Saturday 21 March 2020

कोरोंनाचा विळखा, कृपया इकडे लक्ष द्या

मित्रहो नमस्कार,
(श्री भरत कांडके, शीतचंद्रलोक, डोंबिवली)

आज रविवार, आपल्याला टाळता येण्यासारखी खूप कामे आहेत, पण उगाचच आपण हे काम ते काम असे करून कामाची लिस्ट तयार करतो आणि बाहेर पडतो. पण आज तसे करू नका, कारण, सध्या बाहेर कोरोनाची जी दहशत सुरू आहे, मला वाटतं या मधून आपण सर्वजण सही सलामत बाहेर पडणे हे *सर्वात जास्त महत्वाचे काम आहे*. *संपूर्ण जग कोरोना सारख्या महामारीच्या विळख्यात सापडले आहे हे आपण सर्वजण जाणत आहातच*. यामधून वाचण्यासाठी सरकारी यंत्रणांन मार्फत सर्वच स्थरावरून योग्य त्या सूचना दिल्या जात आहेतच. *आपण सुशिक्षित आहात* त्यामूळे त्या सूचनांचे पालन आपण करत असणारच. परंतु कसे असते जसे वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता सारखी नसते, त्या प्रमाणे आपल्यातील सर्वानाच या संकटांचे गांभीर्य एकाच वेळी समजेन असे नाही. त्या साठी आणि आपल्या मधील ऋणानुबंधाचे संबंध या साठी पुन्हा एकदा हा प्रयत्न. दिवसागणिक परिस्थिती बिघडत आहे हे रोजच्या आकडेवारी वरून समजते आहेच. कोरोना सारखा विषाणू शत्रू  बनून समोर उभा आहे. लढाई एका जीवघेण्या विषाणूशी आहे. आणि जर ती जिंकायची असेल तर आपल्याला एक दिलाने ती लढावी लागेल. पण या वेळी एकत्र न येता आपापल्या घरात बसून लढायची आहे. तुम्ही म्हणाल घरात बसून कुठे लढाई लढली जाते का? अहो आपण छत्रपतींच्या महाराष्ट्रातील मावळे आहोत. जरा आठवा राजांचा इतिहास. प्रतापगडावर राजांवर आलेल्या संकटाच्या वेळी कोरोनारुपी अफजलखानाला आणि त्याच्या फौजेला संपवण्यासाठी आपल्या राजांनी किती व्यवस्थित प्लान बनवला होता. शामियान्यातील अफजलखानाच्या भेटीच्या वेळी काही मंडळी (आमच्या सरकारी अथवा खाजगी यंत्रणेतील अत्यावश्यक सेवेतील लोक) राजांसोबत आपले काम चोख बजावतील, तर बाकीचे मावळे (तुम्ही आम्ही सर्व) जंगलात   (आपापल्या घरात) दबा धरून बसून योग्य वेळेची आणि पुढील सुचनेची वाट पाहतील. असाच आहे आपल्या मोदी साहेबांचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा प्लान. अगदी त्या प्रमाणे वागू या.  स्वराज्य स्थापनेतील लढाया अशा गनिमी काव्याने लढल्या गेल्या. तेव्हा कुठे प्रचंड अशा मोघल साम्राज्याचं पानिपत करून महाराजांनी स्वराज्याचा विजयी ध्वज फडकावला. मित्रहो आपल्यालाही तेच करायचंय. कोरोनाशी गनिमिकाव्याने लढूनच विजय मिळवायचाय. कारण हा विषाणू अफजलखानापेक्षाही निर्दयी आहे, तो अजिबात भेदभाव करत नाही. आपल्या पंतप्रधानांनी उद्या सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत जनता कर्फ्युचं आवाहन केलंय. खूप  गर्भित असे संकेत आहेत त्यात. आपण त्याचा अभ्यास करत न बसता, आपल्या पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी, आरोग्यमंत्र्यांनी आणि सरकारी यंत्रणेने ज्या ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे फक्त पालन करून, स्वतःला त्यात सामील करून घेऊ या. आणि बरोबर 5 वाजता अत्यावश्यक सेवेतील त्या सर्व देशभक्तांसाठी, त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी, त्यांच्या विषयी आपल्या मनातील कृतज्ञतेची भावना दाखवण्यासाठी घंटानाद करू या. आपल्याला स्वतः बरोबर दुसऱ्याला, इतरांना, आणि पर्यायाने समस्त मानव जातील या महामारीपासून वाचवायचंय मंडळी. उद्याचा दिवस आणि पुढील एक आठवडा खूप महत्वाचा आहे. सहजतेने घेऊ नका, मलाही सुरवातीला वाटलं होतं, इतकं काही नाही होणार, पण दिवसेंदिवस परिस्थिती बिघडते आहे, जागरूक होणं गरजेचं आहे गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, कारण अजूनही वेळ गेलेली नाही, आपल्या रोजच्या सवयींना काही दिवस बाजूला ठेवून काही दिवस गृहस्थाश्रमाच्या आगळ्या वेगळ्या नियमांचे पालन करून कटिबद्ध होऊ या. काय करायचंय हे सर्वांना माहीत आहेच. स्वच्छता राखा, तासातासाला हात, नाक, तोंड आणि डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. घरातच राहणे पसंत करा. आपल्या घरातील सर्वाना वेळ द्या.  गरज नसताना बाहेर जाऊ नका. कोण कुणाच्या संपर्कात आलेली व्यक्ती तुम्हाला भेटेन याचा काही नेम नाही. आणि याचीच वाट बघतोय तो कोरोना. अहो अवघ्या दिड महिन्यात ज्याने संपुर्ण जगाला वेढा घातला. त्याला आपल्या भारत भूमीवर हबी होण्याची संधी देऊ नका. खरोखर हात जोडून विनंती आहे. कारण जर चुकून असे झाले तर मित्रानो आपल्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात त्या वेळी आपल्या हातात काहीच नसेल.  आणि त्या वेळी हया सर्व उपाय योजना करण्याची वेळ निघून गेलेली असेल. तेव्हा वेळीच शहाणे बनू या. आणि निकराने लढू या. हे करताना थोडा त्रास होणारच आहे, पण त्याला ईलाज नाही. कारण ही लढाई संयमाची आणि धीराची आहे. आपल्या पंतप्रधानांच्या अवाहनाला, एक देश सेवा समजून, प्रतिसाद देऊ या स्वतःसाठी, आपल्या प्रियजनांसाठी, आणि पर्यायाने भारतमातेसाठी नव्हे नव्हे संपूर्ण मानव जातीसाठी आपले दायित्व सिध्द करू या. चला तर मग तयार होऊ या, या निश्चयाने की, "माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, संयम आणि धीराने घेऊन कोरोनाला मारू" आपण कोरोनाला मारू.

🙏🏻
- श्री. भरत कांडके, डोंबिवली.

No comments:

Post a Comment