Tuesday, 17 January 2017

अजून येतो वास फुलांना, या मातीचा गंधच वेगळा

डोंबिवलीत सर्वच जातीधर्माचे लोक इथे अगदी अनंत काळापासून गुण्या गोविंदाने राहत आहेत. त्या काळापासून डोंबिवली शहराला कुठलाही सोस नाहीं कीं जोजार नाही. या शहरात कुठलेही प्रेक्षणीय स्थळ नाही. पाहुणे रावळे आलेत तर त्यांना बाहेर घेऊन जायची पंचायत होते. मोठमोठे गार्डन्स जरी नसले तरी मिनी गार्डन्स जरूर आहेत. ती चिली-पिल्यानांच पुरत नाहीत. तरी इथल्या बिचारे जेष्ठ नागरिकांची कुठलीही तक्रार नसते. जिथे छोटासा कट्टा मिळेल तेथे बसून एक सर्जनशीलतेचा आविष्कार त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच झळकत असतो. मोठमोठे रस्ते तर नाहीतच परंतु खड्ड्यांचीही कमतरता नाही. त्याच्यात भरीस भर म्हणून रस्त्याच्या कडेने कुठेही विलोभनीय पार्कींग दृश्य बघायला मिळते. म्हणूनच डोंबिवलीकरांची मानसिकता जेवढी कणखर तेवढी मजबूत देखील आहे. हीच मानसिकता प्रबळ होऊन नोव्हेंबर 2016 च्या नोटबंदीमध्ये अनुभवास मिळाली. डोंबिवलीकरांनी अगदी शांतपणे आठ आठ तास बँकांच्या उन्हेरी अंगणात रांगेत उभे राहून सरकारला दाखून दिले की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जेंव्हा ह्याच सहनशीलतेचा चेंदामेंदा लोकल ट्रेन मध्ये चढतांना आणि प्रवास करतांना होतो तेंव्हा हाच डोंबिवलीकर घरी वापस येतांना हुश्शss सुटलो बुवा एकदाचा अशी प्रतिक्रिया देखील देत नाही. म्हणूनच....... आहे मनोहर तरी हे सुनीता देशपांडेंनी लिहिलेल्या पुस्तकाचं अलंकारिक उपमेचं नांव या शहराला शोभते. ह्याच शहरात श.नां. नवरे मोठे लेखक वास्तव्याला होते. एकदा योगायोगाने हॉटेल मॉडर्न कॅफे मध्ये माझ्या समोरच स्नॅक घेण्यासाठी बसले असतांना एकच मिनीट ते माझ्याशी बोललेत पण माझा नाष्टा होऊनही मी त्यांच्यासमोर अर्धा तास बसून त्यांची सर्जनशीलता न्याहाळत होतो. म्हणूनच अजून येतो वास फुलांना, या मातीचा गंधच वेगळा.

ह्याच आटपाट डोंबिवली नगरात असंख्य सोसायट्या आहेत. त्यांची नांवे देखील काही खूप चांगली आणि सुंदर आहेत. जशी ललीत, सनराईज, कविता, केतकी, औदुंबर, सृष्टी आणि काही नांवे तर फारच भयानकच आहेत, कैलास धाम, वैकुंठ निवास, स्वर्ग अशी नांवे का ठेवतात तीच लोक जाणे.  आमच्या सोसायटीचं नांव आहे "शीत चंद्रलोक". इथे चंद्र जरी राहत नसला तरी वर्षभरातून होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचा वावर सोसायटीतच असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सुद्धा विविध खेळांचे नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जातात. होळी, दहीहंडी, पाडवा हे सण उत्स्फूर्तपणे साजरे केले जातात. दिवाळी पहाट शितचंद्रलोक सोसायटीचं खास आकर्षण आहे. या कार्यक्रमाचं वर्णन कुणी तरी खूप छान केलं आहे. केंव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली । उठी श्रीरामा पहाट झाली । पूर्व दिशा उमलली । उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माउली. अभंग्य स्नान करून भल्या पहाटे प्रसन्न वातावरणात दिवाळी पहाटचा कार्यक्रमाचा आनंद लुटला जातो. ह्या कार्यक्रमात सोसायटीतील कलाकारच शब्द सुरांची मेजवानी पेश करतात. ह्या वर्षी शोभा गावडे, साक्षी सनगारे, महेश पोंक्षे, तेजस कांडके, साधना भुवडं, गौरी गोठीवरीकर, समता पावसकर आणि भारत कांडके यांनी भाग घेतला. या कार्यक्रमात विविध गाण्याचे पदर उलगडले गेलेत. मी आई भवानी तुझे लेकरू, मला हे दत्त गुरु दिसले, सूर तेच छेडीता, मी कुठं म्हणालो मला परी मिळावी, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, सांज ये गं खुळी सावळी सावळी ह्या गाण्यांचे सोसायटीतील कलाकारांचे स्वर उलगडलेत. परंतु मागील वर्षी श्रीयुत गडगीळांनी गायलेलं शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुन चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा, हे गाणं अजून स्मृतीत दडून बसलं आहे. शीत चंद्रलोकमध्ये अजून एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं इंद्रधनुष्य चांगलंच उमटलं आहे. "शेकोटी" या कार्यक्रमात वांग्याचं भरीत, पिठलं भाकर, आणि हिरव्या मिरचीचा लसूण शेंगदाणे घालून केलेला ठेचा हा शीत चंद्रलोकच्या सख्या यांच्या कडून शेकोटी कार्यक्रमात अप्रतिम जेवणाचा नजराणा पेश केला जातो. शेवटी मिरचीचा ठेचा बायका का करतात याचं उत्तर कोणत्याही पुस्तकात सापडत जरी नसले तरी नवरे मंडळीनां याच उत्तर चांगलंच माहीत असूनही ते  फार चवीने हा ठेचा फस्त करतात.

हेमंत ऋतू संपून हवी हवीशी वाटणारी शिशिराची पानगळ चालू झालेली असते. थंडी मी म्हणत असते. झाड अन झाड नवांकुरानी सजलेलं. सर्वानाच वार्षिक सांस्कृतिक  कार्यक्रमाचे वेध लागलेले असतात, निमित्त असतं वार्षिक श्री सत्यनारायणाची पूजा. याच कडाक्याच्या थंडीत नाटकाची रिअर्सल, खेळांची लगबग शीत चंद्रलोक सोसायटीत सुरु झालेली असते. नाही म्हटलं तरी हे शीत चंद्रलोकचं वार्षिक स्नेहसम्मेलनच असतं आणि सगळीकडे फुल टू चं वातावरण असतं. वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाची  परंपरा 1994 पासून अखंड अविरतपणे चालू आहे.

सत्यनारायणाची पूजा नव्या जोडप्याच्या हातांनी केली जाते. साधू वाण्याची गोष्ट आणि घालीन लोटांगण वंदीनं चरण संपल्या संपल्या नव्या नवरीने नांव घेण्याची बायकांमध्ये कुजबूज सुरु होते आणि तीथूनच सुंदर नांव घेण्याचं चांगली प्रथा सुरु झाली. सोनियांच्या ताटात मोत्यांच्या राशी, किरणरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी. नितळ पाण्यातलं प्रतिबिंब आणि तेही मूळच्या रचनेपेक्षा सुंदर. किती सुंदर सुरुवात झाली होती मागच्या वर्षी. या छपन्न सदस्यांच्या सोसायटीत कलाकारांची रेलचेल तर आहेच. पण कलाकार तयार करणारे कलादेवतेचे पुजारी सुद्धा इथे राहतात. भजन आणि स्रियांच हळदी कुंकू समारंभ हे या कार्यक्रमाचं एक आकर्षण असतं. दरवर्षी नव नवीन नाटक बसविले जाते आणि सोसायटीतील कलाकारच त्या नाटकात भाग घेतात. बऱ्याच कलाकार मुली लग्न होऊन सासरी गेल्यात, याच रंगमंचावरचे काही कलाकार परदेशात नोकरी निमित्त स्थायिक झालेत. नव नवीन कलाकारांचा उदय होतोच आहे. म्हणूनच तर अजूनही वाहतात वारे, फुलांना अजूनही तोच गंध आणि आपल्या सोसायटीत गुलाब ताजे फुलतात तरी कसे. या अप्रतिम प्रश्नाचं उत्तर अजून तरी सापडलेले नाही.

खाली दिलेली नाटकांची यादी जरी वरचेवर न्याहाळली तरी लक्षात येईल की काही वर्षांनी कोणत्यातरी पुस्तकात त्याची नोंद जरूर होईल. आभास, वयंम मोठंम खोटंम, चिठ्ठी आयी है, येरे बैला, वैभवशाली महाराष्ट्राची करूण कहाणी, दंत कथा , निश्चयाचा महामेरू, विनाशकले विपरीत बुद्धी, हा खेळ सावल्यांचा, अखेरचा सवाल, आमचं हे लफडं, ह्या मातीला गंध वेगळा, गुंतता हृदय हे , आधार की अडचण, यात्रा उत्तराखंडाची, ह्रिदम ऑफ लव्ह, अपहरण आणि जावयाचं बंड.

कलाकारांची नावे तरी किती घ्यावीत. प्रतिक, रोहित - नाटकाचा निर्माता आणि कॅप्टन ही दोघंच. दोघेही कॉमेडी किंग. कॉमेडी करण्याचं यांचं काम भागतं, पण प्रेक्षकांच्या पोटांची हसून हसून हे पूर्णपणे वाट लावतात. दिपाली, मनाली, रिया, अंतरा, सायली, अमृता, जागृती, उर्वी, प्रथमेश गीड्डे, प्रथमेश भुवड, मुकुल, अमित राणवसे, गाडगीळ, संकल्प, नेहा, तेजस, पावसकर, बिळस्कर, समीर इ. कंदीलाची काच ताडकन टीचावी तशी रांडीच्या या शब्दाला साहित्यिक शब्दाची ओळख करून देणारे श्रीयुत भुवडांनाच हे श्रेय जातं.  अखेरचा सवाल या नाटकात मिसेस गोठीवरीकर यांनी "मी नंदूची आई आहे हो असा टाहो फोडून कोंडून ठेवलेला श्वास जेंव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या पापण्यांच्या आत जाऊन बसतो, तेंव्हा एका फुलाला गाळतांना बघितलं अन त्या कळीचं फुलणच थांबलं, अशी त्यांची अवस्था झाली. कमीत कमी खर्च करून अतिशय कल्पकतेने आखणी करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला जातो. अर्थात त्याच्यामागे निस्वार्थपणे एक निळा सावळा झरा वाहत असतो. त्या झऱ्याच्या पाण्याला वाट कशी करून द्यावयाची हे श्रीयुत पोंक्षे आणि श्रीयुत कांडके बघत असतात. 1994 पासून पोंक्षे साहेबांनी आपलं योगदान देवून सांस्कृतिक कार्यक्रमाची ज्योत तेवत ठेवली. आणि 2003 मध्ये आपल्या सोसायटीत कांडके सरांचं आगमन झालं. सोसायटीतील एकंदरीत मुलांचा इंटरेस्ट आणि उत्साह बघून त्यांच्यातलाही लेखक जागा झाला. डी विंगच्या अंगणात त्यांनी एक छोटंसं रोप लावलं. वि.स. खांडेकरांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. श्रीकृष्णाने सत्यभामेच्या अंगणात पारिजातकाच्या झाडाची अशी काही मांडणी केली होती की, त्या झाडाची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडतील. त्या प्रमाणे ह्या रोपाचा वृक्ष होवून त्याच्या फांद्या सोसायटीच्या अंगणात पसारल्यात आणि प्रत्येक घरात कलाकार निर्माण झाला. हेच कलाकार मोठे होऊन आपल्या क्षेत्रात वेगाने पुढे जातात. झाडांना फुटलेल्या  नवअंकुरांची हिरवी पाने कधी झालीत त्या झाडांनाही कळलं नाही. त्यांचं क्षितिज त्यांना खुणवत असतं, आपण त्यांच्याकडे आदराने पाहत असतो. 2003 सालापासून अखंड नाट्यमालिका चालू झाली ती आजतागायत. कार्यक्रमाच्या शेवटी पारितोषिक वितरण समारंभ आणि या साऱ्या घटनाक्रमाकांच वेध घेऊन त्याचं शब्दांकन करणं व त्याचं पुष्प उलगडण्याचं भाग्य जरी मला लाभलं असलं तरी कार्यक्रमाचे शिल्पकार खरे सांस्कृतिक कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि त्यांच्या टिमचंच आहे. दरवर्षी सनगरे बंधूंनीं केलेली सत्यनारायण पूजेच्या मंदिराची सजावट आणि मिसेस फाटक यांना सत्यनारायण पूजेचा प्रसाद तयार करण्याचं मिळालेलं भाग्य, प्रसादाच्या रूपाने प्रभूंचे साक्षात दर्शनच होते.

प्र   = म्हणजे प्रभूंचे
सा = म्हणजे साक्षात
द  = म्हणजे दर्शन

______________________________________________________________

त्या सुंदर सकाळी

कोमल पहाट जागी झाली

सळसळणारी उबदार हवा

तुझ्या पापण्यांना स्पर्शून गेली

रूप तुझे न्याहळण्यासाठी

चंद्र अजूनी जागा

म्हणून तर

क्षितिजवरून येण्यासाठी

मला विलंब झाला

1 comment: