Friday, 20 January 2017

प्राजक्ताचा सडा

शिशिराची पानगळ संपून वसंताची पालवी फुटावी असा बहर तिच्या आयुष्यात प्रथमच आला होता. फुटलेल्या पालवीच्या कांतीत हिरवेपणा निपजेपर्यंत झाडं , त्या मुलायम कोवळेपणाला जीवापाड जपतात. त्याप्रमाणे ती आनंदाने हरणाच्या चंचल पाडसासारखी सारखी बागडत होती. खेळत होती. कधी बाबांच्या खांद्यावर तर कधी आईच्या मांडीवर. याहूनी ठावे काय तियेला. वृक्षाला पर्णभार सांभाळता सांभाळता त्या कळ्यांची फुले कधी झालीत आणि त्या पानांना हिरवेपणा कधी आला हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्या ऋतुबदलातलं ग्रीष्माचं होरपळून काढणारा दाह पेलण्यासाठीच कदाचित ईश्वराने ही परिपक्वता   निर्माण केली असावी. अंगणात भरगच्च प्राजक्ताचा सडा पडलेला होता.  फुले वेचिता वेचिता तिचा खांद्यावरचा पदर राहून राहून ढळत होता. आज पहिल्यांदाच ती साडी नेसली होती, साडीमधलं तिच्या चेहऱ्यावरचं निरागस सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. कारण तिला लग्नाची मागणी आली होती. नवरा मुलगा तिला आज बघण्यासाठी येणार होता. तिचा बारावीचा परिक्षेचा निकाल अजून यायचा बाकी होता. तिचं शिक्षण चालू होतं. नवऱ्या मुलांकडील मंडळीने तिच्या भावी शिक्षणाची काळजी घेतली जाईल असा भरोसा दिला होता. आपला भावी जोडीदाराबद्दलचे स्वप्नं तिने अजून बघितलंच नव्हतं. हे एवढ्या घाई गरबडीत घडले की, तिच्या भविष्याबद्दल विचारच न करताच सोळाव्या वर्षीच तिच्या बाबांनी तिचे हाथ पिवळे केलेत. लग्नानंतर तिचं शिक्षण झालंच नाही. घरातल्या रितीभाती, मानमरातब, चालीरीती समजून घेण्यासाठी तिला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होती. कारण तिच्या चेहऱ्यावर अजून कुवारपणाची लज्जत रेंगाळत होती.

प्राजक्ताचा सडा


कसे आहात हो बाबा

बरे आहात ना सर्व

आमचं आहे गं ठीक सगळं !

पण तू आहेस कशी

शब्द विणा बोले काही

गालावरच्या खळ्या

कोमेजल्या होत्या फुलासारख्या

तरी म्हणाली छान सुरुवात आहे !

वाटलं

तिला अशीच हलवावी गदगदा

प्राजक्ताच्या झाडासारखी

अन दडलेले अश्रू

ओंजळीत घ्यावेत फुलांसारखे !

Tuesday, 17 January 2017

अजून येतो वास फुलांना, या मातीचा गंधच वेगळा

डोंबिवलीत सर्वच जातीधर्माचे लोक इथे अगदी अनंत काळापासून गुण्या गोविंदाने राहत आहेत. त्या काळापासून डोंबिवली शहराला कुठलाही सोस नाहीं कीं जोजार नाही. या शहरात कुठलेही प्रेक्षणीय स्थळ नाही. पाहुणे रावळे आलेत तर त्यांना बाहेर घेऊन जायची पंचायत होते. मोठमोठे गार्डन्स जरी नसले तरी मिनी गार्डन्स जरूर आहेत. ती चिली-पिल्यानांच पुरत नाहीत. तरी इथल्या बिचारे जेष्ठ नागरिकांची कुठलीही तक्रार नसते. जिथे छोटासा कट्टा मिळेल तेथे बसून एक सर्जनशीलतेचा आविष्कार त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच झळकत असतो. मोठमोठे रस्ते तर नाहीतच परंतु खड्ड्यांचीही कमतरता नाही. त्याच्यात भरीस भर म्हणून रस्त्याच्या कडेने कुठेही विलोभनीय पार्कींग दृश्य बघायला मिळते. म्हणूनच डोंबिवलीकरांची मानसिकता जेवढी कणखर तेवढी मजबूत देखील आहे. हीच मानसिकता प्रबळ होऊन नोव्हेंबर 2016 च्या नोटबंदीमध्ये अनुभवास मिळाली. डोंबिवलीकरांनी अगदी शांतपणे आठ आठ तास बँकांच्या उन्हेरी अंगणात रांगेत उभे राहून सरकारला दाखून दिले की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जेंव्हा ह्याच सहनशीलतेचा चेंदामेंदा लोकल ट्रेन मध्ये चढतांना आणि प्रवास करतांना होतो तेंव्हा हाच डोंबिवलीकर घरी वापस येतांना हुश्शss सुटलो बुवा एकदाचा अशी प्रतिक्रिया देखील देत नाही. म्हणूनच....... आहे मनोहर तरी हे सुनीता देशपांडेंनी लिहिलेल्या पुस्तकाचं अलंकारिक उपमेचं नांव या शहराला शोभते. ह्याच शहरात श.नां. नवरे मोठे लेखक वास्तव्याला होते. एकदा योगायोगाने हॉटेल मॉडर्न कॅफे मध्ये माझ्या समोरच स्नॅक घेण्यासाठी बसले असतांना एकच मिनीट ते माझ्याशी बोललेत पण माझा नाष्टा होऊनही मी त्यांच्यासमोर अर्धा तास बसून त्यांची सर्जनशीलता न्याहाळत होतो. म्हणूनच अजून येतो वास फुलांना, या मातीचा गंधच वेगळा.

ह्याच आटपाट डोंबिवली नगरात असंख्य सोसायट्या आहेत. त्यांची नांवे देखील काही खूप चांगली आणि सुंदर आहेत. जशी ललीत, सनराईज, कविता, केतकी, औदुंबर, सृष्टी आणि काही नांवे तर फारच भयानकच आहेत, कैलास धाम, वैकुंठ निवास, स्वर्ग अशी नांवे का ठेवतात तीच लोक जाणे.  आमच्या सोसायटीचं नांव आहे "शीत चंद्रलोक". इथे चंद्र जरी राहत नसला तरी वर्षभरातून होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचा वावर सोसायटीतच असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सुद्धा विविध खेळांचे नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जातात. होळी, दहीहंडी, पाडवा हे सण उत्स्फूर्तपणे साजरे केले जातात. दिवाळी पहाट शितचंद्रलोक सोसायटीचं खास आकर्षण आहे. या कार्यक्रमाचं वर्णन कुणी तरी खूप छान केलं आहे. केंव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली । उठी श्रीरामा पहाट झाली । पूर्व दिशा उमलली । उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माउली. अभंग्य स्नान करून भल्या पहाटे प्रसन्न वातावरणात दिवाळी पहाटचा कार्यक्रमाचा आनंद लुटला जातो. ह्या कार्यक्रमात सोसायटीतील कलाकारच शब्द सुरांची मेजवानी पेश करतात. ह्या वर्षी शोभा गावडे, साक्षी सनगारे, महेश पोंक्षे, तेजस कांडके, साधना भुवडं, गौरी गोठीवरीकर, समता पावसकर आणि भारत कांडके यांनी भाग घेतला. या कार्यक्रमात विविध गाण्याचे पदर उलगडले गेलेत. मी आई भवानी तुझे लेकरू, मला हे दत्त गुरु दिसले, सूर तेच छेडीता, मी कुठं म्हणालो मला परी मिळावी, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, सांज ये गं खुळी सावळी सावळी ह्या गाण्यांचे सोसायटीतील कलाकारांचे स्वर उलगडलेत. परंतु मागील वर्षी श्रीयुत गडगीळांनी गायलेलं शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुन चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा, हे गाणं अजून स्मृतीत दडून बसलं आहे. शीत चंद्रलोकमध्ये अजून एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं इंद्रधनुष्य चांगलंच उमटलं आहे. "शेकोटी" या कार्यक्रमात वांग्याचं भरीत, पिठलं भाकर, आणि हिरव्या मिरचीचा लसूण शेंगदाणे घालून केलेला ठेचा हा शीत चंद्रलोकच्या सख्या यांच्या कडून शेकोटी कार्यक्रमात अप्रतिम जेवणाचा नजराणा पेश केला जातो. शेवटी मिरचीचा ठेचा बायका का करतात याचं उत्तर कोणत्याही पुस्तकात सापडत जरी नसले तरी नवरे मंडळीनां याच उत्तर चांगलंच माहीत असूनही ते  फार चवीने हा ठेचा फस्त करतात.

हेमंत ऋतू संपून हवी हवीशी वाटणारी शिशिराची पानगळ चालू झालेली असते. थंडी मी म्हणत असते. झाड अन झाड नवांकुरानी सजलेलं. सर्वानाच वार्षिक सांस्कृतिक  कार्यक्रमाचे वेध लागलेले असतात, निमित्त असतं वार्षिक श्री सत्यनारायणाची पूजा. याच कडाक्याच्या थंडीत नाटकाची रिअर्सल, खेळांची लगबग शीत चंद्रलोक सोसायटीत सुरु झालेली असते. नाही म्हटलं तरी हे शीत चंद्रलोकचं वार्षिक स्नेहसम्मेलनच असतं आणि सगळीकडे फुल टू चं वातावरण असतं. वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाची  परंपरा 1994 पासून अखंड अविरतपणे चालू आहे.

सत्यनारायणाची पूजा नव्या जोडप्याच्या हातांनी केली जाते. साधू वाण्याची गोष्ट आणि घालीन लोटांगण वंदीनं चरण संपल्या संपल्या नव्या नवरीने नांव घेण्याची बायकांमध्ये कुजबूज सुरु होते आणि तीथूनच सुंदर नांव घेण्याचं चांगली प्रथा सुरु झाली. सोनियांच्या ताटात मोत्यांच्या राशी, किरणरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी. नितळ पाण्यातलं प्रतिबिंब आणि तेही मूळच्या रचनेपेक्षा सुंदर. किती सुंदर सुरुवात झाली होती मागच्या वर्षी. या छपन्न सदस्यांच्या सोसायटीत कलाकारांची रेलचेल तर आहेच. पण कलाकार तयार करणारे कलादेवतेचे पुजारी सुद्धा इथे राहतात. भजन आणि स्रियांच हळदी कुंकू समारंभ हे या कार्यक्रमाचं एक आकर्षण असतं. दरवर्षी नव नवीन नाटक बसविले जाते आणि सोसायटीतील कलाकारच त्या नाटकात भाग घेतात. बऱ्याच कलाकार मुली लग्न होऊन सासरी गेल्यात, याच रंगमंचावरचे काही कलाकार परदेशात नोकरी निमित्त स्थायिक झालेत. नव नवीन कलाकारांचा उदय होतोच आहे. म्हणूनच तर अजूनही वाहतात वारे, फुलांना अजूनही तोच गंध आणि आपल्या सोसायटीत गुलाब ताजे फुलतात तरी कसे. या अप्रतिम प्रश्नाचं उत्तर अजून तरी सापडलेले नाही.

खाली दिलेली नाटकांची यादी जरी वरचेवर न्याहाळली तरी लक्षात येईल की काही वर्षांनी कोणत्यातरी पुस्तकात त्याची नोंद जरूर होईल. आभास, वयंम मोठंम खोटंम, चिठ्ठी आयी है, येरे बैला, वैभवशाली महाराष्ट्राची करूण कहाणी, दंत कथा , निश्चयाचा महामेरू, विनाशकले विपरीत बुद्धी, हा खेळ सावल्यांचा, अखेरचा सवाल, आमचं हे लफडं, ह्या मातीला गंध वेगळा, गुंतता हृदय हे , आधार की अडचण, यात्रा उत्तराखंडाची, ह्रिदम ऑफ लव्ह, अपहरण आणि जावयाचं बंड.

कलाकारांची नावे तरी किती घ्यावीत. प्रतिक, रोहित - नाटकाचा निर्माता आणि कॅप्टन ही दोघंच. दोघेही कॉमेडी किंग. कॉमेडी करण्याचं यांचं काम भागतं, पण प्रेक्षकांच्या पोटांची हसून हसून हे पूर्णपणे वाट लावतात. दिपाली, मनाली, रिया, अंतरा, सायली, अमृता, जागृती, उर्वी, प्रथमेश गीड्डे, प्रथमेश भुवड, मुकुल, अमित राणवसे, गाडगीळ, संकल्प, नेहा, तेजस, पावसकर, बिळस्कर, समीर इ. कंदीलाची काच ताडकन टीचावी तशी रांडीच्या या शब्दाला साहित्यिक शब्दाची ओळख करून देणारे श्रीयुत भुवडांनाच हे श्रेय जातं.  अखेरचा सवाल या नाटकात मिसेस गोठीवरीकर यांनी "मी नंदूची आई आहे हो असा टाहो फोडून कोंडून ठेवलेला श्वास जेंव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या पापण्यांच्या आत जाऊन बसतो, तेंव्हा एका फुलाला गाळतांना बघितलं अन त्या कळीचं फुलणच थांबलं, अशी त्यांची अवस्था झाली. कमीत कमी खर्च करून अतिशय कल्पकतेने आखणी करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला जातो. अर्थात त्याच्यामागे निस्वार्थपणे एक निळा सावळा झरा वाहत असतो. त्या झऱ्याच्या पाण्याला वाट कशी करून द्यावयाची हे श्रीयुत पोंक्षे आणि श्रीयुत कांडके बघत असतात. 1994 पासून पोंक्षे साहेबांनी आपलं योगदान देवून सांस्कृतिक कार्यक्रमाची ज्योत तेवत ठेवली. आणि 2003 मध्ये आपल्या सोसायटीत कांडके सरांचं आगमन झालं. सोसायटीतील एकंदरीत मुलांचा इंटरेस्ट आणि उत्साह बघून त्यांच्यातलाही लेखक जागा झाला. डी विंगच्या अंगणात त्यांनी एक छोटंसं रोप लावलं. वि.स. खांडेकरांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. श्रीकृष्णाने सत्यभामेच्या अंगणात पारिजातकाच्या झाडाची अशी काही मांडणी केली होती की, त्या झाडाची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडतील. त्या प्रमाणे ह्या रोपाचा वृक्ष होवून त्याच्या फांद्या सोसायटीच्या अंगणात पसारल्यात आणि प्रत्येक घरात कलाकार निर्माण झाला. हेच कलाकार मोठे होऊन आपल्या क्षेत्रात वेगाने पुढे जातात. झाडांना फुटलेल्या  नवअंकुरांची हिरवी पाने कधी झालीत त्या झाडांनाही कळलं नाही. त्यांचं क्षितिज त्यांना खुणवत असतं, आपण त्यांच्याकडे आदराने पाहत असतो. 2003 सालापासून अखंड नाट्यमालिका चालू झाली ती आजतागायत. कार्यक्रमाच्या शेवटी पारितोषिक वितरण समारंभ आणि या साऱ्या घटनाक्रमाकांच वेध घेऊन त्याचं शब्दांकन करणं व त्याचं पुष्प उलगडण्याचं भाग्य जरी मला लाभलं असलं तरी कार्यक्रमाचे शिल्पकार खरे सांस्कृतिक कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि त्यांच्या टिमचंच आहे. दरवर्षी सनगरे बंधूंनीं केलेली सत्यनारायण पूजेच्या मंदिराची सजावट आणि मिसेस फाटक यांना सत्यनारायण पूजेचा प्रसाद तयार करण्याचं मिळालेलं भाग्य, प्रसादाच्या रूपाने प्रभूंचे साक्षात दर्शनच होते.

प्र   = म्हणजे प्रभूंचे
सा = म्हणजे साक्षात
द  = म्हणजे दर्शन

______________________________________________________________

त्या सुंदर सकाळी

कोमल पहाट जागी झाली

सळसळणारी उबदार हवा

तुझ्या पापण्यांना स्पर्शून गेली

रूप तुझे न्याहळण्यासाठी

चंद्र अजूनी जागा

म्हणून तर

क्षितिजवरून येण्यासाठी

मला विलंब झाला

Saturday, 14 January 2017

विठ्ठलाच्या पायी विट, झाली भाग्यवंत

आयुष्या च्या प्रवासात बरीच वादळे, वाळवंटे आणि शालीनतेची ऋतू वेगळे सुख सागरेही येतात. अश्या सागरात किती तरी शिंपले विखुरलेली असतात. असंच एखादं शिंपलं अचानक हाती लागलं की मग आपण आपल्यातलंच हरवलेलं आपलेपण शोधायला लागतो. असेच , परवा मी पुण्याला माझ्या पेन्शनचे पॉलिसी कागदपत्र घेण्यासाठी शिवाजीनगरला एल आय सी ऑफीस मध्ये गेलो होतो. माझेच पैसे असून सुद्धा मला संबंधित कागदपत्र मला ते द्यायला तयार होईनात. मी त्यांच्याकडे कागदपत्र मागण्यासाठी याचना करीत होतो आणि ते न देण्याचं एकसुरी आसुरी आनंद लुटत होते. तरी सुध्हा त्यांचे चेहरे म्हणजे मला  पाणी न टाकलेल्या सुकलेल्या तुळशीच्या पानांसारखी भासलीत.  शेवटी हाथ जोडून मी माझी सुटका करून घेतली. जेष्ठ नागरिकाची उपेक्षा होण्याची ही कदापिही पहिली वेळ नसावी याची मला खात्री झाली. मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम केले असल्यामुळेच मी त्या चष्म्यातून बघून तुलना करत होतो हे माझ्या लक्षात आले आणि मला काही वाईट वाटले नाही कारण माझे काम झाले होते. हाथ जोडून विनंती करण्याची प्रतिभा ही भारतीयांना सयंमी मानसिकतेच्या वरदानातूनच मिळालेली असते. क्षणाचाही विलंब न लावता माझे पेपर्स घेऊनं मी तडक शिवाजीनगर रेल्वे स्थानक गाठले. अन अवघ्या पाचच मिनिटात मला पुणे कर्जत पॅसेंजर मिळाली. माझा रात्री भोसरीला बहिणीकडे मुक्काम होता. बहिणीला फोन करून सांगितले की माझे एल आय सी चे काम झाले, अन मला पुणे कर्जत पॅसेंजर देखील मिळून विंडो सीट मिळाली आहे. मी डोंबिवलीला जाण्यासाठी आता निघालेलो आहे. गाडीला गर्दी अजिबातच नव्हती. मुळातच पॅसेंजर असल्यामुळे माझ्यासारखेच रिटायर्ड झालेले , वृद्ध जोडपे तसेच परिस्थितीने गांजलेले काही गरीब लोक माझ्या मागे पुढे, तर कोणी पाय लांब करून तर कोण रिसर्व्हेशन केल्या सारखे सरळ आडवे झोपले होते. गाडीने शिवाजीनगर स्थानक सोडले होते. गाडी आता स्पीड घेईल असे वाटत होते पण छे: हळू हळूच धावत होती.  "धावणे" या शब्दाचा तरी अपमान कशाला करायचा. एखाद्या आळशी, आजारातून उठून हळू हळू चालल्या सारखं गाडी जणू एक प्रकारे चालत होती.  बऱ्याच वेळानंतर तुरळक गर्दी नसलेली पुणे उपनगरीय रेल्वे स्थानके एकामागून एक जात होती. काही स्थानके तर मला भयाण दुष्काळ ग्रस्त सारखीच भासली. कदाचित मला मुंबईतील उपनगरी स्थानकावरील भयानक गर्दीची सवय असल्यामुळे मला असा भास झाला असेल. पाच मिनिटे गेल्यानंतर अगदी शांतपणे डोळे मिटून घेतलेत. आणि लांबून अगदी बारीक आवाजात एक धून ऐकायला यायला लागली. "विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत"  कवी दत्ता पाटील यांचं भजन म्हणणारी वृद्ध व्यक्ती जसजशी जवळ येऊ लागली तसतशी त्या अभांगाची ओळ प्रखर ज्योतसारखी भासू लागली. ह्या गाण्याशी आपला काही संबंध नसतांना देखील मला माझे हरवलेले गावसल्या सारखे उगीचच भासू लागलें. एव्हाना तो गाणे म्हणणारा वृद्ध कृश बाबा मला ओलांडून देखील गेला होता. मी त्याला हाक मारून थांबविले आणि एक रुपया त्याच्या हातात दिला. मागे न वळून बघताच पैसे घेऊन तो सरळ पुढे निघून गेला आणि मला प्रश्न चिन्हात सोडून गेला. जणू काय मी ते शब्द त्याच्याकडून एका रुपयात विकतच घेतले होते.  ह्या गाण्याशी माझ्या आयुष्याचं जवळचे नाते आहे असं मला राहून राहून वाटू लागलं. खिडकीत बसल्यामुळे भरभर वारा अंगाला झोंबत होता. हाच वारा माझ्या आयुष्याची पुस्तकाची पाने भरभर मागे पलटावीत होता. ह्या गाण्याशी संबंधित असलेला जीवनपट उलगडण्याचा मी प्रयत्न करू लागलो. पण असे असते ना, एकाद्या जुन्या वस्तूवर थर किंवा जळमटं साचली तर बहुतेक ती वस्तू आपण अडगळीत तरी टाकतो किंवा दुर्लक्षित करतो. तसेच जुन्या किंवा बालपणीच्या घटना सुद्धा आपल्या मेंदूच्या कप्प्यात वर्षांनुवर्षे एका कोंदणात लपलेल्या असतात. आपल्याला आठवून आठवूनही आठवत नाहीत. तळ्यातल्या पाण्याचं तळ बघायचा असेल तर पाणी शांत व्हावं लागतं, तसं मनाचंही असच असतं. "विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत" ह्या ओळी भोवती मनाचा पिसारा फुलतच गेला. लहानपणी आईने मला तळहाताच्या फोडासारखं जपलं. कधी कुठे मला मजुरी करायला पाठविले नाही. घराची जबाबदारी तिच्यावरच होती. गांवातलीं स्रियांची निर्व्याज्य मनाने तिने  बाळंतपणे केलीत आणि तेही विनामूल्य. त्यामुळे हा तिचा व्यवसाय होता असे म्हणता येणार नाही. मला कळायला लागल्यापासून तिने गांवातली जवळ जवळ सहाशे ते सातशे बाळंतपणे केली असतील परंतु कुठल्याही पुस्तकात तिची नोंद झाली नाही.गांवातली कोणाचीही बारीक सारीक कामे असोत किंवा छोटा मोठा न्याय निवाडा असो तिच्या शिवाय पान हालत नसे. लग्नाची स्थळे जमविण्यासाठी जणु तिनेच ठेका उचलला होता. ह्या कामाखेरीज शेतीची कामे करण्यात ती आघाडीवर असे. जंगलातलं कुठलंही असं शेत नसेल की तिने तेथे काम केले नसेल. त्यामुळे गांवातलं प्रत्येक घर आईच्या परिचयाचं होतं. गावातील प्रत्येकजण आईशी आदराने वागून मानपान देत असत. घरी येतांना ती कधीही खाली हाथ येतं नसे, नेहमी तिची खोळ भरलेली असे. आणि तीच भरलेली खोळ मला आयुष्यभर पुरली. बाहेरून गावांत आलेल्या कुटुंबाला देखील तिने घरदार शेतीवाडी घेऊन देण्यास मदत केली परंतु कोणाकडूनही तिने कमिशन घेतले नाही. ती फक्त आपल्या मुलाला तुमचे आशीर्वाद कामास येतील असे ती म्हणत असे. पण मी त्यावेळेस लहान होतो आणि मला काही कळत नव्हतं. पण आज कळतं आहे, ज्या उच्च पदावरून मी निवृत्त झालो हे तेच आशीर्वाद होते. लोणावळा स्थानकावर ट्रेन चे आगमन होताच चिक्कीवाल्याच्या आरोळीने मी दचकून भानावर आलो. माझ्या बालपणाचा पट कसा उलगडत गेला हे कळलंच नाही. तो गाणं म्हणणारा वृद्ध बाबाअजून डोळ्यासमोरच फिरून येतो आहे असा भास झाला.

एव्हाना गाडीने लोणावळा कधीच सोडून खंडाळ्याच्या घाटात शिरली होती. का कोण जाणे अथांग समुद्राच्या पृष्ठभागावरुन उडत जाणाऱ्या पक्षाला आपला निवारा सापडू नये, आणि त्यासाठी त्याने पृष्ठभागावरच्या पाण्याला सतत स्पर्श करत रहावा, त्या प्रमाणे खंडाळाच्या घाटातून दूर दूर दऱ्याखोऱ्यातून उंच उंच पर्वतराजीच्या पलीकडे माझी नजर काही तरी शोधत होती, कदाचित त्याच्याही पलीकडे मी हरवत चाललो होतो. तेव्हढ्यात निर्मनुष्य असलेल्या पळसदरी या स्टेशनवर गाडी थांबली. एकही पॅसेंजर चढला नाही किंवा उतरला नाही. माझ्या जागी एखादा कवी किंवा लेखक असता तर त्याने सरळ "पळसदरीतली भुताटकी या विषयावर कविताच केली असती किंवा एखादा लेख तरी लिहिला असता. निर्मनुष्य रेल्वे स्टेशन कधी असू शकतं का असा प्रश्न उगीचच बऱ्याच वर्षांपासून माझ्या मनाला घायाळ करत होता. शोले पिक्चर मधल्या निर्मनुष्य रामगड रेल्वे स्टेशनवरचा सीन खरा असू शकतो अशी आता माझी पक्की खात्री झाली होती आणि तो प्रश्न मी निकालात काढला.

जेंव्हा जेंव्हा मी माझ्या गांवीं जातो तेंव्हा मी अनुभवतो. स्टेशनवरून जाणारी ती चाकोरीबद्ध पांढरी  वाकडी तिकडी बैलगाडीची  वाट आता राहिली नाही की नुकतीच या वाटेवरून बैलगाडी गेली असल्याची दर्शविणारी खूण ही राहिली नाही. त्याच जागी कमी रुंदीचा डांबरी रस्ता मात्र जरूर झाला आहे. भलेच प्रशांत महासागराचा विलोभनीय किनारा माझ्या गांवाला नसेल परंतु  पावसाळ्यात खळखळून वाहणारी एक छोटीशी नागमोडी वळणाची नदी आहे,  की तिने कधीही उग्र रूप धारण केले नाही. पावसाळ्यात शेती हिरवा शालू नेसून नवरी सारखी सजते. गांवा लगतच मराठी कौलारू शाळा आहे. त्या शाळेत मी शिकलो, सवरलो, अजून ती कौलारू शाळा त्याच जागी उभी आहे. पण कौलं जीर्ण तुटलेल्या अवस्थेत झाली आहेत. क्षणभर त्या कौलांवरून माझी नजर ढळत नाही. पण गांवा मधील काही घरे पक्क्या स्वरूपाची झाली आहेत. गावांत मारुतीचे मंदीर आहे, त्या देवळांचा देखील थोडया फार प्रमाणात जीर्णोद्धार झालेला आहे. मी ही माझ्या आईचं घर पक्क्या स्वरूपात बांधून घेतलं आहे. शेजारीच माझे काका काकू राहतात. गावांतील घरं जरी पक्क्या स्वरूपाची बांधली गेली असली तरी माणसे तीच आहेत. मी बऱ्याच वर्षा पासून मुंबईला असल्यामुळे माझी नजर गावांतील बुजुर्ग मंडळींवर ओळखण्यासाठी सहसा सहसी लवकर पकड घेत नाही. मग ती बुजुर्ग मंडळी मलाच आपण होऊन म्हणतात, तो आपल्याला कसं ओळखेल. तो त्यावेळेस खूप लहान होता. आता किती मोठा झाला आहेस. एखाद्या चांगल्या गोष्टीचं वा चांगल्या वस्तुचं प्रतिबिंब हे मूळच्या रचनेपेक्षा अधिक सुंदर दिसतं, असे  म्हणतात त्याची पदोपदी प्रचिती मला येते. मग गावांतील त्या  बाया माणसं मला माझं नांव न विचारता मला लगेच म्हणतात, तू भागाबाईचा मुलगा ना. मी लगेच होकारार्थी मान हलवितो आणि पदस्पर्श करतो.  आणि मी माझ्या मनातल्या मनात म्हणतो  "विठ्ठलाच्या पायी विट, झाली भाग्यवंत"

दूर नजरेच्या टप्प्यात
पैल टेकडीच्या अलीकडे
कौलारू शाळेला वळसा देत
माझं ते छोटंसं गावं
वाट बैल गाडीची
नागमोडीची
चढण आणि उतरणीची
गळ्यातील बैलांच्या घुंगरांची गाज
गाडीवान दादाला देती साद
हिरव्या कुरणातल्या गर्द सावल्या
चांदण्यात रातीत न्हाहल्या
उंच झाडांच्या कमानी
कोलमडून पडल्या डोहावरती
काजव्यांच्या ध्यानी न मनी
विखुरलं चांदणं रानो रांनी
जागो जागी उगवल्या होत्या
बालपणीच्या आठवणी
जिथे माझा जन्म झाला
ती मात्र तेथे नव्हती
गेली होती निघून दूर
नजरेच्या पल्याड
निसर्गाच्या पलीकडे
ती
माझी
आई

Thursday, 12 January 2017

झेप - 2

ही एका देशभक्ताची तपस्या आहे. आपलं सर्व आयुष्य त्याने देशासाठी वाहून घेतलं. कोणीतरी म्हटले आहे की, आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो पण याचं भान आपल्याला कधीच  राहत नाही आणि वेळ निघून जाते, ती कोणासाठी थांबत नाही. पण वेळ निघून जायच्या अगोदरच तो या देशाला ऋण न फिटण्यासारखं बरच काही देऊन गेला. आणि एक मानवी मूल्याचा आदर्श ठेवून गेला. देश त्याचं नावं सुवर्ण अक्षरात कोरून ठेवेल. कोकीळ गातो, त्याचं गाणं कानावर पडतं, परंतु त्याचं दर्शन मात्र होत नाही. सुरच त्याच्या अस्तित्वाची खुण असते

लोकसत्ता वृत्तपत्र 2005 चं जीर्ण कात्रण मोरपीस म्हणून जपून ठेवलं होतं आणि जणू ते याच क्षणाचं वाट बघत होतं.

भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक डॉ.विक्रम साराभाई प्रयोग शाळेत फिरत असतांना, एका तरुणाजवळ आलेत. आणि त्याच्याशी झालेल्या चर्चेनंतर "अंतराळ संशोधनातील तिसऱ्या टप्प्याच्या संशोधन व विकासाचे काम" करण्यास त्याला सांगितले. त्यावेळेस जगात उपग्रहाच्या संदर्भातील पहिल्या टप्प्याचेच काम व्यवस्थित झाले होते. त्या तरुणाने प्रश्न केला. दुसरा टप्पा केवळ कागदोपत्रीच आहे. आणि तोही (दुसरा टप्पा) आपल्याला माहीत नाही. अश्या अवस्थेत तिसऱ्या टप्प्याचे काम मी कसे काय करणार ? त्यावर विक्रम सारभाईंनी उत्तर दिले. वैज्ञानीक तर्कट तुला माहीत आहे. गरज आहे ती "व्हिजन" ची ! त्याचा वापर कर, सारे काही सहज शक्य आहे.

त्यानानंतर त्या तरुणाने "व्हिजन" समोर ठेवून कामास सुरुवात केली. तब्बल दोन वर्षे अशीच निघून गेलीत. साराभाईनां त्या तरुणाला दिलेल्या कामाची आठवण आली. आणि साराभाई घाईगडबडीत प्रयोग शाळेत आलेत. त्यांनी त्या तरुणाकडे चौकशी केली. त्याने त्या तिसऱ्या टप्प्याचे डिझाईन केले होते. दुसऱ्या दिवशी येणाऱ्या कॅनडाच्या शिष्टमंडळासमोर त्यांनी त्याला ते सादरीकरण करण्यास सांगितले. ते म्हणाले ते सादरीकरण व डिझाईन त्यांना आवडल्यास आपण तो तिसरा टप्पा त्यांना विकू, व देशाला चांगले परकीय चलन मिळेल. त्यानंतर कॅनडाच्या शिष्टमंडळास तो तिसरा टप्पा विकण्यात आला.

त्यानंतर बऱ्याच वर्षांनी अमेरिकेने भारताला उपग्रह तंत्रज्ञानात तिसरा टप्पा देण्याचे नाकारले. पण देशाला काहीही फरक पडला नाही. कारण त्या तरुणाने तो तिसरा टप्पा केंव्हाच विकसित केला होता.

ही कहाणी इथेच थांबत नाही. तो तरुण देशाच्या राष्ट्रपती पदी विराजमान झाला. त्याचे नांव आहे - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.

कोणीतरी म्हटले आहे. आई मी असे काम करेन, की इतिहास माझ्यासाठी एक पान राखून ठेवेल. आणि खरं असंच घडलं. ढगांच्या फटीतून सतत येणारा सोनेरी सूर्यप्रकाश 27 जुलै 2015 या दिवशी कायमचा थांबला .
या देशभक्ताला सलाम.


Wednesday, 11 January 2017

झेप

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण जेवढी गोंडस आहे तेवढीच ती कर्तृत्वाने ओत प्रोत भरून सामाजीक मूल्यांची उंची गाठणारी आहे. मी ज्या कंपनीत नोकरीला होतो तेथे एक छोटं रोप फुललं आणि त्याची वेल गेली गगनावरी. एखादं कर्तृत्व किंवा सौंदर्य हातात पकडणे वा मनात साठविणे जेवढं कठीण असतं तेवढेच ते लेखणीने पकडणे महाकठीण असते.

साधारणतः 2005 मध्ये एका वृत्तपत्रात ही माहीती छापून अली आणि ते कात्रण मोरपीस जसं जपून ठेवतात तसं जपून ठेवलं.

मोरपीस

एक साधी सरळ मुलगी पहिल्याच दिवशी सायकलवरून कॉलेजला जात होती. गेट मधून प्रवेश करताच कट्ट्यावर बसलेल्या मुलांनी तिचे स्वागत केले. एक जण तिला उद्देशून म्हणाला, तुमच्या सायकलची चेन तुटली आहे. साहजिकच तिने खाली पाहीले आणि तिचा सायकलीचा ताबा सुटून ती खाली पडली. त्याच दिवशी तिने मनाशी निश्चय केला, याची मी परतफेड करणारच् !

इंजिनीयरची पदवी घेउन, एका कंपनीत प्रशिक्षण पूर्ण केल्यावर दुसऱ्या एका नाममवंत कंपनीसाठी बसस्टॉप वरच अर्ज भरून कंपनीत पाठविला. फॅब्रिकेशन शॉपवर तिची नेमणूक झाली. पण एका अधिकारयाने विरोध केलाच !  अशा प्रवृत्तीला न जुमानता दोन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. नंतर त्या मुलीस  एस्टीमेट अँड कॉस्टिंग डिपार्टमेंट देण्यात आले. ते काम पूर्ण केल्यानंतर ड्रॉईंग अँड डिझाईन या विभागात तिला काम करण्याची संधी मिळाली आणि सहा वर्षातच ती प्लँट मॅनेजर झाली.

नंतर विक्री विभागात एक्सिक्युटिव्ह असिस्टंट हे पद तिला सोपविण्यात आले. ज्या प्रमाणे नदी एकाच ठिकाणी कधी थांबत नाही, ती असंख्य अडथळे पार करीत सतत पुढे अविश्रांत वाहत असते त्या प्रमाणेच या तरूण मुलीने मागे कधी वळून पाहीलेच नाही.

निर्यात विभागात सुरूवातीला व्यवस्थापक नंतर याच विभागाची सरव्यवस्थापक म्हणून जबाबदारी तिच्यावर येवून पडली. तिच्या दृष्टिकोनातून ही एक सुवर्ण संधी होती, आणि त्या संधीचे  सोने करायचे असे त्या अभ्यासु आणि जिद्दी मुलीने पक्का निर्धारच केला होता.

ही कहाणी इथेच थांबत नाही. ती तरूण मुलगी त्याच कंपनीत म्हणजे  अल्फा लावल या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर झाली. ती तरूण मुलगी म्हणजे मिसेस लिला पुनावाला


 

खोडकर, वा त्र ट

लहानपण देगा देवा असे म्हणतात पण लहानपणी आपण कसा मूर्खाचा अवतार होतों अन किती आचरट होतो याचं कुठे खुमासदार वर्णन अद्याप तरी मला वाचावयास मिळालेले नाही. लहानपणच्या गोड आठवणी असतातच पण काही  विचित्र आठवणी सुद्धा असतात.

नदीतल्या पाण्यावरचं जमलेलं शेवाळ अलगद बाजूला करून त्या नितळ पाण्यात आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाहावं आणि हळूच डुबकी मारून हव्या तेवढ्या बालपणीच्या आठवणींचा मागोवा घ्यावा. आपल्या आयुष्याचा मागील पानावर सहज नजर फिरवली तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही की खरोखर आपण इतके वर्षे जगलो. आपण काय करायला नको होते आणि काय करायला हवे होते. अन काय करायचं राहून गेलं. कधी सुसंस्कृतपणे वागलो तर कधी असंस्कृतपणे. कधी शाळेला मारलेली दांडी तर कधी आईशी खोटं बोललो. कधी मित्रांबरोबर पोहता येत नसतांना देखील डोहात उडी मारली. कधी दिवसातून थिएटरमध्ये चार चार फिल्म बघितल्या. कधी दीड दीड दिवस झोपून राहीलो. खिशात पैसे नाहीत म्हणून विना तिकीट ट्रेनने धुळे ते राजमाने प्रवास केला. सायकलच्या चाकात हवा नाही म्हणून धुळे ते धामणगांव पन्नास किलोमीटर पायी प्रवास केला. एखादी वेल कशी झाडावर वाकडी टिकडी वाढतच जाते, कारण तिच्या त्या स्वभावातच असतं. हरणाच्या पाडसासारखं तिच्या आई बरोबर सरळ न चालण्याचं वरदान त्याला मिळालेलं असतं. सारेच काही विचित्र आणि अनाकलनीय. एकदा कांद्याच्या भरलेल्या बैलगाडीवर लहान काका नानांबरोबर धुळ्याला गेलो असतांना, नानांनी बैलांच्या गळ्यातील जुला  बांधलेलं जोत काढताक्षणीच,  बैलांनी आपल्या माना पटकन काढून घेतल्या बरोबर बैलगाडीच्या दांड्याची दोन तुकडे झालीत. कारण बैलगाडी कांद्यानी भरलेली होती. अतिशय भयानक प्रसंग ओढवला होता. नांनानीं प्रसंगावधान साधून आपले पाय बाजूला केलेत. नाहीतर त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले असते. एवढा मोठा प्रसंग ओढवला असतांना सुद्धा आम्ही दोघे जण रात्रीला तमाशा बघण्यासाठी गेलोतच. हे तर फारच झालं बुआ. कोणाचाही धाक नसतांना माणूस कसा वागणार. खेड्यामध्ये गुरांच्या कळपातला बेशिस्त हुंदडणारा, लोंढण न अडकवलेला सांड असतो ना तसा. एकदा मोठ्या आण्णा काकांच्या शेतात भुईमूग पेहरणी चालू असतांना उजव्या हाताकडील बैलाच्या दोन्ही पायांच्या मांड्यामध्ये मी हाथ घातल्याबरोबर बैलाने मारलेली मांडीवर लाथ आठवली की अजून मांडीत कळा यायला सुरु होतात. शिवाजी हायस्कुल धुळे इथे दहावी वर्गात असतांना, एकदा शाळेत यायला उशीर झाला. राष्ट्रगीत चालू होतं म्हणून आम्ही गेटच्या आतच उभे राहिलोत. उशीर का झाला म्हणून याचं समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे हेडसरांनी हाकलून दिलं. म्हणून मी आणि माझा मित्र माफी न मागता सरळ राजकमल सिनेमागृहात पिंजरा पिक्चरला जाऊन सिनेमा बघितला. हे अतिशय अशोभनीय असेच होते. आईला वाटत होते की माझा मुलगा शहरात शिकायला आहे परंतु माझे प्रताप जर आईला कळले असते तर मला आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतात काम करावे लागले असते. धुळे राजेंद्र छात्रालाय वसती गृहात असतांना रूम मधील आम्ही सर्व जण रात्री नदीला पूर आलेला असतांना देखील नदी पार करून तमाशाला गेलोत. आणि सुपरिटेन्ड यांनी ठोठावलेली उपाशी राहण्याची एक दिवसाची शिक्षा ही त्यावेळी काळ्या पाण्याची शिक्षा वाटली होती. डोहात उडी मारल्यावर कश्या गटांगळ्या खात होतो हे आठवल्यावर अजूनही शरीरावर काटे उभे राहतात.राजमाने रेल्वे स्टेशन ते धामणगांव पाच मैल रात्री एक वाजता अमावस्येच्या दिवशी काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्रीत जंगलातून म्हसनवटीच्या मार्गाने रात्री दोन च्या सुमारास घरी पोहोचलो. त्यावेळी असे साहस करतांना काहीच वाटले नव्हते. परंतु ते आता आठवतांना आपण ते दिव्य कसे पार केले होते याचे याक्षणी फार आश्चर्य वाटते आहे. पुस्तकाची पाने भर भर उडून शेवटच्या पानावर आपण कधी येतो याचंही भान नसतं. कारण बरेच उन्हाळे पावसाळे निघून गेलेले असतात. मग गंगेत घोडं कसं न्हालं असा कोणालाही प्रश्न पडेल. त्याचं उत्तर केवळ एकच , आईने आयुष्यभर घेतलेले कष्ट आणि तिची तपस्या.

परत एकदा

परत एकदा ते बालपण हवे
काकांच्या खांद्यावर
बाबांच्या पाठीवर
परत एकदा निजावे खेळावे हिंदळावे
पहाटे आईच्या उबदार कुशीत परत एकदा शिरावे
आमराईत अन त्या केतकीच्या बनात दरवळणारा गंध व्हावे
शुभ्र पाण्याच्या झऱ्याखाली दगड होऊन निपचीत पडून राहावे
आईने घातलेली हाक धुडकावून
गोफणीतला दगड भिरकावून भल्या पहाटे ललकारावे
दूर दूर पसरत जाणाऱ्या पाण्यावरच्या लहरींत मनसोक्त डुबावे
तारुण्याच्या उंबरठ्यावरून परत एकदा
बालपणीच्या हिंदोळ्यावर झोके घ्यावे, गाणी गावी
कुंहु कुंहु आवाजाच्या दिशेने परत एकदा तिला शोधावे
काळे ढग दाटू लागताच आईच्या पदराआड पुन्हा लपून राहावे.

Tuesday, 10 January 2017

एका कवितेचा जन्म

स्वप्नातल्या कळ्यानों ऊमलू नकाच केंव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जिवा"

जेष्ठ कवी कै. म.पा.भावे हे बेस्टमध्ये मुंबईला नोकरीला होते. बेस्टहाऊस, कुलाबाने बोरीबंदर ऑफीस सुटल्यावर रोज ते पायी चालत येत असत. सकाळी बसने ऑफीसला जात असत. संध्याकाळचं बसभाडं ते चालत जाउन वाचवत असत.

एक दिवस ऑफीसमधून व्ही.टी.ला(CST) येत असतांना फाउंटनजवळ ऑफीस मधल्या दोन मुली एकमेकांशी बोलत चालल्या होत्या. त्यांचे बोलणे त्यांना स्पष्ट ऐकायला येत होतं. एक मुलगी दुसरीला सांगत होती की, "आपलं एखादं स्वप्नं असतं ना, ते रंगवत असतानां खूप मजा वाटते, निरनिराळ्या कल्पनांमध्ये आपण रंगून जातो. असं वाटतं की हे कधी संपूच नये, पण तेच स्वप्न खरे झाले की, त्यातली गोडीच संपून जाते. ते अपूर्ण असते तेच छान असते". हा संवाद कानावर पडला आणि उत्स्फुर्तपणे त्यांना ओळ सुचली
    
"गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा " 

लोकल मध्ये शिरताक्षणी लायब्ररीच्या पुस्तकाच्या शेवटच्या  कोऱ्या कागदावर त्या ओळी कशातरी अक्षरात लिहून ठेवल्यात. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी कविता पूर्ण केली.

"स्वप्नातल्या कळ्यानों ऊमलू नकाच केंव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जिवा"

आशा भोसलेंच्या आवाजात हे गीत रेकॉर्डिंग झालं. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.


(वरील अमूल्य माहिती वृत्तपत्र कात्रणातून जतन केली आहे.)

Monday, 9 January 2017

निखारा

ती  वेगळ्याच रसायनाची बनलेली होती. अफलातून एक व्यक्तिमत्व होतं. कोणापुढेही न नमणारं, सर्वांसाठी आणि कच्या बच्यांसाठी झटणारं. माझी आई. तिच्याबद्दल लिहावे बोलावे तेवढे थोडेच. धुळे जिल्ह्यातील तामसवाडी या खेडेगावांत तिचं बालपण खडतरच गेलं होतं. आपलं जीवन क्षणभंगुर आहे असं तिला कधीही वाटलं नाही. गरिबी ही तिच्या पाचवीला पुजलेली जणू. घरात कुणी नोकरीला नाही, दिड रुपया रोजाने शेतात  काम करून तीन लेकरांचा प्रपंच कसा चालविला असेल हे आतापर्यंत मला न उलगडलेलं कोडंच आहे. कोणापुढे हात पसरवायचं नाही, कष्ट करून जगण्याचं बाळकडू प्यालेली. करारी आणि जिद्दी स्वभावाची तितकीच ती प्रेमळ होती. आपल्या मुलगा शिकावा, मोठा ऑफिसर व्हावा अशी ती आपल्या गावांतील लोकांना जिद्दीने सांगत असे. तिने आपल्या कुटुंबावर कधीच आणि कोणत्याही प्रकारे आंच येऊ दिली नाही. तशी ती आपल्या कुटुंबाचं संरक्षक ढालच होती. तिचं पुरुषासारखं धाडस करण्याचं रूप आठवतंय. म्हणून तर जळता निखारा तळहातावर घेऊन भर दुपारी रण रणत्या उन्हात अनवाणी पायांनी कामासाठी हिंडण्याचं धाडस तिच्यात होतं. तिचं आयुष्य असच रखरखीत वाळवंटा सारखं, ते ही तिनं फुलविलं. तिचं आयुष्याचं मोजमाप मोजक्या शब्दात बांधणं अवघड आहे. तिने आपल्या मुलांसाठी आपल्या अन्न वश्र  निवारा या गरजाही मर्यादित ठेवल्या होत्या. आणि म्हणूनच तिने कमळाच्या द्रोणातून भरऊन आपल्या मुलाचं संगोपान केलं.  अखेर तिची जिद्द पूर्ण झाली. तिच्या कष्टाला पालवी फुटली. जेंव्हा जेंव्हा मी माझ्या गावी धामणगांवाला जातो तेंव्हा तेंव्हा तीचा मुलगा म्हणजे भागाबाईचा  मुलगा म्हणूनच माझी ओळख निर्माण होते.


जळता निखारा

ओल्या वाळूत
रूतलेलं शिपलं
तिनं उचललं
अन अलगद छातीशी धरलं
आयुष्यभर त्याला
तळहातावर फोडासारखं जपलं
कधी दगड कपारी होऊन
दिली झऱ्याला अलगद वाट
कधी मंद वारा होऊन
फुलाच्या कळीसंगें केली कुजबुज
पण कधी झाडाची साल
तर कधी बैलगाडीची आर
कधी गर्द झाडीतली पांढरी पाऊलवाट
दुथडी भरलेली जशी थंडीची लाट
वरुळातली सळसळती नागीण
तिच्या कुऱ्हाडीला तलवारीची पात
अशी डरकाळी वाघीण
कोण कशाला जाईल तिच्या
जबड्यात घालायला हाथ



लाट

काही दिवसांपूर्वी य.दि. फडके यांचं कालिंदीच्या तिरावरती हे पुस्तक हाती पडलं. ते पुस्तक वाचून हाता वेगळं केलं. पुस्तकातल्या मंतरलेला दिवस या कथेत येअर-होस्टेस शिरींन करंजिया ही रस रसीत रूपवतीकडे  कॉलेजच्या मुलांना शिकवणारे जोशी सराचं लक्ष वेधलं जातं. शिरींन दिसली की, तिच्या मोहक हाचालीचा, शब्दांचा अधिक अर्थ लावून तर्क वितर्क करण्याचा त्यांना छंदच लागतो. एका प्रसन्न सकाळी सुटीच्या दिवशी जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर शीरींन त्यांच्या नजरेस पडते. तिच्या कमनीय आकृतीच्या मोहक हालचालींना साथ कारणार तिचं स्मित पाहण्यासाठी त्यांनी आपल्या स्वतः चालण्याचा वेग कमी करणं, असं भान हरपून टाकणारं , झपाटलेलं य.दि.फडकेंचं  लेखनातील प्रतिभा मनाला भुरळ पाडते आणि पुस्तक हातचं वाचून संपल्याशिवाय सुटत नाही. माझे आवडते लेखक माननीय य.दि. फडके यांचं कृतज्ञपूर्वक स्मरण करून, कथेचा काही अंश काव्य रूपात मांडण्याचा हा थोडासा प्रयत्न केला आहे.        

भुर भुर उडणारे बंडखोर केस तिचे
वाऱ्याशी संगत करित होते
लगट करणाऱ्या
पावसाच्या
थेंबाला
केंव्हाच तिने
झिडकारले होते
खांद्यावरचा पदर तिला
राहून सावध करित होता
पण  कमरेभोवती  वाऱ्याने
केंव्हाच विळखा घातला होता
धीटाईने लाटाही सामील झाल्यात
अलिंगनासाठी त्याही आतुर झाल्यात
माडांची  प्रौढं वाकून  वाकून बघत होती
चहाडीखोर आपआपसात कुजबुजत होती
मोहक हालचालीचं तिचं रूप न्याहळन्यासाठी
मीही  माझ्या  चालण्याचा वेग जरा मंद केला होता

Saturday, 7 January 2017

वाटाडेंचे आभार मानायचे राहून गेलेत.

तिने मला जन्म दिला. तीने मला आकार दिला. आपलं आयुष्य हे सुंदर शिल्प आहे असं तीने मला आयुष्याबद्दल सांगितलं. हे शिल्प तीने कसं घडवलं ही फार मोठी कहाणी आहे. जसं त्या काहाणीची फार फार वर्षांपूर्वी एक ................अशी सुरुवात करायला हवी, पण नाही . ती पौर्णमेची रात्र होती. रात्री साडेबारा एकचा सुमार होता. अम्ब्युलन्स चांदण्या रात्रीच्या अंधारात धावत होती. वाट वळणाची जरी असली तरी तो डांबरी रस्ता होता. ड्रायव्हरला गाडी चालविण्यात कसलीही अडचण येत नव्हती. चारहीबाजूनी भयाण जंगल असलं तरी खिडकीतून चंद्र साक्षीला गाडीबरोबर धावत होता. जणु काय तो माझ्या आईची काळजी घेण्यासाठी आमच्याबरोबर येत होता. त्या रात्री मी माझ्या आईचं प्रेत घेऊन जात होतो. मुंबईवरून माझ्या गांवी, धामणगांवी. पौर्णमेची रात्र चिरत चिरत गाडी वेगाने धावत होती. डोंगराच्या कडेने वळणावर, तेवढ्यात ड्रायव्हरने अचानक करकचून ब्रेक लावलेत. अम्ब्युलन्स जागच्या जागी उभी राहिली. गाडीचा मागचा टायर पंक्चर झाला होता. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला. मी गाडीतून खाली उतरलो. ड्रायव्हर काय झाले ते चेक करू लागला. कदाचित त्याच्या लक्षात आले होते . गाडीचे चाक बदलण्याशिवाय पर्याय नाही म्हणून तो केविलवाणी धडपड करत असतांनाच अम्ब्युलन्सच्या मागे एक ट्रक करकचून उभा राहिला. डोळ्याची पापणी लवू न देता झपकन पाच ते सहा जण टॉमी, पहऱ्या आणि इतर सामान घेउन खाली उतरलेत. त्यांनी आम्हाला लुटण्यासाठी घेरले आहे. आणि मी प्रचंड घाबरलो. हे वाटाडे आम्हाला लुटणारच प्रथमदर्शनी असच वाटलं. त्यांनी आमच्या मनाचा अंदाज घेत सांगितलं, घाबरू नका. आता पाच मिनिटाच्या आत चाक बदलवून देतो. अर्ध्या तासापासून आम्ही तुमच्या गाडीच्या पाठीमागेच आहोत. जणू देवानेच त्यांना तिच्यासाठी पाठविले होते. मनापासून हाथ जोडले. परमेश्वरा खरंच तू इथेच कुठेतरी माझ्या जवळपास आहे. आज कोणाच्यातरी रूपात तू माझी चूक मला दाखवलीस आणि धावून आलास. मी तुझा खूप आभारी आहेस. हे सर्व खाली काय घडते आहे ते, माझी पत्नी अम्ब्युलन्सच्या खिडकीतून वाकून बघत होती.कदाचित दुसऱ्या खिडकीतून आई बघेल अशा आशेने मी खिडकीकडे बघितले. पण आई तर चिरकाल निद्रा अवस्थेत होती. सर्व जण परत आम्ही गाडीत जाऊन बसलोत. माझ्या बरोबर माझी पत्नी, बहीण निर्मला, माझे सासू सासरे व मी स्वतः असे पाच जण नव्हे माझी आई धरून सहा जण होतो. परत अँम्ब्युलन्सचे दिवे बंद करून गाडी पुन्हा सावकाश धावू लागली. थोडे अंतर राखून सख्यया भावासारखा ट्रक आमच्या अंबुलन्सच्या पाठीमागून धावत होता. जणू सांगत होता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जस जशी अम्ब्युलन्स पुढे जात होती तस तसा मागील आयुष्याचा प्लॅटफार्म माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला. भयाण जंगलातून निर्मनुष्य रोड,  धावपट्टी पण एकही विमान नाही. खाली रेल्वेचा प्लॅटफॉर्म, जणु कोळशाचे इंजिन जास्तच काळवंडलेले.संथ समुद्र आणि अचानक उफळणारी त्सुनामी लाट आणि वायुवेगाने पुढे येऊन !किनारा गाठावा ! कांद्याची पापुद्रे एकेक उलगडत जावेत आणि मध्यभागी असलेल्या गाभ्याकडे सोलत जावे. तसा मागील जीवनपट उलगडत गेला. वेलीने झाडाला विळखा घालून मिठी मारली होती परंतु झाडाने वाढण्याचे थांबले होते. वेलीने पिळवून एकवटलेले विळखे काढायला सुरुवात केली होती. एक एक विळखा सुटत होता. आयुष्यभर आपल्या चिमुकल्यांसाठी गावातले धुणी, बाळंतपणे आणि पोट चोळण्यासारखी सतत आयुष्यसंपेपर्यंत तिने कामे केलीत. आणि अचानक एके दिवशी तिच्याच पोटात दुखायला लागले. तिला होणाऱ्या वेदना मला सहन होत नव्हत्या. आयुष्यभर मी लोकांची पोटे चोळलीत अन आता माझंच पोट दुखायला लागलंय. हे तिचे शब्द. तिच्या बोलण्यातून, शब्दांतून तिला होणाऱ्या वेदना मला असह्य करीत होत्या. पण नियतीला भलतेच मंजूर होते त्याची मी कल्पनाही करू शकलो नाही. कारण आई बाळाला कधीच सोडून जाऊ शकत नाही अशीच लहानपणापासून माझी भावना होती. पण कळ्यांना हे कधीच माहीत नसतं की कळ्याचं रूपांतर फुलात होऊन तेही कोमेजनार असतं. जातांना मला सांगून गेली , मी काही दिवसासाठी तुझ्याबरोबर आहे. मी गेल्यानंतर रडत बसू नको. मी जाईन परंतु, पुढच्या जन्मी मी तुझीच आई होईन. झालं माझं छान जगून. तेंव्हापासून तिचं सर्व शिस्तबद्ध होत गेलं. शेवटपर्यंत तिच्या चेहऱ्यावर कसलंही दुःख नव्हतं किंवा तिचा कशातच जीव अडकत नव्हता. तिचं वजन कमी कमी व्हायला लागलं. पण तिच्या चेहऱ्यावर शांत स्मिथ होतं. हळू हळू अन एक दिवस तिचं बोलणं बंद झालं. फक्त डोळ्यांनी माझ्याकडे एक टक लावून बघत होती. जणू तिचे डोळे सांगत होते, मी संगीतलना तुला माझ्यानंतर रडू नकोस. आनंदात रहा. परंतु माझी आशा वेडी होती की आई आपल्या मुलाला सोडून जाणार नाही. शेवटी तिचे डोळे पापण्या हळू हळू मिटत गेलेत. परंतु श्वास चालूच होता. तिने माझ्याकडे बघण्याचे कायम स्वरूपाचे बंद केले. मी सैरभैर झालो. मला काही कळेना कि, मी काय करू, कसं बोलू,  कुणाला सांगू. दुसरा दिवस उजाडला. आई स्तब्ध झोपली होती.  कुठल्याही वेदनेशिवाय , तितक्याच मूक आणि सहजपणे आणि अवघेची झाला देह ब्रम्हे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.

षड्यंत्र

षड्यंत्र रचलं गेलं
रात्रीच्या गर्भात
त्सुनामी लाट सामील झाली
दूर महासागरात
शिरलं वारुळात पाणी
नागीणच ती
चवताळली
केला किनारा थयथयाट
तृप्त नाही झाली जणू
लुप्त होऊनि तिथे
वायुवेगाने धडकली
इवल्याश्या माझ्या दारात
होऊनी आई तुझीच मी
पुढच्या जन्मी बाळा
रजा दे मला तू
अखेरचा श्वास मोकळा
वचन दिधले मला अन
अवघेचि झाला देह ब्रम्हे
मी अन बापड्या
झालो आई विना भिकारी.