Saturday, 7 January 2017

वाटाडेंचे आभार मानायचे राहून गेलेत.

तिने मला जन्म दिला. तीने मला आकार दिला. आपलं आयुष्य हे सुंदर शिल्प आहे असं तीने मला आयुष्याबद्दल सांगितलं. हे शिल्प तीने कसं घडवलं ही फार मोठी कहाणी आहे. जसं त्या काहाणीची फार फार वर्षांपूर्वी एक ................अशी सुरुवात करायला हवी, पण नाही . ती पौर्णमेची रात्र होती. रात्री साडेबारा एकचा सुमार होता. अम्ब्युलन्स चांदण्या रात्रीच्या अंधारात धावत होती. वाट वळणाची जरी असली तरी तो डांबरी रस्ता होता. ड्रायव्हरला गाडी चालविण्यात कसलीही अडचण येत नव्हती. चारहीबाजूनी भयाण जंगल असलं तरी खिडकीतून चंद्र साक्षीला गाडीबरोबर धावत होता. जणु काय तो माझ्या आईची काळजी घेण्यासाठी आमच्याबरोबर येत होता. त्या रात्री मी माझ्या आईचं प्रेत घेऊन जात होतो. मुंबईवरून माझ्या गांवी, धामणगांवी. पौर्णमेची रात्र चिरत चिरत गाडी वेगाने धावत होती. डोंगराच्या कडेने वळणावर, तेवढ्यात ड्रायव्हरने अचानक करकचून ब्रेक लावलेत. अम्ब्युलन्स जागच्या जागी उभी राहिली. गाडीचा मागचा टायर पंक्चर झाला होता. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला. मी गाडीतून खाली उतरलो. ड्रायव्हर काय झाले ते चेक करू लागला. कदाचित त्याच्या लक्षात आले होते . गाडीचे चाक बदलण्याशिवाय पर्याय नाही म्हणून तो केविलवाणी धडपड करत असतांनाच अम्ब्युलन्सच्या मागे एक ट्रक करकचून उभा राहिला. डोळ्याची पापणी लवू न देता झपकन पाच ते सहा जण टॉमी, पहऱ्या आणि इतर सामान घेउन खाली उतरलेत. त्यांनी आम्हाला लुटण्यासाठी घेरले आहे. आणि मी प्रचंड घाबरलो. हे वाटाडे आम्हाला लुटणारच प्रथमदर्शनी असच वाटलं. त्यांनी आमच्या मनाचा अंदाज घेत सांगितलं, घाबरू नका. आता पाच मिनिटाच्या आत चाक बदलवून देतो. अर्ध्या तासापासून आम्ही तुमच्या गाडीच्या पाठीमागेच आहोत. जणू देवानेच त्यांना तिच्यासाठी पाठविले होते. मनापासून हाथ जोडले. परमेश्वरा खरंच तू इथेच कुठेतरी माझ्या जवळपास आहे. आज कोणाच्यातरी रूपात तू माझी चूक मला दाखवलीस आणि धावून आलास. मी तुझा खूप आभारी आहेस. हे सर्व खाली काय घडते आहे ते, माझी पत्नी अम्ब्युलन्सच्या खिडकीतून वाकून बघत होती.कदाचित दुसऱ्या खिडकीतून आई बघेल अशा आशेने मी खिडकीकडे बघितले. पण आई तर चिरकाल निद्रा अवस्थेत होती. सर्व जण परत आम्ही गाडीत जाऊन बसलोत. माझ्या बरोबर माझी पत्नी, बहीण निर्मला, माझे सासू सासरे व मी स्वतः असे पाच जण नव्हे माझी आई धरून सहा जण होतो. परत अँम्ब्युलन्सचे दिवे बंद करून गाडी पुन्हा सावकाश धावू लागली. थोडे अंतर राखून सख्यया भावासारखा ट्रक आमच्या अंबुलन्सच्या पाठीमागून धावत होता. जणू सांगत होता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जस जशी अम्ब्युलन्स पुढे जात होती तस तसा मागील आयुष्याचा प्लॅटफार्म माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला. भयाण जंगलातून निर्मनुष्य रोड,  धावपट्टी पण एकही विमान नाही. खाली रेल्वेचा प्लॅटफॉर्म, जणु कोळशाचे इंजिन जास्तच काळवंडलेले.संथ समुद्र आणि अचानक उफळणारी त्सुनामी लाट आणि वायुवेगाने पुढे येऊन !किनारा गाठावा ! कांद्याची पापुद्रे एकेक उलगडत जावेत आणि मध्यभागी असलेल्या गाभ्याकडे सोलत जावे. तसा मागील जीवनपट उलगडत गेला. वेलीने झाडाला विळखा घालून मिठी मारली होती परंतु झाडाने वाढण्याचे थांबले होते. वेलीने पिळवून एकवटलेले विळखे काढायला सुरुवात केली होती. एक एक विळखा सुटत होता. आयुष्यभर आपल्या चिमुकल्यांसाठी गावातले धुणी, बाळंतपणे आणि पोट चोळण्यासारखी सतत आयुष्यसंपेपर्यंत तिने कामे केलीत. आणि अचानक एके दिवशी तिच्याच पोटात दुखायला लागले. तिला होणाऱ्या वेदना मला सहन होत नव्हत्या. आयुष्यभर मी लोकांची पोटे चोळलीत अन आता माझंच पोट दुखायला लागलंय. हे तिचे शब्द. तिच्या बोलण्यातून, शब्दांतून तिला होणाऱ्या वेदना मला असह्य करीत होत्या. पण नियतीला भलतेच मंजूर होते त्याची मी कल्पनाही करू शकलो नाही. कारण आई बाळाला कधीच सोडून जाऊ शकत नाही अशीच लहानपणापासून माझी भावना होती. पण कळ्यांना हे कधीच माहीत नसतं की कळ्याचं रूपांतर फुलात होऊन तेही कोमेजनार असतं. जातांना मला सांगून गेली , मी काही दिवसासाठी तुझ्याबरोबर आहे. मी गेल्यानंतर रडत बसू नको. मी जाईन परंतु, पुढच्या जन्मी मी तुझीच आई होईन. झालं माझं छान जगून. तेंव्हापासून तिचं सर्व शिस्तबद्ध होत गेलं. शेवटपर्यंत तिच्या चेहऱ्यावर कसलंही दुःख नव्हतं किंवा तिचा कशातच जीव अडकत नव्हता. तिचं वजन कमी कमी व्हायला लागलं. पण तिच्या चेहऱ्यावर शांत स्मिथ होतं. हळू हळू अन एक दिवस तिचं बोलणं बंद झालं. फक्त डोळ्यांनी माझ्याकडे एक टक लावून बघत होती. जणू तिचे डोळे सांगत होते, मी संगीतलना तुला माझ्यानंतर रडू नकोस. आनंदात रहा. परंतु माझी आशा वेडी होती की आई आपल्या मुलाला सोडून जाणार नाही. शेवटी तिचे डोळे पापण्या हळू हळू मिटत गेलेत. परंतु श्वास चालूच होता. तिने माझ्याकडे बघण्याचे कायम स्वरूपाचे बंद केले. मी सैरभैर झालो. मला काही कळेना कि, मी काय करू, कसं बोलू,  कुणाला सांगू. दुसरा दिवस उजाडला. आई स्तब्ध झोपली होती.  कुठल्याही वेदनेशिवाय , तितक्याच मूक आणि सहजपणे आणि अवघेची झाला देह ब्रम्हे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.

षड्यंत्र

षड्यंत्र रचलं गेलं
रात्रीच्या गर्भात
त्सुनामी लाट सामील झाली
दूर महासागरात
शिरलं वारुळात पाणी
नागीणच ती
चवताळली
केला किनारा थयथयाट
तृप्त नाही झाली जणू
लुप्त होऊनि तिथे
वायुवेगाने धडकली
इवल्याश्या माझ्या दारात
होऊनी आई तुझीच मी
पुढच्या जन्मी बाळा
रजा दे मला तू
अखेरचा श्वास मोकळा
वचन दिधले मला अन
अवघेचि झाला देह ब्रम्हे
मी अन बापड्या
झालो आई विना भिकारी.

No comments:

Post a Comment