Sunday 19 July 2020

डोंबिवली 2003

(दवाने थबथबून गेलेल्या सकाळी डवरलेल्या बागेत मधोमध काट्यांच्या शिरावर एखादे गुलाबाचे फुल फुललेले आहे. वारा वाहतो की नाही तेही जाणवत नाही, पण फुलाचा गंध मात्र सर्वत्र मंदपणे पसरत आहे असा काहीसा समज तुमचा हा खलील लेख वाचून होणार असेल तर तो तुमचा भ्रम आहे. असं काहीही या लेखात नाही आहे.)

डोंबिवली 2003

डोंबिवली या शहराला म्हणावे असे काहीच नाही. इथे सरकारी इमारती, खाजगी कंपन्यांचे कार्यालये, बहुमजली इमारती नाहीत. या आधुनिक शहरात सगळ्या गैरसोयी आहेत. उंदरांच्या बिळासारखी माणसांची घरे आहेत. घरात हवेला मज्जाव आहे, त्यामुळे पंखा लागतो. माणसांच्या गर्दीने एके काळचे निसर्ग संगीत हिरावून घेतले आहे. आठवड्यातले पाच दिवस काम करून मनुष्य इथे कंटाळतो. त्यांचा जीव आंबून जातो तेंव्हा टाईमपास साठी शॉपिंग, आराम करण्यासाठी येथे कोलोम्बो, सिंगापूर, बेंगलोर सारखे इथे काहीही नाही. मग आहे तरी काय या शहरात. सगळ्या जगापासून दूर, जिथं कुणी म्हणजे कुणी नाही, ते आसपास घुटमळत असतं असं अप्रतिम सुंदर विश्व या शहरात निर्माण करण्याचं कुणालाही सुचत नाही. इथल्या नद्या सुकल्या नाहीत पण इथल्या नद्यांवर अतिक्रमण झाले आहे. साईन बोर्ड आणि टी.व्ही. टॉवरनी या शहराला उघडे नागडे करून टाकले आहे. संपूर्ण शहरात नजरेत भरेल असं एकही झाड इथे नाही.
                                                       -०-
वरील "डोंबिवली" हा लेख 2003 या वर्षी वर्तमान पेपरात छापून आला होता. कोणी लिहिला आणि कोणत्या वर्तमान पेपरात छापून आला होता ते आठवत नाही. परंतु 2003 च्या माझ्या "जुनी डायरी"त लिहून ठेवलेला आहे. तो पूर्ण नाही असे वाचल्या नंतर जाणवते. परंतु ते काही असो आज 2020 या वर्षी हा लेख काहीसा आजच लिहिला आहे असंच वाटतं. प्रगतीची पाऊले या जगात जोराने येऊन आदळलीत. तुम्ही इतिहासाची पाने चाळली असतील तर तुमच्या लक्षात आल्या शिवाय राहणार नाही की मानवी संस्कृतीच्या इतिहासात एव्हढा गतिशील आणि श्रेष्ठ कालखंड कधीच आला नव्हता पण आमची 2003 ची डोंबिवली आहे तशीच आहे. बऱ्याच वर्षानंतर बालपणीचा एखादा जिवलग मित्र भेटावा  आणि त्याने घट्ट मिठी मारावी. संभाषणाला सुरुवात करण्यापूर्वी, अरे तू लहानपणापासून आहे अजून तसाच!! कोणताही बदल नाही ! ग्रेट !

No comments:

Post a Comment