Wednesday, 11 January 2017

खोडकर, वा त्र ट

लहानपण देगा देवा असे म्हणतात पण लहानपणी आपण कसा मूर्खाचा अवतार होतों अन किती आचरट होतो याचं कुठे खुमासदार वर्णन अद्याप तरी मला वाचावयास मिळालेले नाही. लहानपणच्या गोड आठवणी असतातच पण काही  विचित्र आठवणी सुद्धा असतात.

नदीतल्या पाण्यावरचं जमलेलं शेवाळ अलगद बाजूला करून त्या नितळ पाण्यात आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाहावं आणि हळूच डुबकी मारून हव्या तेवढ्या बालपणीच्या आठवणींचा मागोवा घ्यावा. आपल्या आयुष्याचा मागील पानावर सहज नजर फिरवली तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही की खरोखर आपण इतके वर्षे जगलो. आपण काय करायला नको होते आणि काय करायला हवे होते. अन काय करायचं राहून गेलं. कधी सुसंस्कृतपणे वागलो तर कधी असंस्कृतपणे. कधी शाळेला मारलेली दांडी तर कधी आईशी खोटं बोललो. कधी मित्रांबरोबर पोहता येत नसतांना देखील डोहात उडी मारली. कधी दिवसातून थिएटरमध्ये चार चार फिल्म बघितल्या. कधी दीड दीड दिवस झोपून राहीलो. खिशात पैसे नाहीत म्हणून विना तिकीट ट्रेनने धुळे ते राजमाने प्रवास केला. सायकलच्या चाकात हवा नाही म्हणून धुळे ते धामणगांव पन्नास किलोमीटर पायी प्रवास केला. एखादी वेल कशी झाडावर वाकडी टिकडी वाढतच जाते, कारण तिच्या त्या स्वभावातच असतं. हरणाच्या पाडसासारखं तिच्या आई बरोबर सरळ न चालण्याचं वरदान त्याला मिळालेलं असतं. सारेच काही विचित्र आणि अनाकलनीय. एकदा कांद्याच्या भरलेल्या बैलगाडीवर लहान काका नानांबरोबर धुळ्याला गेलो असतांना, नानांनी बैलांच्या गळ्यातील जुला  बांधलेलं जोत काढताक्षणीच,  बैलांनी आपल्या माना पटकन काढून घेतल्या बरोबर बैलगाडीच्या दांड्याची दोन तुकडे झालीत. कारण बैलगाडी कांद्यानी भरलेली होती. अतिशय भयानक प्रसंग ओढवला होता. नांनानीं प्रसंगावधान साधून आपले पाय बाजूला केलेत. नाहीतर त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले असते. एवढा मोठा प्रसंग ओढवला असतांना सुद्धा आम्ही दोघे जण रात्रीला तमाशा बघण्यासाठी गेलोतच. हे तर फारच झालं बुआ. कोणाचाही धाक नसतांना माणूस कसा वागणार. खेड्यामध्ये गुरांच्या कळपातला बेशिस्त हुंदडणारा, लोंढण न अडकवलेला सांड असतो ना तसा. एकदा मोठ्या आण्णा काकांच्या शेतात भुईमूग पेहरणी चालू असतांना उजव्या हाताकडील बैलाच्या दोन्ही पायांच्या मांड्यामध्ये मी हाथ घातल्याबरोबर बैलाने मारलेली मांडीवर लाथ आठवली की अजून मांडीत कळा यायला सुरु होतात. शिवाजी हायस्कुल धुळे इथे दहावी वर्गात असतांना, एकदा शाळेत यायला उशीर झाला. राष्ट्रगीत चालू होतं म्हणून आम्ही गेटच्या आतच उभे राहिलोत. उशीर का झाला म्हणून याचं समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे हेडसरांनी हाकलून दिलं. म्हणून मी आणि माझा मित्र माफी न मागता सरळ राजकमल सिनेमागृहात पिंजरा पिक्चरला जाऊन सिनेमा बघितला. हे अतिशय अशोभनीय असेच होते. आईला वाटत होते की माझा मुलगा शहरात शिकायला आहे परंतु माझे प्रताप जर आईला कळले असते तर मला आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतात काम करावे लागले असते. धुळे राजेंद्र छात्रालाय वसती गृहात असतांना रूम मधील आम्ही सर्व जण रात्री नदीला पूर आलेला असतांना देखील नदी पार करून तमाशाला गेलोत. आणि सुपरिटेन्ड यांनी ठोठावलेली उपाशी राहण्याची एक दिवसाची शिक्षा ही त्यावेळी काळ्या पाण्याची शिक्षा वाटली होती. डोहात उडी मारल्यावर कश्या गटांगळ्या खात होतो हे आठवल्यावर अजूनही शरीरावर काटे उभे राहतात.राजमाने रेल्वे स्टेशन ते धामणगांव पाच मैल रात्री एक वाजता अमावस्येच्या दिवशी काळ्याकुट्ट अंधाऱ्या रात्रीत जंगलातून म्हसनवटीच्या मार्गाने रात्री दोन च्या सुमारास घरी पोहोचलो. त्यावेळी असे साहस करतांना काहीच वाटले नव्हते. परंतु ते आता आठवतांना आपण ते दिव्य कसे पार केले होते याचे याक्षणी फार आश्चर्य वाटते आहे. पुस्तकाची पाने भर भर उडून शेवटच्या पानावर आपण कधी येतो याचंही भान नसतं. कारण बरेच उन्हाळे पावसाळे निघून गेलेले असतात. मग गंगेत घोडं कसं न्हालं असा कोणालाही प्रश्न पडेल. त्याचं उत्तर केवळ एकच , आईने आयुष्यभर घेतलेले कष्ट आणि तिची तपस्या.

परत एकदा

परत एकदा ते बालपण हवे
काकांच्या खांद्यावर
बाबांच्या पाठीवर
परत एकदा निजावे खेळावे हिंदळावे
पहाटे आईच्या उबदार कुशीत परत एकदा शिरावे
आमराईत अन त्या केतकीच्या बनात दरवळणारा गंध व्हावे
शुभ्र पाण्याच्या झऱ्याखाली दगड होऊन निपचीत पडून राहावे
आईने घातलेली हाक धुडकावून
गोफणीतला दगड भिरकावून भल्या पहाटे ललकारावे
दूर दूर पसरत जाणाऱ्या पाण्यावरच्या लहरींत मनसोक्त डुबावे
तारुण्याच्या उंबरठ्यावरून परत एकदा
बालपणीच्या हिंदोळ्यावर झोके घ्यावे, गाणी गावी
कुंहु कुंहु आवाजाच्या दिशेने परत एकदा तिला शोधावे
काळे ढग दाटू लागताच आईच्या पदराआड पुन्हा लपून राहावे.

No comments:

Post a Comment