होतं, त्यांना स्वतःला सर्व काही माहीत होतं, परंतु घरात ते सांगायचं नव्हतं, स्त्री बिचारी सर्व काही सांगून मोकळी होते, तिच्या पोटात काहीच राहत नाही. दक्षा मॅडम बोलता बोलता सुर्यप्रकाशा इतके अतिशय सत्य सांगून गेल्या. एकीकडे पुरुष आपली गुपितं कोणालाही कळू नये म्हणून अहोरात्र खबरदारी घेत असतो. तर स्रिया आपल्या पोटातील गुपित केंव्हा बाहेर काढू आणि दुसरीला कधी सांगू यासाठी त्यांच्यात स्पर्धा लागलेली असते. दूर कशाला जाता ! साधारण पाच सहा वर्षपूर्वीची घटना असेल.  सौ चव्हाण परगावी म्हणजे पुण्याला गेली होती. घरात मला सर्वच गोष्टी स्वतःलाच करत लागत असल्यामुळे खूप उशीर झाला आणि त्या दिवशी मी ऑफिसला जाण्याचे टाळून दिवसभर घरीच राहिलो. साहजिकच मी घराची खिडकी उघडीच ठेवली आणि त्याच वेळेस शोभा गावडे बाहेरून सोसायटीत शिरल्या असाव्यात. खिडकी उघडी बघून त्यांनी कयास काढला की, सौ चव्हाण पुण्यावरून घरी आलेल्या दिसतात, म्हणून त्यांनी लगेच सौ चव्हाणांना फोन केला आणि विचारले की, काहो, केंव्हा आलात पुण्यावरून ।  बस, तेवढ्यात माझ्या मोबाईलची कर्कश रिंग वाजून बायकोने झापायला सुरुवात केली, तिकडून खाडकन आवाज आला "काहो, आज ऑफीसला दांडी का? मी उद्गारलो, "हॅलो तूच बोलते आहेस ना" ! तिकडून आवाज, हो मीच बोलते आहे!". क्षणभर मी अवाक झालो आणि मनातल्या मनात विचार केला की बायकांना आपल्या गोष्टी कशा काय माहीत पडतात, आश्चर्यच आहे" स्त्रीच्या पोटात कोणतीही गोष्ट थांबत नसल्यामुळे असल्या आश्चर्याना कधी कधी सामोरे जावे लागते ! परंतु यांच्यातच खरी जगण्याची मजा असते.

सौ शोभा गावडे यांची विलोभनीय कविता

माझी शीतचंद्रलोक इतर जगापेक्षा वेगळा कसा याचं वर्णन करतांना भारावलेल्या सौ गावडे म्हणतात, मी चंद्रावर न जाता चंद्र ही पाहिला आहे, आणि चंद्रावरचे गोड लोक ही पाहिले आहेत. शीतचंद्रलोक सख्यांचा भव्य दिव्य सन्मान सोहळाचा वर्णन करतांना, कौतुक करावं का आभार मानावेत हेच त्यांना कळत नव्हते. मी त्यांची ऋणी राहीन आणि मला त्यांच्या ऋणात राहायला आवडेल. कौतुकाच्या भरात त्यांनी एटीम कार्ड च देऊन टाकलं. किती भोळी भाबडी असते ना स्त्री, गावडे मॅडम सॅल्युट तुम्हाला.

हो आवडेल मला त्याच्या छत्र छायेत राहायला                      हो आवडेल मला त्याला माझं एटीएम द्यायला                        हो आवडेल मला त्याच्या रंगात रंगायला

किती सुरेख आणि गोड हा त्यांचा भाबडेपणा

नल्ली आजी- घरातल्या पुरुषाने घरातली कुठलीही स्त्रीची कामे करतांना मला शोधून आजपर्यंत सापडली नाहीत, परंतु शीतचंद्रलोक ने केलेला सन्मान बघून त्यांचा सर्व रोष आज शांत झाला. आज मिळालेलं अप्रतिम, अविश्वसनीय सरप्राईज बघून त्या धन्य झाल्यात. आज्जी आज्जी मला एक गोष्ट सांगना! त्याचे हट्ट पुरवतांना आजीचे असे प्रेमळ रूप आपण अनेकदा पाहिले असेल, परंतु त्याच आज्जीनी आज चक्क स्त्रीच्या मनातली व्यथा दर्शविणारी कविताच सादर केली. आहेना कमाल या मंचाची !  "आई काय असते एकदा जाणून तरी बघ" ही त्यांच्या मनातील खंत कवितेच्या रूपाने उन्मळून पडली.

सौ गौरी गोठीवरेकर

सौ गौरी गोठीवरेकर यांनी, पुरुष वर्गाने केलेल्या स्त्री सन्मानाबद्दल कृतार्थेच्या भावनेला त्यांनी प्रथम प्रणाम केला. संपूर्ण कार्यक्रमाचा समाचार घेतांना, रांगोळी, झान्झ पथक, पाणी पुरी, भेट वस्तू, सिलेब्रिटी ज्ञानदा कदम यांच्या उपस्थितीत चंद्रलोक सख्यांचा सन्मान सोहळा,  आणि विशेष म्हणजे रेड कार्पेटवरून सख्यांना सन्मानाने मंचपर्यंत नेण्यात आले, या कौतुकाने त्या अक्षरशः भारावून गेल्यात, कुठलाही थांगपत्ता लागू न देता अचानक दारावर मिळालेलं आमंत्रण बघून त्या सरप्राईज झाल्यात, काही माहीत नसतांना काय बोलायचं, कोणत्या विषयावर बोलायचं ! जणू काय सगळीकडे त्यांना उद्गारवाचक  चिन्ह दिसत होते. कठीण ऋतुचक्रातून सहीसलामत बाहेर पडलेल्या शीतचंद्रलोकला रेशीम धाग्याने गुंफताना, कांडके सरांचं कौतुक करायला त्या विसरल्या नाहीत. मोतीयोंको तो बिखर जानेकीं आदत है, लेकीन धागेकी जिद थी की ओ सबको पिरोये रखता है।  ज्यांनी स्वयंपाक घरात पाय ठेवला नाही अश्या लोकांची पोंक्षे साहेबांनी मोट बांधून दिवसभर स्वतःला स्वयंपाकात झोकून देणे आणि इडलीच्या भांड्यातून कोथिंबीर वड्या सारं काही अफलातून केल्यामुळे त्यांनी श्रीयुत पोंक्षे साहेबांना मनापासून सॅल्युट केला. स्त्री जन्मा या काव्यातून त्यांनी आपल्या माहेरच्या नात्यांची शिकवण स्निग्धपणे मांडली

आजी म्हणायची उपास तापास कर, पूजा पाठ कर सासर चांगलं मिळेल
आजोबा म्हणायचे शांत रहा, समजुतीने घे सासरी निभाव लागेल
आई म्हणायची ........
काकू म्हणायची............
काका म्हणायचे...............
आत्या म्हणायची................
मावशी म्हणायची...................
पण बाबा म्हणायचे, जग बाळा मनसोक्त,  मन मुराद, हवं तसं खेळ, ओरड, हवं ते शिक, हवं तसं नाच, हवी तशी फिर, तुझं हक्काचं घर आहे, तू तुझ्या माहेरी आहेस

पण मी आता सासरी आहे, चंद्रलोकचा परिवार म्हणतो आहे, गौरी तू येथे हवं तसं खेळ, मन मुराद, हवी तशी नाच, कारण तू तुझ्या चंद्रलोकच्या परिवारात आहे, तू चंद्रलोकच्या घरी आहेस.

काय बोलतात ना गौरी मॅडम, त्यांचं मनोगत म्हणजे  संस्कृतीच्या खजान्यातलं हिरवं पान असतं.

दाटून आला कंठ, भरून आले डोळे
चंद्रलोक ने आमचे किती केले सोहळे                                    
रीती झाली लेखणी, शब्द मला काही सुचेना
चंद्रलोकचं कौतिक माझ्या मनी म्हाईना

तर सौ समता पावसकर यांना पुरुषांची ससेहोलपट बघवली जात नव्हती, कोथिंबीर, डाळीचं पीठ मीठ कालवण चाललं होतं, त्याच्यात पाणी किती घालायचं, यांचं प्रमाण किती आणि कसं जमणार यांना!  त्यांना असं वाटत होतं की पुरुषांनी ही कामं  ही थांबवावीत आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना मदतीचा हात द्यावा.ते खिडकीतुन सर्व परिस्थितीचा आढावा घेत होत्या परंतु त्यांचा नाईलाज होता, आज आपल्याला काही बोलायचं नव्हतं, आपल्याला जे काही मिळणार आहे ते सन्मानाने मिळणार होतं, त्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी आहोत आज खऱ्या अर्थाने पती पत्नी, बहीण भाऊ, मित्र मैत्रीण, मुलगा मुलगी, नात नातू, आई बाबा, सासू सासरे या सर्वांचा त्यांनी सन्मान केला आहे. त्यांच्या तळमळीने त्यांची समीक्षा ओली झाली.
सौ.गाडगीळ मॅडम ना खूप काही सांगायचं होत परंतु त्यांच्या ओठावर येईपर्यंत ते विरून जात होतं, कारण अगोदरच्या सख्यांनीच त्यांच्या मनातला गाभारा रिता केला होता.नंतर त्यांनीच एक आर्जव करून सर्व पुरुष सभासदांना स्टेजवर यायला भाग पाडून एक कृतज्ञता व्यक्त केली.

छोट्याशा तृणपात्यांवर असंख्य दवबिंदू साचलेले आपण नेहमी पाहतो, परंतु नितळ कांती असलेल्या कमळाच्या लालसर लुसलुशीत पाकळ्यांवर पाण्याचे थेंब का साचत नाहीत याचं रहस्य आज सहजतेने  उलगडले गेले, हे आपण प्रत्यक्ष पाहिले आणि शीतचंद्रलोकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अथांग समुद्रावरून उडणाऱ्या पक्षाच्या चोचीतलं जिवंत माशाचं भक्ष्य निसटता निसटता त्याने चपळाईने पुन्हा क्षणात पकडलं, परंतु विसाव्यासाठी त्याला जागाच मिळेना. त्याप्रमाणे आपल्या फोटोग्राफरची अवस्था झाली होती, कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण आणि संख्यांच्या अदा कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा त्याने हट्टच धरला होता. प्रत्येक जण कार्यक्रमाचं कौतुक करत होता, आपला फोटोग्राफर मात्र एका पायावर उभा राहून आपली तपश्चर्या भंग करत नव्हता. कारण स्वतःच्या डीसीप्लिन त्याला आज्ञा देत नव्हते. ते फोटोग्राफर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले श्रीयुत गाडगीळ साहेब. अप्रतिम अभिनय आहे सर तुमचा.

केळीच्या पानावर जेवणाची लज्जत कशी असते, इडलीच्या भांड्यातून कोथिंबीर वड्या जन्माला येतात तरी कशा ही सर्व उपकरणे हाताळावीत कशी!  हे सर्व डोळ्यांनी बघतांना पोंक्षे साहेबांनी त्यांच्या मनाला किती पैलू पाडून जपून ठेवले होते याचा अंदाज बांधणे सोपी गोष्ट नाही आहे त्यासाठी मला त्यांच्याशी मैत्रीचं नातंच जोडावं लागेल त्याशिवाय हा तिढा सुटणार नाही.  जेवणाचा मेनू ठरवंतांना मसाले भात हवाच, तांदूळ पासून ते भाज्या कोथिंबीरच्या जुड्या आणण्यापासून सर्व कामे त्यांनी मनोभावे केलीत. केळीचे पानात जेवणाचा आग्रह धारतांना मला अर्धा तास त्याचं महत्व सांगताना त्यांची अजिबात दमछाक होत नव्हती तर त्यांचा उत्साह मला जाणवत होता. त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. स्टेजवर त्यांचं कौतुक चालू असतांना ते सोलकडी करण्यात व्यस्त होते. केवळ आणि केवळ स्त्री सन्मानासाठी त्यांना जेवणात कोणतीही कसूर सोडायची नव्हती.

पडद्या मागील श्रमाचे आणि त्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक कसे करावे हा सर्वात मोठा कठीण विषय असतो. जोपर्यंत आपल्या अंगणात लाल माती आहे तोपर्यंत ती चमकणारच आणि खुरट्या बुंधावर चढून बकरी पाला खाणार हे आपलं सौभाग्य आहे. त्यांची किती नांवे घ्यावीत. श्री मोहन फाटक, श्री योगेश गोठीवरेकर, श्री विष्णू पाटील, श्री सुरेश भुवड, श्री बापू गावडे, श्री सचिन सुर्वे, श्री दिनेश खानोलकर, श्री दीपक हेगिष्टे, श्री महेश पोंक्षे, श्री महेंद्र घाडगे, श्री दिलीप काटकर, श्री अरुण गायकवाड, श्री सुरेश चौधरी, श्री वेणूगोपाल, श्री भरत कांडके, श्री बिळसकर, श्री जगन्नाथ पावसकर, श्री देवेंद्र सनगरे, श्री संजय सनागरे, श्री विनय गाडगीळ, श्री उमेश कुंभार, अमित, शिवाजी, किरण, संकल्प, प्रसाद, तेजस, जय, प्रणित, विशाल, मुकूल, मनिष, आर्यन, ओम, आणी माझ्याकडून बरीच जणांचा उल्लेख करायचा राहून गेला असेल तर त्यांनी मला माफ न करता जरूर टोकावे. मी चूक दुरुस्त करेन.  या सर्वांनी भरपूर आणि घसघशीत योगदान दिले म्हणूनच "शीतचंद्रलोक सख्यांना मानाचा मुजरा" हा कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी झाला. या कार्यक्रमाची कीर्ती दूरवर पसरणार आहे यात शंका नाही कारण नुसती कार्यक्रमाची चाहूल लागताच डोंबिवली रामनगर पोलीस अधिकारी पीएसआय शीतल सीसाला ह्या आपल्या कार्यक्रमास फौजफाटासह उपस्थित राहणार होत्या परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना कार्यक्रमाला हजेरी लावता आली नसेल. म्हणून सांगतो साहेबांनो, आपल्या सर्वांच खूप कौतुक ही झालं, खूप मनात भरून ही आलं. तुम्ही न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम सादर केला म्हणून हवेत तरंगू नका कारण हा ठेवा आपल्याला दरवर्षी जपायचं आहे, कार्यक्रमाचं स्वरूप कदाचित दुसरही असेल म्हणून सस्पेन्स आपल्याला दरवर्षी सिक्रेट ठेवायचे आहे.️

टेबल मांडून केळीच्या पानावर सर्व शीतचंद्रलोक संख्याना पहिला जेवणाचा मान दिला गेला, सर्व पुरुषवर्गाने अगदी आग्रहाने पदार्थ वाढले.

जेवणाचा मेनू ठरविण्यासाठी सुद्धा प्रत्येक सभासदाचे मत अजमावण्यात आले होते. मेनू काही अशा पद्धतीने होता. कोशिंबीर, कोथिंबीर वडी, मिक्स भजी, सुका बटाटा भाजी, चना मसाला भाजी, पूरी, मसाले भात, साधा भात, वरण, पापड, श्रीखंड, सोलकडी.

ज्या कोणी सख्यांची अभिप्राय देण्याची खंत राहून गेली होती त्या सर्व सख्यांनी जेवता जेवता त्यांच्या मनातल्या भावनांना मनमोकळे पणाने वाट करून दिली श्रीयुत पावसकर साहेबांनी त्यांच्या मनातल्या स्फुरलेल्या भावनांना कॅमेरात बंदिस्त केले.

मला सुद्धा शोभा गावडेंची कवितेची कॉपी करायचा मोह आवरता आला नाही .

मलाही आवडेल आपल्या कलाकारांचं कौतुक करायला
आवडेल मला आपल्या कलाकारांना प्रोत्साहन द्यायला
आवडेल मला तुमच्याशी नातं ठेवायला
आवडेल मला तुमच्यात मिसळायला
आवडेल मला तुमच्याशी मैत्री जोडायला
आवडेल मला चंद्रलोकच्या कार्यक्रमात भाग घ्यायला
आवडेल मला चंद्रलोकमध्ये राहायला
आवडेल मला तुमच्याशी साहित्यिक गप्पा मारायला
आवडेल मला तुमच्यावर ब्लॉग लिहायला
आवडेल मला तुमच्या कविता ऐकायला
आणि आवडेल मला तुमच्या पंखानी तुम्हाला उडतांना बघायला

आता येथे थांबतो, वाचता वाचता तुम्ही इथपर्यंत पोहचला असाल तर तुमच्या संयमाला मी सॅल्युट करतो.

धन्यवाद



1 comment:

  1. आनंदराव साहेब, काय कमेंट करावी आपल्या लेखणीवर. आज पर्यंत अनेक कार्यक्रमांवर लिहिलेल्या लेखांमधून आपण वाचकांची मने जिंकलीत. आता या वेळी या आगळ्या वेगळ्या नवीन पुष्पासाठी (मी या ठिकाणी हे आपल्या आत्ताच्या कार्यक्रमाला संबोधून म्हटलंय😄) आपल्या लेखणीतून नक्की काय बाहेर येणार याची उत्सुकता सर्वानाच असणार, पण जस जसे चार पाच दिवस गेले वाचकांना वाटले असेल या वेळी चव्हाण साहेब हा लिखाणाचा आटापिटा करत नाहीत वाटतं. पण मला तसं अजिबात नाही वाटलं. जितके दिवस जास्त गेले तितकंच चांगलं काहीतरी वाचायला मिळणार हे मला पक्क माहीत होतं आणि तसंच झालं. समुद्र मंथनातून जसे एक एक नवनवीन रत्न बाहेर यावं तशी तशी उत्सुकता वाढत होती आणि शेवटी जेव्हा अमृत बाहेर आलं तेव्हा सर्वाना जो आनंद झाला अगदी तसं झालं. "जैसे महेकते फुलो के बीना, बगीया में खुशबू न खिलती, आपकी लेखणी के बिना चंद्रलोकमें, कलाकारो को प्रेरणा नही मिलती। वा किती सुंदर लेखणी आहे तुमची. वाचताना त्या विश्वात गेल्या सारखं वाटतं.अचूक ठिकाणी अचूक अशा तुमच्या त्या उपमा, ती उदाहरणे आणि सर्व कार्यक्रमावरील तुमचं बारीक निरीक्षण या गोष्टी मुकुटा मध्ये बसवलेल्या विशेष हिऱ्यांसारख्या उठून दिसतात. अनेकांच्या अंतकरणापासूनच्या मेहनतीने हा कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचला. त्यामध्ये सर्व ग्रुपचे टीम लिडर्स, टीम मेंबर्स, आपल्या विशेष अतिथी ज्ञानदा कदम, चंद्रलोकच्या संख्या, झांज पथकातील कलाकार, दोन पाहुणे कलाकार स्वप्नील डेंगळे, आणि नेहा खरात, आणि आपल्या चंद्रलोक मधील सर्व सभासद बंधू भागीनी आणि लहान मुले अगदी सर्वांची सर्वांची मेहनत रंग लाई। आणि त्या नंतर जसे सत्यनारायणा नंतर उत्तर पूजेचे महत्व तसे कोणत्याही गोष्टीच्या सादरीकरणा नंतर तुमच्या लेखणीचे महत्व. अशा या तुमच्या मनमोहक लेखणीला माझा कोटी कोटी प्रणाम🙏

    ReplyDelete