Saturday, 7 December 2019

कुठं नेवून ठेवायचा महाराष्ट्र माझा

माननीय श्रीयुत उद्धव साहेब, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला आहात. तुमचं कौतुक ही झालं. आता त्याप्रमाणे तुमचा बाणा, तुमचे प्रोजेक्ट्स, तुमची वाटचाल, तुमची कार्यपद्धती असायला हवी. चालू प्रोजेक्टस् वर स्थगितीचं लेबल चिटकवून काही साध्य होईल असे वाटत नाही, आणि तुमचे आकार घेत असलेले नवीन प्रोजेक्ट म्हणजे पार्कचे नांव बदलणे, युनिव्हर्सिटी चे नांव बदलणे, स्मारके उभारणे, शहरांची नांवे बदलणे, रस्त्यांना नवीन नांवे देणे अशा दुय्यम unproductive कामांना स्थगिती द्या. खेड्यातील शेतकरी ओला दुष्काळाने हैराण झाला आहे आणि राजा जवळ तुतारी पण वाजवायला नाही. मुख्यमंत्री पदाची शपथ घेवून बराच अवधी उलटला आहे तरी तुम्हाला मंत्रिमंडळ बनवायला वेळ लागतो आहे. एखादा माणूस परक्या घरात राहात असेल तर त्याच्यासमोर अडचणीच अडचणी असतात. दुसऱ्यांच्या घरी राहिल्याने आपले स्वातंत्र्य नष्ट होते. अशा वेळी मनुष्य आपल्या मर्जीने काहीही करू शकत नाही अशी तुमची अवस्था झाली आहे. मुंगी मानवाच्या घरात राहिली तरी ते घर तिचे घर होत नाही. ती त्यामध्ये आपले वारुळ करुन राहते, तसं तुम्हाला या तीन पक्षाच्या घरात स्वतःचे वारुळ तयार करावे लागणार आहे. चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली होती, परंतु आपला चाणक्य रिकाम्या न्हाव्याची कामे करतो आहे. त्यांना कमीत कमी विधायक कामे करायचा सल्ला द्या नाही तर वारुळाची माती व्हायला वेळ लागणार नाही.
 
मुंबईतून बाहेर आले म्हणजे महाराष्ट्रावर चौफेर नजर टाकता येईल, मोठमोठे प्रश्न आ काढून उभे आहेत. राजकारणात असंगाशी संग केली यां टिकाटिपणीचा मीडियावर जोरात पाऊस पडत आहे. पूर्वी गडकिल्ल्यांच्या तटबंदीला सुद्धा छोटया छोटया खिडक्या असायच्या, पण त्यांचा उपयोग शत्रूवर गरम तेल ओतण्यासाठी असायचा. आजच्या युगात अश्या तेल ओतीव खिडक्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजकाल राजकारणातल्या खिडक्यातून गरम गरम तेल एकमेकांच्या अंगावर रोज सर्रास ओतले जात आहे. परंतु आपण काय करत आहात याकडे महाराष्ट्र जनतेची आपल्यावर कडी नजर आहे.

सुभाषचंद्र बोस यांना एका मुलाखतीच्या वेळी स्टेशनमास्टर आणि स्कूलमास्टर यांच्यात काय फरक आहे असा प्रश्न विचारला गेला होता. आणि एका क्षणात त्यांनी उत्तर दिलं होतं.

Schoolmaster trains the minds, Stationmaster minds the trains

तुम्हाला यांच्यातून काय व्हावयास आवडेल आणि महाराष्ट्र कसा घडवायचा ते तुम्ही ठरवा.

जय महाराष्ट्र

Wednesday, 27 November 2019

शपथविधी सोहळा मुख्यमंत्र्यांचा

महाराष्ट्रात शेवटी पोरखेळ संपला एकदाचा,  पोरखेळ संपलाअसला तरी खरा खेळ आता रंगात येणार आहे. कोणी कोणाच्या मुसक्या आवळल्या, कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला. कोणाच्या नाड्या कोणाच्या हातात आहेत, कोणी कोणाची शपथ घेतली. कोणी माईंड गेम केला, आणि कोण आयजीच्या जीवावर बायजी उदार झाला. कोणी कोणाला मित्रता तोडण्यास भाग पाडले आणि कोणी स्वतःच्या हाताने आपले परतीचे दोर कापून घेतलेत. भरपूर प्रश्न डोक्यात घोंगावत असतील परंतु आता शांत राहणे गरजेचे आहे कारण उद्या तारीख 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवसेने तर्फे मुख्यमंत्री शपथ घेत आहेत.  प्रचंड मतभिन्नता असलेले सरकार उदयास येत आहे, की ज्यांनी जिभेच्या तलवारीने एकमेकांवर सपासप वॉर केले होते, ते आता एकत्र एका ताटात जेवणार आहेत. सरोवर किचड रहित हो तो ओ शोभा देता है, हे सुद्धा तितकेच खरे आहे. काहींना वाटतं खेळ संपला, पण राजकारणात खेळ कधीच संपत नाही. एक संपला की दुसरा सुरू होतो. जो पर्यंत खेळ आणि खेळाडू आहेत तो पर्यंत सामना होणारच. जनता मात्र आपला मतदानाचा हक्क बजावीत असते. एकदा दिलेले मत त्याला परत घेता येत नाही आणि मत परत घेण्यासाठी तसा कायदाही अस्तिवात नाही. सुरुवातीलाच महा शिव विकास आघाडीतील शिवसेनेने शिव हा शब्द गमावला. शिवसेनेने काय कमावलं आणि काय गमावलं हे रोज आपणास वर्तमान पेपरात वाचावयास मिळेल आणि येणारा काळ देखील सांगेल, त्यावेळेस सर्व्हे करण्यासाठी मिडियावाल्यांची गरज नसेल.

Saturday, 16 November 2019

देशका चौकीदार

राफेल विमान खरेदीत केंद्र सरकारला क्लीन चिट

राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप करणारे राहुल गांधी यांना जनतेने लोकसभा 2019 च्या मतदानद्वारे चांगलीच चपराक दिली आहे. त्यामुळे त्यांना परत माफी मागायला लावणे म्हणजे जनतेपर्यंत आवाज पोहचविणे असा अर्थ होतो.  कारण आपल्या देशात जनता अशी एक न्यायालय आहे की सुप्रिम कोर्टाचा निर्णय यायच्या अगोदरच जनता व्होटींग द्वारे न्याय देवून मोकळी होते. राहुल गांधींचं वक्तव्य "देशका चौकीदार चोर है" असा युंक्तीवाद किती फालतू आणि हीन दर्जाचा होता हे जनतेला मुळीच आवडले नव्हते. विशेष म्हणजे बुद्धीवाद्यांनाही त्यावेळेस बुद्धिभ्रंश झाला होता की काय, त्यांनीही या वक्तव्याविरुद्ध गिलिमिळी चूप केली. शोभेसाठी वापरात येणारे  पतंगाचे रंगीबेरंगी कागद किती तकलादू असतात हे न्यायालया द्वारे पुन्हा एकवेळा सिद्ध झाले. लोकशाहीचा धागा उलगडून बघितला तर सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखविणे हे विरोधी पक्षाचे धोरण असुच शकत नाही, पण पण सर्वच विरोधी पक्ष हे सारासार विसरून सरकारच्या चांगल्या गोष्टींना विरोध करण्यातच धन्यता मानत असतो. लोकशाहीची अशी जहरी विषवल्ली जनता छाटून टाकते.

तुकाराम गाथा .....

 मुखें सांगे भ्रमकथान । जन लोकाची कापितो मान॥1॥
 असत्य सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ॥ध्रु.॥
 कथा करितो ज्ञानाची । अंतरीं आशा बहु लोभाची ॥2॥
 तुका ह्मणे तो चि वेडा। त्याचें बहू उद्देश हाणावा ॥3॥

अमर्याद अशी गणितातली संख्या ज्यांनी वाचली नसेल, त्यांनी घोटाळ्यांची फिगर इन रुपीज वाचून बघावी. असे हे महा प्रचंड  घोटाळ्यांना सुद्धा क्लीन चिट मिळविण्यासाठी का कोणी प्रयत्न केले नाहीत, जनता मात्र अजून विसरलेली नाही. शतके नी शतके निघून जातील परंतु याची उत्तरे मिळणार नाहीत


Thursday, 14 November 2019

खुर्ची मुख्यमंत्र्यांची

पावसाळे काय बेडूक पण पाहतात, पण पिके मात्र शेतकरीच घेतो

साक्षर होण्यासाठी अगोदर शाळेत मुलाला घालावं लागतं, असं अशिक्षित आईवडिलांना सुद्धा सांगावं लागत नाही. त्याप्रमाणे मुख्यमंत्री होण्यासाठी त्याची पूर्व तयारी म्हणून आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणे ही भाग्याची गोष्ट होती, ती त्यांच्यासाठी शिकण्याची एक सुवर्ण संधी होती, एक चांगली opportunity चालून आली होती. डायरेक्ट मुख्यमंत्री होणं त्या कोवळ्या जीवाला पेलवलं नसतं. थोडक्यात दुसरा अखिलेश यादव महाराष्ट्राला झेलावा लागला असता.  परंतु शिवसेनेच्या आडमुठ्या वागणुकीमुळे ही संधी त्यांना घेता आली नाही. सात दशका पासून राज्य करत असलेल्या काँग्रेस घराण्यातील राहुल गांधींना सुद्धा अशी संधी अजून मिळाली नाही. परंतु समज आणि मुख्यमंत्रीपदाच्या हट्टापायी त्यांना आलेल्या संधीचे सोने नाही करता आले. वि.स. खांडेकर मिश्किलपणे म्हणतात, पावसाळे काय बेडूक पण पाहतात, पण पिके मात्र शेतकरीच घेतो. अशी सुवर्ण संधी त्यांना भविष्यात मिळेल की नाही हे येणारा काळचं सांगेल.

Tuesday, 29 October 2019

आपडी थापडी गुळाची पापडी

दुष्काळ कोरडा असो किंवा ओला, दोन्ही बाजुंनी शेतकऱ्याचच अमर्याद नुकसान होतं, तरी तो जनतेसाठी काबाड कष्ट करून साखर पिकविल्याशिवाय राहत नाही, मात्र दारू तयार करणाऱ्या कारखान्याला टाळं लागलेलं आपण कधी पाहिलं नसेल हे आश्चर्यच आहे !  म्हणतात ना दूध द्यायला गवळी घरी येतो पण मद्य प्यायला लोकं अड्ड्यावरच जातात. ह्या काही म्हणी नाहीत, तर हे निर्विवाद सत्य आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी काही पक्षाचे नेते जिभेला लगाम न देता, स्मशान भूमीला तोरण बांधून सजविण्याचे काम प्रामाणिकपणे करतांना दिसत आहेत. त्यांना वांग्याची मॅगी आवडते, का पापड दुधात बुडवून खायचा, हा ज्याचा त्यांचा प्रश्न आहे. आपण व्होटींग केलं ना ! बस, आता त्यांनी आपल्याकडे आपल्यासाठी एवढंच बाकी ठेवलं आहे, आपडी थापडी गुळाची पापडी !

1994 मध्ये यूएन च्या अधिवेशनात जेंव्हा पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व विरोधी पक्ष नेता अटलबिहारी वाजपेयीं यांच्याकडे सोपविले होते, तेंव्हा  विरोधी पक्ष नेता या भूमिकेतून वाजपेयींनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते, ते शब्द अजूनही आठवतात "पाकिस्तानके बैगैर हिंदुस्थान अधुरा है" परंतु आताचा आपला भारतीय विरोधी पक्ष फक्त एक नमुनाच आहे,  काश्मीर वर नाही ते बेताल वक्तव्य करून पाकिस्तानला आतंरराष्ट्रीय पातळीवर एक खाद्य तयार करून देवून मदत करत असतो.  कंहा राजभोज और कंहा गंगू तेली हे काही खोटं नाही. गेलेला मनुष्य वापस येणार नाही हे माहीत असून सुद्धा स्मशान भूमीला कुंपण बांधण्याची उठाठेव विरोधी पक्षातले रोज कोणिना कोणी रोजंदारी प्रमाणे करतो आहे हे आपल्या देशाचे आणि जनतेचं दुर्दैव आहे.


ट्रेन मध्ये एक भिकारी गुणगुणत चालला होता, मेरे देश की धरती, सोना उगले, उगले .....आणि दुसऱ्या बाजूला खिडकी जवळ आई आणि वडिलांच्या मांडीवर बसून दोन भावंडांचा खेळ रंगात आला होता, आपडी थापडी गुळाची पापडी ! आपडी थापडी गुळाची पापडी !!

Saturday, 28 September 2019

खिरापत

मुफ्त   मुफ्त   मुफ्त

परमेश्वराने निर्माण केलेल्या भुलभुलैयेत हितकारक सूत्र गुंफलेले असते, परंतु निवडणुकांवर आपला तिसरा डोळा ठेवून प्रचलीत राज्य सरकारे आपलं राज्य कंगाल झालं तरी चालेल आणि कोणताही सूत्र न साधता वारेमाप खिरापत वाटून आपल्या या कृत्रिम भुलभुलय्येत स्वहित साधायला सुरवात करते तेंव्हा  जागृत मतदाराने समजावे सत्ताधाऱ्यांची नजर आता आगामी निवडणुकांवर खिळली आहे. असंच एक दिल्लीचं आप पक्षाचं सरकार साडेचार वर्षे पायात घुंगरू बांधून, भारत सरकार आणि उप राज्यपाल च्या नांवाने थयथयाट करत होते हे साऱ्या भारतीयांनी पाहिले, आणि कलकत्त्याला ममता बनर्जींच्या रॅलीत हवी तशी भाषा शैलीला पीळ देऊन मोदी सरकारविरुद्ध अकडतांडव करून शेवटी लोकसभेच्या निवडणुकीत नाकावर आदळलं, बरं पायाखाली दिल्लीत सत्तेची वाळू होती म्हणुन वाचलं नाही तर धरणं धरायला जागा शोधावी लागली असती. दिल्लीत सातच्या सात जागांवर दावा करणाऱ्या आम सरकारची आम मधली कोय कुठं गायब झाली याचा अजून कोणाला प्रश्न पडला नाही हे एक आश्चर्यच आहे. देशाच्या एकशे चाळीस बेईमान लोकांची यादी वाचून दाखविणाऱ्या केजरीवाल साहेबांना या लोकांचा कसा मोह झाला कारण यात सत्तेचं बरबटलेले राजकारणाचं प्रदूषण मिसळलेलं आहे. आणि यांच्याशीच गठबंधनसाठी याचना करायला सुरुवात केली परंतु हवे तसे यश मिळाले नाही आणि भाजपला मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए ला 352 जागा मिळाल्यात. खडबडून जागे झालेल्या आप पक्षाला साक्षात्कार झाला आणि भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक वर पुरावा मागणाऱ्या केजरीवाल साहेबांनी, जम्मू आणि काश्मीरचे अनुच्छेद 370 आणि 35A रद्द झाल्यानंतर सुद्धा एक अवाक्षरही काढला नाही याचं आश्चर्य वाटून घेऊ नका. कारणही तसंच आहे. दिल्लीमध्ये सातच्या सात जागा हातातून निसटल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आम सरकारला कळून चुकले की दिली हातातून जाणार म्हणून सर्वच काही फुकटात वाटायला सुरुवात केली आहे. काम करणं वेगळं, विकास करणं वेगळं आणि फुकट वाटून निवडून येण्याची अपेक्षा धरणं म्हणजे राज्याची वाटचाल दिवळखोरीकडे जाणे असा होतो. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे महिलांसाठी मेट्रो प्रवास फ्री, 200 युनिट वीज बिल फुकट. समजा मेट्रो आणि वीज कंपन्या जर तोट्यात गेल्या तर सेंट्रल गव्हर्नमेंट मदत करत नाही म्हणून  मोदी सरकारवर खापर फोडून धरणे धरायला आपण मोकळे. करोडपतीची मुलगी फुकट मेट्रो ट्रेन मधून प्रवास करणार आणि पोटासाठी रोजंदारी करणारा कामगार हा पैसे मोजून प्रवास करणार अशी गटार्च्छाप राजकारण करण्यात देशाची वाट लागतेच आणि जन कल्याणाच्या योजना कश्या राबवाव्यात, आणि पैसा आणणार कोठून याचं गणित कसं सोडविणार. मतदारांना लुभवण्यासाठी काँग्रेस पक्षाने सुध्दा अशीच फसवी 72000 रुपये प्रति वर्षी देण्याची योजना मतदारांच्या अजून स्मरणात आहे. भाजप सुद्धा अशा खिरापती वाटण्यात आघाडीवर आहे. शेवटी राजकारणाचं ढोंग करता येतं पण पैशाचं सोंग नाही करता येत.

Sunday, 1 September 2019

महारथी म्हणतात, अजून मोठी किंमत चुकवावी लागेलं !

अनुच्छेद 370 आणि 35A रद्द केल्यामुळे अजून मोठी किंमत चुकवावी लागेल असा विखारी अनुमान आपले बुद्धिवादी  लावत बसले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत सत्तर वर्षात बेचाळीस हजार लोक मृत्युमुखी पडलेत परंतु या आकड्याचं गांभीर्य बुद्धिवादी लक्षात घेत नाहीत. किराणा दुकानंत छताला लटकलेले रंगबेरंगी कागद मोठे आकर्षित दिसतात खरे पण वास्तवात ते किती तकलादू असतात याची प्रचिती रोज या ना त्या सियासात करणाऱ्या नेते आणि बुद्धीवादींकडून मिळत आहे. आपल्याच जवानांवर दगडफेक करणाऱ्यांवर जवानांनी अजूनपर्यंत गोळीबार केला नाही, हे जवानांचे ऋण फेडणार तरी कसे असा प्रश्न या बुद्धिवाद्यांना का पडत नाही हे भारताचे दुर्दैवच.

"काश्मिरी जनतेसाठी अनुच्छेद 370 हे मानसिक आधार आणि सुरक्षेचे कवच होतं" असे म्हणणाऱ्यांची संख्या आपल्या देशात कमी नाही. असा कोरडा आवळा काढून आपल्या बुद्धीचे चुकीचे पैलूंना बिनबुडाच्या पात्रात सोडून देतांना आपला घसा मोकळा करून घेतात. परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की, सुरक्षा पण आपलीच होती आणि मानसिक आधार पण आपलाच असे असतांना अशा पोकळ निष्ठतेच्या गोष्टी करण्यात यांना कुठला मानसिक आनंद मिळतो.

जम्मू आणि काश्मीर मधला मागील राजकीय अवकाश हा असाच स्वार्थी आणि घरेलू होता, राष्ट्रहित पेक्षा स्वहित जपणारा होता. जनहीतकडे कधीच लक्ष दिले गेले नव्हते. ही लूट पाच वर्षांपासून नव्हे तर गेल्या सत्तर वर्षांपासून बिनबोभाटपणे चालू होती म्हणूनच काही लोकांना वाटतं की गरीबाने गरीबच राहावे, शेतकऱ्याने शेतीच करावी, चांभाराने वहाणा च शिवावा आणि झोपडीत राहणाऱ्याने कधी विमानात बसूच नये, परंतु हा मूर्खासारखा संकुचित स्वार्थी विचार जगाने कधीच झिडकारून दिलेला आहे.

केंद्राने स्वतःच्या मर्जीनुसार राज्याची विभागणी करून विशेष दर्जा काढून घेतला हा बुद्धिवाद्यानी केलेल्या आरोपात काही तथ्य आहे का हे जाणून घेऊ या.  भारतातली सांसद ही अशीच कोणी ऐऱ्या गैऱ्याने आक्रमण करून काबीज करून घेवून आपला अंमल चालवीणारी मूठभर लोकांची संस्था नव्हे. लोकांनी लोकांसाठी चालविलेले हे राज्य आहे आणि त्यात जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी चर्चा करुन निर्णय घेतले जातात. असे असतांना कपोकल्पित कथांना उत येवून त्या रंगवून सांगितल्या जातात हे आपल्या जनतेचं आणि देशाचं दुर्दैव आहे. राजकीय विषश्लेषक हे सारासार विसरतात की सत्तर वर्षे केंद्रात कॉंग्रेसचीच सत्ता होती आणि ही तळमळ काँग्रेसच्या विचारवंतांसमोर मांडली असती तर त्यांच्या तळमळीचं तीर्थ झालं असतं. ही मंडळी इथेच थांबत नाही तर त्यांचा दावा असा की, गेल्या पाच वर्षात काश्मीर खोऱ्यातील जनतेवर अन्याय झाला, मुस्लिम विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होवून काश्मीर लोकांविरोधात जाणीवपूर्वक मोहीम राबविली गेली. जम्मू विरुद्ध काश्मीर, विरुद्ध लडाख असे संघर्ष उभे केले गेले. काश्मीरचे लोक लष्कराच्या वेढात जीवन कंठत आहेत, काश्मीरच्या लोकांची मनाची घालमेल आणि असंख्य महिला अर्ध्या विधवा झाल्या. असा विचित्र  आपल्या डबक्यातला गाळ उफाळून येत असतो, परंतु यांच्या पुढे कितीही सांबराचे शिंग घासले तरी यांचे देशप्रेम कधीच उफाळून येणार नाही. परंतु यांच्या विचारसरणीला न डगमगता सरकार आपले काम चोखपणे करत आहे आणि काश्मीर मध्ये बदलाचे वारे वाहतांना दिसत आहे ही एक समाधानाची बाब आणि एक सत्य आकार घेतआहे.

Friday, 9 August 2019

पावसाळे काय बेडूक देखील पाहतात, पिके मात्र शेतकरीच घेतो

जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा असलेले कलम 370 शी सहमती किंवा असहमती याचं अज्ञानाबद्दल आपण एक वेळ समजू शकतो. परंतु ज्यांनी साठ वर्षे सत्तेत राहून जनतेची दिशाभूल केली असे जेंव्हा जम्मू आणि काश्मीर मधील स्थानिक लोकांना समजेल त्यावेळेस ते त्यांना कदाचित माफ करणार नाहीत. मोदींनी हिंमत दाखवून, काश्मीरी जनतेला, देशाला आणि जगाला, पटवून दिलं की अनुच्छेद 370 मुळे जम्मू काश्मीरचा विकास कसा रोडावला, शिक्षण, आरोग्य सुविधा, नोकऱ्या यापासून काश्मिरी जनता वंचित कशी राहिली, भ्रष्टाचार,आतंगवाद आणि अलगावावाद ला बढावा कसा मिळाला. साठ वर्षे सत्तेवर राहून 370 या कलम हटविण्याबद्दल काँग्रेसने का प्रयत्न केले नाहीत, या सत्तर वर्षात बेचाळीस हजार लोक मृत्यू पावलेत आणि आता वेळ आली तरी काँग्रेस विरोधच दर्शवित आहे. हे देशाचं दुर्भाग्यच आहे. आंब्याचं झाड लावायचं यांच्या संस्कृतीत रुजलेच नाही. झाड लावल्यानंतर त्याची फळे आपल्याला उपभोगता येणार नाहीत हे माहीत असून सुद्धा मोदींनी प्रथम देशहिताला प्राध्यान्य दिलं, तरी सुद्धा काही बरेच मंडळी आपलं देशहित लक्षात न घेता आपल्याच जमिनीवर राहून आपल्याच ताटातील खाऊन देशाहितला विरोध दर्शवित आहेत. कोणी वैयक्तिक स्थरावर तर काही आपल्या पक्षाच्या खिडकीतून, मोदी हे केवळ पंतप्रधान आहेत म्हणून कायम स्वरूपाचा त्या व्यक्तीला विरोध करता करता देशाला विरोध करतांना दिसत आहेत. हे ते सारासार आपल्या भाकरीला विसरलेले लोक आहेत. यांना निंबाचा पाल्याचा काढा द्या किंवा, कारल्याचा कडू रस पाजा, यांच्या प्रकृतीत काही फरक पडतांना दिसत नाही. आपल्या समोर हे बेधडक विरोध दर्शवित असतांना आपण सर्वसामान्य जनता सहज विचार करतो की याना देशहित माहीत आहे की नाही आणि आपण मनात हळहळल्याशिवाय मात्र काहीच करू शकत नाहीत. रंगभूमीवर नाटकाचा सप्तरंगी पडदा उघडल्यानंतर यांना स्मशान भूमीच नजरेस पडते. आरश्यापुढे उभे राहून आपण किती कुरूप दिसतो याची त्यांना कल्पनाच येत नाही कारण त्यांना आरसाच कुरूप वाटायला लागलेला असतो. यांच्यात पारंपारिक विरोध करणारे पक्ष, सभासद, बुद्धिवंत, विचारवंत, कलावंत आणि काही मीडियावाले सुद्धा सामील असतात. शेतकरी आपल्या कोठीत अमृततुल्य धान्याचा साठा भरून ठेवतो त्या धान्यात प्रचंड प्रमाणात धनूर नांवाची बारीक कीड कालांतराने लागते. ती किड त्या धान्यात एकदम सुरक्षित राहू शकते परंतु ती कीड सर्वच दाणे पोखरून टाकते आणि धान्याची वाट लागते तशी कीड आपल्या भारतीय राजकारणात विकृत पद्धतीने फैलावलेली आहे. याचाच फायदा आपला शत्रू राष्ट्र पाकिस्तान सर्रास उचलत असतो. साठ वर्षे सत्तेत राहून काँग्रेसला स्वार्थ सोडून देशहीत साधता आले नाही आणि अजूनही तोच कित्ता ते गिरवीत आहेत. मोदींनी सहा वर्षाच्या आत 370 कलम हटवून हा कलंक धुवून काढला आणि इतिहासात सुवर्ण अक्षरांनी त्याची नोंद झाली. वी.स.खांडेकर आपल्या "वायूलहरी" या पुस्तकात मोठ्या मिश्कीलपणे नमूद करतात की, पावसाळे काय बेडूक देखील पाहतात, पिके मात्र शेतकरीच घेतो !

Friday, 2 August 2019

सुडासाठी दीर्घ प्रतीक्षा - जालियनवाला बाग

जालियनवाला बागेत १९१९ मध्ये झालेले हत्याकांड म्हणजे इंग्रजांनी स्वातंत्र्यप्रेमी भारतीयांवर केलेला क्रूर अत्याचाराचा रक्तरंजित इतिहास होय. शेकडो निरपराध भारतीयांची कत्तल करणाऱ्या "डायरचा" इंग्रजांसोबत काही देशद्रोही भारतीयांनी सुद्धा गौरव केला होता. आणि ह्याच जनरल डायरला फूस होती ती पंजाबचा गव्हर्नर असणाऱ्या त्या "मायकेल ओडवायर"ची. असाच एक संतप्त तरुण जळत होता. त्याचा पिता व मानलेला भाऊ जालियनवाला बागेत शहीद झाले होते. त्याच वेळी त्याने मनोमन सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. अतिशय हुशार असणारा तो तरुण इंजिनियर झाला. दरम्यानच्या काळात ओडवायर निवृत्त होवून इंग्लंडला स्थायिक झाला होता. ती संतप्त व्यक्ती सुद्धा आपली पंजाबमधील सारी मालमत्ता विकून इंग्लंडमध्ये स्थायिक झाली. तिथे त्याने ओडवायरला शोधून काढले. त्याच्याशी परिचय केला. परिचय एवढा वाढविला की, एकदा ओडवायरने त्याला चक्क चहापानासाठी निमंत्रीतही केले होते. मात्र तो योग्य वेळेची वाट पाहत होता. तशी वेळ चालून आली ती १९४० मध्ये, म्हणजे तब्बल २१ वर्षांनीं. एका सार्वजनिक कार्यक्रमास ओडवायर उपस्थित राहणार असल्याचे कळताच ती संतप्त आगीने पछाडलेली व्यक्ती म्हणजे "उधमसिंह" तेथे पोहचला आणि तब्बल २१ वर्षांनी त्याने सूड घेतांना  ओडवायरला गोळ्या घातल्या.

अशा या भारताच्या वीर पुत्राला शत शत नमन

वृत्तपत्र जीर्ण कात्रण

Monday, 29 July 2019

खतरों का खिलाडी

आपण त्यांना कधी लहान मुलांच्या घोळक्यात, तर कधी योग करतांना, तर कधी स्वच्छता अभियान मध्ये झाडू मारतांना बघितले असेल तर कधी मनकी बात मध्ये रेडियो द्वारे भारतीय जनतेशी संवाद साधतांना, तर कधी प्रचंड जनसमुदया समोर विरोधकांवर शब्दप्रहार करतांना आपण त्यांना नक्कीच पाहिले आहे. राजकारणात पंतप्रधान पदी असलेले मोदी यांनी जीएसटी, नोट बंदी सारखे कडू औषध आणून देशाला सशक्त बनविले. विरोधी पक्षांचा तोफांचा भडिमार सहन करून, एअर सर्जिकल स्ट्राईक धाडसी निर्णय घेवून जगाला अचंबित करून सोडले. अशा या धाडशी खिलाडने सडक्या विचार धारणा असलेल्यांची गय न करता  देशाला चंद्रायन 2 पर्यंत  नेऊन सोडले. 24 चोवीस तास न थकता काम करणारा पंतप्रधान देशाला लाभला म्हणून मोदी मोदी ची गुंज ऐकतांना विरोधक सुद्धा अचंबित होतात. आणि सर्वच आघाड्यांवर निष्प्रभ ठरलेल्या विरोधी पक्षाला आपल्या दुकानंतली जुनी मोड विकायची पाळी येवून पोहचली.

असा हा धुरंदर, खतरोंका खिलाडी आता ब्रिटिश साहसी खेळपटू बेयर ग्रिल्स यांच्या बरोबर जंगलात भटकंती आणि राफ्टिंग करतांना, मॅन व्हर्सेस वाईल्ड या जगभर लोकप्रिय असलेल्या डिस्कव्हरी वाहिनीच्या विशेष भागात दिसणार आहे.

Tuesday, 9 July 2019

तुमची गाडी कालच गेली !

प्रवास आणि तोही पावसाळ्यात, माझ्याबाबतीत याच्यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही. परंतु तुमचं पूर्वनियोजित नियोजन असेल तर प्रवास सुद्धा तुमचा आनंदात होतो. नोकरीच्या कालावधीत माझं प्रवासाचं प्रिप्लॅन असायचं, सर्वकाही साहेबासारखं, परंतु रिटायरमेंट नंतर माझी सगळीच गणितं बदललीत. मुंबई पुणे लक्झरीने जायचं असेल तर चारशे रुपये लागतात, ओलाने जायचं असेल तर टोलबील धरून 1900 ते एकविसशे रुपये लागतात. आणि ब्लाब्ला ने जायचं ठरविलं तरी साडेतीनशे ते चारशे रुपये लागतात. आणि ट्रेनने एसी चेअर कारने जायचं म्हटलं तरी दोनशे ते अडीचशे रुपये लागतातच. आजकाल मला पुण्याला वारंवार जावे लागत असल्यामुळे इकॉनॉमी पद्धतीने सुद्धा जात येतं, कल्याण पासून पुणे पर्यंत चक्क मी चाळीस रुपयात सुखरूप आणि फास्ट जातो. आणि हें सर्व क्रेडिट सेंट्रल गव्हर्नमेंटला जातंय. कारण सिनिअर सिटीझनला 40 टक्के प्रवास भाड्यात सूट असल्यामुळे मी अवघ्या चाळीस रुपयात पुणे गाठतो. मी स्टेट गव्हर्नमेंटचे आभार मानणार नाही कारण त्यांनी जेष्ठ नागरिकांचे वय 65 वर्षे ठरविलेले आहे.

तर आज झालं काय, मी काही महत्वाच्या कामानिमित्त एक दिवसासाठी पुणे येथें आयटीआय रोड औंधला गेलो होतो. मला मुंबईला परत यायचं होतं म्हणून जवळच दहा मिनिटांवर असलेललं खडकी स्टेशन गाठायचं होतं. एका रिक्षावाल्याला विचारलं त्याने 100 रुपये सांगितलं, चला याचं चुकलं असेल म्हणून दुसऱ्या रिक्षावाल्याला विचारलं तर त्याने 150 रुपये सांगितलं. यांना मी रेसकोर्सचा घोडा वाटलो की काय, असं मला सहज वाटून एक टक आश्चर्यकारक नजरेने मी त्याच्याकडे बघतच राहिलो, अन तो चटकन समजला टांग्यावालं गिऱ्हाईक दिसतंय म्हणून सटकन सटकला ! शेवटी मी ब्रेमेन चौकापर्यंत पायीच गेलो आणि तेथून अवघ्या तीस रुपयात खडकी स्टेशन गाठले. तेथून धोधो पावसात लोकलने  लोणावळा गाठलं. परंतु माणुसकी नांवाची चीज मला अनुभवास मिळाली ती डेक्कन एक्सप्रेस मध्ये. गाडीला अतिवृष्टीमुळे तुरळक गर्दी होती. काही लोक स्टँडिंग होते अर्थात तो रेझर्वडं कंपार्टमेंट होता. मी सुद्धा एका बाजूला खांद्यावर माझी कमी वजनाची बॅग लटकवून केविलवाण्या चेहरेने उभा होतो अर्थात सर्वांचेच चेहरे मला कमी नजरेमुळे सारखेच भासत होते . मधल्या दरवाज्या जवळ तीन चार मुली आणि चार पाच जेन्ट्स उभे होते त्यांनी मला इशारा करून जवळ बोलवून घेतले आणि एक सीट खाली होती ते त्या जागेवर स्वतः न बसता मला बसविले. क्षणभर मला काही सुचलच नाही, गाडीने खंडाळा सोडले होते आणि मला त्यांचे आभार देखील मानायचे भान राहीले नाही. राहून राहून विचार येत होता माणुसकी, आपुलकी, सर्जनशीलता दुनियेत अजून भरपूर शिल्लक आहे. आपल्या नजरेने ती ओळखता आली पाहिजे. ताजे गुलाब फुलतात कसे असा प्रश्न आपल्याला पडणारच नाही.

असाच एक प्रसंग आठवला, रात्रीचे बारा वाजून दहा मिनिटे झाली होती. आम्ही सहकुटुंब सह परिवारासह आमची कुलदेवता तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालो होतो. आम्ही सोलापूरचं 17 तारखेच्या रिझर्वेशन प्रमाणे कल्याण प्लॅटफार्मवरून चेन्नई एक्सप्रेस रात्री 12.25 ला पकडली. एक्सप्रेस ट्रेन ने केलेला प्रवास तर अविस्मरनियच होता कारण मध्यरात्री नंतर चोर पावलाने येवून बदलणाऱ्या तारखेमुळे होणारा प्रवासाचा महा खेळ खंडोबा झाला होता. आमची स्लीपर सिटे दुसऱ्या लोकांनी अगोदरच ऑक्युपाय केलेली होती.  रेल्वे टीसी हळूच माझ्या कानात कुजबुजला, "तुमची गाडी कालच गेली हो". मी म्हणालो असं कसं काय होऊ शकतं ! त्यांनी सांगितलं "साहेब आज 18 तारीख आहे" कालांतराने या स्मृती जरी जाग्या झाल्यात तरी हसून हसून शरीराची पुरे वाट लागते. शेवटी टीसी मास्तरांनी आमची हतबलता बघून विना तिकीट, विना रिझर्वेशन आणि विदाऊट पेनल्टी घेऊन झोपायची व्यवस्था करून दिली होती. त्याही वेळेस माझ्याकडून त्यांचे आभार मानायचे राहून गेले होते. ताजे गुलाब फुलतात कसे याच उत्तर समजायला मी आयुष्य घालवून दिलं.

Monday, 8 July 2019

जगबुडी

पावसाळा चालू असल्यामुळे मस्तपैकी बायकोला गिलक्याची भजी तळायला सांगावं आणि खिडकीत बसून मस्त वाफाळलेला चहाचे घुटके घेता घेता मुसळधार पावसाचं नेत्रसुख घेत राहावं, हे सर्व ठीक आहे. पण काही शब्द इतके भयानक असतात की, नुसते ते कानावर पडले किंवा डोळ्यांनी वाचले तर थरथर कापायला होतं. आज झोपेतून उठल्याबरोबर वर्तमानपत्र चाळता चाळता जगबुडी नदीला महापूर ही बातमी वाचून छातीत धडकीच भरली !  दर पावसाळ्यात जगबुडी तिच्या भोवतीचे जग बुडवतेच असा इतिहास समजल्यावर पुढचं विचारू नका. बरं ही नदी आपल्या महाराष्ट्रातून वाहते हे समजल्यावर आपण काय मागच्या जन्मी दुष्कृत्य केली म्हणून या जन्मी शिक्षा उपभोगण्यासाठी आपल्याला जगबुडी नदीच्या परिसरात जन्म घ्यावा लागला असेल !  असे विचार माझ्या मनाला घाबरवून गेलेत. थोडं हिस्ट्री जाणून घेतल्यानंतर जीव भांड्यात पडला. कोकणातल्या सगळ्याच नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावून अरबी समुद्राला मिळतात. म्हणून कोकणला एवढं सुष्टीसौंदर्य लाभलं कसं, असा प्रश्न पडत असेल तर येवा कोंकण आपलोच असा म्हणजे जावे त्याच्या स्थळी तेंव्हा कळे. पूर्वेला सह्याद्री पर्वत आणि पश्चिमेला अरबी समुद्र यांच्यामध्ये चिंचोळ्या कोकणपट्ट्यातून अनेक छोट्या-मोठ्या नद्या वाहतात. जगबुडी नदी रत्नागिरी जिल्ह्यात वडगाव येथे सह्याद्रीच्या कुशीत उगम पावते आणि वाशिष्ठी नदीला येवून मिळते. जगबुडी नदी वशिष्ठीचीच प्रमुख उपनदी आहे. सुष्टीसौंदर्यात भर टाकणाऱ्या या नद्या पावसाळ्यात उग्र रूप धारण करतात आणि धोक्याची पातळी ओलांडून आजूबाजूचं जग आपल्या कवेत घेतात म्हणून दर पावसाळ्यात जगबुडी तिच्या भोवतीचा परिसर बुडवतेच.

Friday, 5 July 2019

रिकाम्या टिकाकारांचा देश

लोकशाहीचा धागा उलगडून बघितला तर सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखविणे हे विरोधी पक्षाचे धोरण असुच शकत नाही, म्हणून टीका जरूर करावी पण ती योग्य जागी अन योग्य शब्दात. जसं भांड्याला भांडं लागावं अन मधूर नाद निर्माण व्हावा आणि सामाजिक पर्यावरणाचा समतोल राखला जावा परंतु तसे होतांना दिसत नाही. सध्या राजकारणात प्रचंड चिखलफेक चालू आहे. वि.स.खांडेकर 1997 मध्ये लिहिलेल्या "पहिले पान"  या पुस्तकात लिहितात, गवताची गंजी पेटवायला काही वाजत गाजत मशाली आणाव्या लागत नाहीत. निष्काळजीपणाने विडी ओढणारा मूर्ख मनुष्य एक ठिणगीने ते काम करू शकतो. आणि हे त्यांचे साधे विचार आज तंतोतंत लागू पडतात.

रिकामा ..... भिंतीला तुंबड्या लावी, ही म्हण ग्रामीण भागात रोजच्या दैनंदिन जीवनात सर्रास वापरली जाते . माझी हयात निघून गेली परंतु न्हावी कधी रिकामा बसलेला मी अजून तरी पाहिलेला नाही. तरी सुद्धा ही म्हण त्याच्या माथी का मारली याचा मला काही ताळमेळ लावता येईना ! एक वेळा म्हणीतला हा न्हावी परवडला अशी म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे. कारण आपल्याकडे उठ सूट कोणत्याही घटनेवर टीकाकार आणि बिन टीकाकार सुद्धा जी झोड उठवितात त्यावरून असे वाटते की भारत हा रिकामटेकड्या टीकाकारांनी भरलेला देश आहे. कधी हे टीकाकार सध्या चालू असलेल्या वर्ल्ड कप चॅम्पियनशीप स्पर्धा मधील इंग्लंडविरोधातील भारताच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उभे करतात, तर कधी पावसामुळे यांच्या घरात गुडघाभर पाणी शिरलं तर ते सरळ सरळ सत्ताधारी पक्षावर खापर फोडतांना दिसतात. त्यांना माहीत आहे की 45 वर्षानंतर मुंबईत तुफान पाऊस झालेला आहे, परंतु टीका करून आपल्या जिभेची हौस पूर्ण करण्याचा मार्ग मात्र सोडत नाहीत. याच्यापुढे जावून, सत्ताधारी लोक नाल्यातून पैसे खातात म्हणून मुंबई पाण्यात गेली. या टिकेला काय म्हणावं ! आता अलीकडे खेकड्यानी चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फोडलं असा असा अजब युक्तिवाद जलसंधारण मंत्र्यांकडूनच ऐकायला मिळाला आणि त्याच्यावर कहर म्हणजे नवाब मलिक साहेब म्हणतात तिवरे दुर्घटना म्हणजे ‘भ्रष्ट मोठे मासे’ वाचवण्यासाठी खेकड्यांचा बळी गेला. बरं हा रमीचा डाव इथेच संपत नाही तर आता काही पक्षातील लोकांनी ठाण्यातून जलसंधारण मंत्र्यांकडे खेकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा चघाटया चघळून चघळून वीट आला नसेल तेवढ्यात दुसरं प्रॅक्टिकल समोर आलं. गोवा महामार्गावर काही राजकीय नेत्यांनी ऑन ड्युटी असलेल्याअभियंत्यावर चिखल भरलेल्या बादल्या ओतून चक्क त्याला अंघोळ घातली. आहे की नाही अजब व्यक्ती स्वातंत्र्य आपल्या देशात. आणि आताच एक बातमी येवून थडकली आहे की राहुल गांधींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना खडसावले आहे की मुंबई तुंबली तेंव्हा तुम्ही झोपला होता काय.

अतिवृष्टीमुळे महामार्गावर दरळ कोसळली तर टीकाकार  सरकारला दोष देवून टीव्ही चॅनेल वर एकमेकांचे कांन फुंकत बसले तर आश्चर्य वाटून घेऊ नये.

आशा प्रकारे आपल्या देशात भरपूर भिंतीला तुंबड्या लावणारे राजकारणी असतांना गरीब बिचाऱ्या न्हाव्याला "रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी" उगीच या म्हणीचा बकरा बनवला गेला !


Monday, 1 July 2019

वीर

म्यानातुनि उसळे तरवारीची पात
आकाशातून ओघळे उष्माची लाट
डोक्यावर पगडी, हातात ढाल
अनवाणी वीर नाचले रणरणत्या उन्हात



चाळीसगांव पासून पंधरा किलोमीटरवर वसलेले एक छोटेसे गांव, धामणगांव. चाळीसगांव पासून खडकिसींम वरून काटकोनात सरळ डांबरी रोड धामणगांवाची वेस ओलांडून गांवापर्यंत जातो, धामणगांवाची  रचना इतर गावांच्या पेक्षा वेगळी नाही. गांवात प्रवेश करताना मोठी गडकिल्यासारखी कमान नसली तरी गावात शिरण्यासाठी मोठा सताड उघडा दरजा आहे. विज्ञान जरी प्रगत असले तरी गांवातील प्रत्येक कुटुंबे देवधर्म पाळतात. आजही वीर देवाला वंदन करण्यासाठी, त्यांचे स्मरण करण्यासाठी वीर काढण्याची प्रथा आहे. मला आठवतं आमच्या घराण्यात माझे काका दिनकर चव्हाण, महारु आप्पा, नामदेव काका, विनायक अण्णा हे वीर झालेले मी पाहीले आहेत. वीर देव हे चव्हाण कुळाचे देव आहेत. वीर देवांची ऐतिहासिक पार्श्वभूमी कोणाला ज्ञात नसली तरी दरवर्षी परंपरेने, श्रद्धापूर्वक वीर काढण्याची प्रथा पूर्वजांपासून चालत आलेली आहे. वीर देव नदीच्या तीरावर एका शेतात स्थित आहेत. वीर संस्कृती जपण्यासाठी वीरांची गांवातून वाजत गाजत नाचत मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीला सुरुवात झाल्यापासून वीर नृत्य करीत मार्गक्रमण करीत असतात. गांवच्या चौका चौकातून, गांवाच्या मध्यभागी असलेल्या मारुती मंदिराच्या प्रांगणात वीरांना उधाण येते. वीर जेंव्हा जोश मध्ये येवून नाचतात तेंव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. मार्चच्या रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने वीर हे बेभान होवून नाचतात कसे हे एक आश्चर्यच आहे. वीर, वाजंत्री हळू हळू पुढे सरकत मराठी शाळेवरून, तुळजापूर माता भवानीचे दर्शन घेतल्या नंतर देवगांवच्या मारुतीला फेर घातला जातो आणि पुढे मूळ वीर वसलेल्या ठिकाणापर्यंत दुपारी 12च्या मध्यान्ही समाप्ती होते. बोकड कापला जाऊन मटणचं जेवण पाहुण्यांना आणि गांवाला दिले जाते. तृप्त मनाने आलेले पाहुणे हळू हळू आपल्या मूळ गांवी वापस जातात. अशा प्रकारे आपल्या वीर देवांची पूर्वापार चालत आलेली पूर्वजाप्रती कृतज्ञता जपली जाते.

Wednesday, 5 June 2019

उन्हातलं चांदणं



२५ मे २०१९ दुपारचा एक वाजून वीस मिनिटे झालीत. गरम लालबुंद कढईत चणे भाजून काढावेत त्याप्रमाणे तळपता सूर्य दिवसा धरणी भाजून काढत होता. पहिल्या पावसाची वाट बघतांना वेडी झालेली धरणी आतुर झाली होती, परंतु आकाश निरभ्र होते. ऊन मी म्हणत होते. फक्त एक हाती सत्ता होती. आग, ऊन,चटके आणि तेथे कोणाचेच चालत नव्हते. दुपारचा मध्यांनं. मी खडकी फाट्यावर उतरलो होतो. सावली नामशेष झाली होती. डोक्याभोवती सफेद रुमाल लपेटून घेतला. पायावर कोणी ऍसिड ओतत आहे असं जाणवत होतं. तेवढ्यात गोलू मोटरसायकलवर माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मी त्याचे आभार मानावे का देवाचे काहीच सुचत नव्हतं. घरी एकदाचा पोहचलो. तात्पुरती सुटका झाली होती असेच वातावरण होते.

आता सकाळचे पाच वाजलेत, मुंबईला जाण्यासाठी खडकी फाटाच्या दिशेने निघालो होतो. गांवाबाहेरच्या मंदिरात रेकॉर्डिंग वर वाजत असलेलं देवाची सुमधुर धून रात्रीच्या अंधारात स्पष्टपणे ऐकू येत होती. आकाश निरभ्र होतें, थंडगार हवा गालाला घासून जात होती. नांगरून चिरा पडलेली शेतं लक्ष वेधून घेत होती. रस्त्याच्या कडेने झाडे शांत शांत उभी होती. जीसकी आवाज ही पहचान है, दर्शन मात्र तिचे होत नाही अशा त्या कोकिळेचा सुमधुर कुहू ss कुहू ss आवाज कानी पडला आणि वातावरण प्रसन्न झाले. शिवार संपायला अजून वेळ होता. निष्पर्ण झाडे रात्रीच्या गर्भात शितलतेची चादर ओढून आईच्या कुशीत जणू विसावली होती. मला मात्र फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही.

Saturday, 1 June 2019

दुखतंय कुठं आणि सांगतंय कुठं

एसटीला ३५०० नवीन बसची गरज - एसटी महामंडळ


एसटी महामंडळ ७१ व्या वर्षात पदार्पण करत असले तरी १७ वर्ष्याची उमेद त्यांच्या जवळ राहिलेली नाही. एसटी महामंडळाचा असा दावा आहे की गाड्यांची वानवा आणि प्रवाशांची कमी होणारी संख्या अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या आपल्या देशात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे अशा देशात प्रवाशांची संख्या कमी होऊ शकते का ? हा दावा मनाला न पटणारा आहे. एसटी महामंडळाचं असं झालं आहे की, दुखतंय कुठं आणि सांगतंय कुठं.

मी माझ्या गांवच्या जवळच्या खडकिसींम बस स्टॉप वर तासभर उभा होतो पण एकही बस थांबत नव्हती. काही बसेस फास्ट होत्या, काही बिना कंडक्टर वाहक एसटी होत्या तर लोकल बस एक ते दोन तासाच्या अंतराने असतात असे कळलें. खाली बसेस डोळ्या समोरून जात असतात आणि पॅसेंजर प्रत्येक बसला हात देऊन हैराण होत असतो. परंतु एसटी बस मिळत नाही अशी परिस्थिती मी स्वतः डोळ्याने पहिली. दूध वाला घरी दूध द्यायला येतो तरी पठया दूध घेत नाही, पण हाच माणूस दारूच्या अड्ड्यावर मात्र सुसाट पळत जातो. एसटी महामंडळाने सुद्धा याचाच कित्ता गिरवला आहे. कारण या महामंडळाचा धंदा कालिपिली, मोडक्या तोडक्या टॅक्सी, जिप्स, कार वाले यांनी गिळंकृत केला आहे. या प्रायव्हेट गाड्या एसटीच्याच भाडे रेट मध्ये पॅसेंजर ओव्हरलोड भरून सुसाट घेऊन जातात. पॅसेंजर सुद्धा हशिखुषीने, दाटीवाटीने बसून प्रवास करतांना दिसतात, कारण त्याला टाइमावर घरपोच गाडी मिळालेली असते आणि एसटी पेक्षा भाडं सुद्धा जास्त द्यावे लागत नाही.

मी मागील महिन्यात मे मध्ये माझ्या गांवी धामणगांव येथे गेलो होतो. आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झालीत तरी आमच्या गांवात अजून एसटी बस येत नाही हे ऐकून तुम्ही आश्चर्य चकित झाले असणार. मुंबईवरून येतांना चाळीसगांव स्टेशनला उतरल्यावर धामणगांव जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध नाही आहे. चक्क स्पेशल गाडी करून जावे लागते ही सत्य परिस्थिती आहे. शाळा चालू असतात त्या काळात विद्यार्थ्यांसाठी बस येत असते, शनिवार रविवार सुटीच्या दिवशी बस येत नाही, उन्हाळ्याच्या सुट्टीत बस बंद असते आणि पावसाळचे निमित्त साधून बस बंद असल्याचे आढळून येते. गावांतील शेतकरी, कामकरी, शाळकरी, लोकांना, पाहुण्यांना किती त्रास सहन करावा लागतो याची आपण कल्पना करू शकत नाही.

प्रवाशांची कसलीही कमतरता नसतांना, एसटी महामंडळ तोट्यात चालते तरी कशी, कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल तरी कसा ?

हात दाखवा आणि एसटी थांबवा याचा वानवा, वाहक चालकासह फास्ट गाड्या, आणि विना वाहक नॉन स्टॉप गाड्या म्हणजे तोट्याला खतपाणी देणारे निर्णय काही प्रमाणात बदलायला हवेत. जिथे एसटी नाही तेथे एसटी गेली पाहिजे. जिथे पक्के रोड आहेत तेथे कमीत कमी दिवसातून दोन वेळा तरी एसटी उपलब्ध असली पाहिजे. हाथ दाखविल्यावर एसटी थांबली पाहीजे. मी एसटीनेच प्रवास करणार असं प्रवाशी आग्रहाने म्हटल्याशिवाय राहणार नाही.

Saturday, 20 April 2019

लबाड लांडगं ढाँग करतंय

सध्या राजकारणात "लबाड" या शब्दाने जबरदस्त धुमाकूळ घातला असून तो खऱ्याला खोटं, आणि खोट्याला खरं करण्यात गुंतलाआहे. त्याने विकृतीची एक नवीन परिभाषा जन्माला घातली असून लोकशाहीचं मूल्य त्याने आपल्या आतल्या खुंटीला बांधून ठेवलं आहे. निरनिराळ्या स्टेजवरून राजकीय मुखवट्याद्वारे जनतेला तो सहजपणे दर्शन देतो. तो कधी वर्षाला बहात्तर हजार रुपयातून तर कधी शेतकऱ्यांची दोन दिवसात कर्जे माफ करण्यात गुंतला आहे. कोणत्या स्टेजववरून तो घरटी एक सरकारी नोकरीचं आमिष दाखवेल, तर कोणाला दरवर्षी दोन लाखाची मदत करेल याचा ताळमेळ सांगण्यास कोणी तयार नाहीत तरी सुद्धा तज्ञ मंडळी या लबाड्याला भरीव पाठिंबा देतात हे आश्चर्यकारक खेदजनक आहे. खोटं का असेना, एक मात्र नक्की की सर्व  भारतीयांना चांगले दिवस येतील अशी अमिष त्याने दाखविली आहे. आपला भारत देश हा अतिशय श्रीमंत देश असून सुख समृद्धी साधनांनी विपुल असा आहे, अशी त्याने खोटी खोटी प्रतिमा जगापुढे सादर केली आहे. भारताचा जागरूक मतदार मात्र अचंबित झाला असून तो आपले रंग रूप कसे दाखविणार हे 23 मे 2019 ला आपल्याला समजेल.

Wednesday, 17 April 2019

राज साहेबांचा बुलंद आवाज

हिंदुस्तानात सध्या एका बाजूला प्रचार सभेतला नेत्यांचा बयान बाजीचा स्तर इतका कमालीचा घसरला आहे की नेत्यांनी आपल्या जिभेचं कव्हर बाजूला काढून तिला मोकाट सोडून दिली आहे. महाराष्ट्रात सुद्धा जागो जागी त्यांच्या बिया पाणस्थळी रुजल्या आहेत.

प्रश्नांना विचित्र लॉजिक लावून भाजपकडे राजसाहेबांची उत्तरे नाहीत हा एक चर्चेच्या विषयाला उत आला असताना राज साहेब असे प्रश्न इतर प्रमुख पक्षांच्या नेत्यांना विचारण्याचे धाडस दाखवत नाहीत हा  सस्पेन्स आपण समजू शकतो. नोटबंदी, शौचालय आणि इतर विविध विषयांवर भाष्य करताना साहेबानी विचित्र लॉजिक लावून सुंदर टिपण्या करून नितळ पाण्यात शेवाळ बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे. पण वाईट एवढंच वाटतं त्यांनी संधीचं सोनं नाही केलं. राजकारणात काहीही होऊ शकतं हे त्यांना चांगलं माहीत आहे. राष्ट्रवादीनेच मोदीला पाठिंबा दिला तर सारंच मुसळ केरात !! . पण असो, आम्हाला राजसाहेबांचा एक तरी उमेदवार पाहिजे होता, प्रचंड बहुमताने जनतेने त्यांना निवडून दिलं असतं. संसदेत आवाज दुम दुमला असता साहेबांचा. संधी चालून आली होती पण दारालाच कडी लावलेली होती म्हणून ती वापस निघून गेली. साहेब स्वतःच्या बागेतल्या झाडांना पाणी द्यायची चिंता नाही करत, जंगली झाडं तर बिगर पाण्याने पण जगतात, साहेब त्यांची चिंता करतांना घमेघुम झाले आहेत. मतदार आणि कार्यकर्ते बुचकळ्यात पडलेत ! हे मात्र खरं आहे

Friday, 29 March 2019

आडात नाही तर पोहऱ्यात येणार कोठून

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी अगोदरच स्ततः जाहीर केले आहे की, काँग्रेस जर सत्तेत आली तर ज्यांना बारा हजार पेक्षा कमी पगार आहे किंवा ज्यांची मिळकत शून्य आहे, अशा गरीब लोकांसाठी महिन्याला 6 हजार ते बारा हजार असे वर्षाला गरीबाच्या खात्यात 72000 रुपये प्रतिवर्षी मिळतील.

किंतु त्याच्यात भरपूर प्रकारचे  "पण" आहेत.  25 करोड गरीब जनता x 72000 रुपये हे गणित सोडविण्याचे बरेच तज्ञ प्रयत्न करत असतील आणि प्रत्येक वर्षी एवढा पैसा आणायचा कोठून हा भाग वेगळाच.

अस समजूया, युपीए सरकार सत्तेत आलं तर, युपीए सरकारमधील घटक पक्ष ही स्कीम लागू करण्यास मान्यता देणारच नाहीत. हे पण खरंच आहे की आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार. त्यावेळेस राहुल गांधी सहज पळ काढू शकतात की जनतेने आम्हाला एक हाती सत्ता दिली नाही.

या योजनेचे गाजर दाखवितांना महागाई, जिल्हा परिषद, तहसीलदार कचेरी यासारख्या आणि प्रायव्हेट क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्ट लेबर यांची मानसिकता, काम न करण्याची प्रवृत्ती, आळशी दारिद्र्य, देशाची आर्थिक स्थिती, जागतिक बँकेचे कर्ज, जीडीपी ग्रोथ,  औद्योगिक क्षमता आणि महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रातील मनुष्यबळ यावर आधारित बदलणारी समीकरणे, दारिद्य्र रेषेखाली किती जनसंख्या आहे याची अनिश्चित माहिती या गोष्टींकडे सारासार दुर्लक्ष करणे म्हणजे गाजराची पुंगी वाजविणे असाच अर्थ निघतो.

देशाची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान  इम्रानखान यांच्यावर म्हशी विकून आता गाढवं विकायची वेळ आली आहे. तशी आपल्यावर वेळ आली तर भारताला आर्थिक संकटातून उठायला भरपूर पिढ्या खर्च कराव्या लागतील.
 



Thursday, 31 January 2019

सांजकी दुलहन बदन चुराये, चुपकेसे आये

जेथे Work in progress चा बोर्ड असतो तेथे No Entry असते, आणि अशा ठिकाणी सर्वच activities बंद असतात हे आपणास पटवून देण्याची आवशक्यता नाही. पण त्याला अपवाद ठरली आहे आपली शीतचंद्रलोक सोसायटी. आपल्या सोसायटीत या वर्षी श्री सत्यनारायणाची पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम कसे होतील हा चिंतेचा विषय चर्चेत होता. चोवीस वर्षांपासून चालत आलेली प्रथा बंद पडते की काय अशी शंका कोणाच्याही मनात येणे साहजिकच होतं आणि कारणही तसंच होतं. चारही विंगच्या गॅलऱ्यावर प्रचंड सामान विखुरलेलं. प्रॅक्टिस करायला जागा कुठंही शोधून सापडणार नाही अशी अवस्था !  बिल्डिंग रिपेअर करण्याचे काँट्रॅक्टरचे समान, सिमेंटच्या गोणी, पाईप, बांबू, कलरिंगचं काम, ग्रील्स चे एकमेकात अडकलेले सांगाडे, विचारू नका सगळीकडे सावळा गोंधळ. परंतु त्या शंकेला सुरुंग लावलाय श्रीयुत पोंक्षे यांनी आणि त्यांना मोलाची साथ दिली ती श्रीमती गौरी गोठीवरेकर यांनी. आपल्या सोसायटीत दिवाळी पहाटही साजरी झाली आणि वार्षिक श्री सत्यनारायणाची पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमही यशस्वीपणे संपन्न झालेत. त्यामुळे सर्वप्रथम मी श्रीयुत पोंक्षे आणि श्रीमती गौरी गोठीवरेकर यांचं मनापासून अभिनंदन करून आभार मानतो.

पहिल्या दिवसाचा कराओके कार्यक्रम इतका बहारदार असेल असं मी तसूभर ही कल्पना केली नव्हती. श्री बालासुब्रमण्यम, श्रीकांत काकडे आणि सुरेश जी यांनी किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि मन्नाडे यांच्या मधुर सुरात चांगल्या चालीची क्लासिकल गाणी गाऊन प्रेक्षकांच्या खिशातल्या रोकडा नोटा बाहेर काढायला लावल्यात. कोणत्या शब्दात या नोटांचं वर्णन करू........सांजकी दुलहन बदन चुराये, चुपकेसे आये. अशी एकसे बढकर एक गाणी सादर झालीत आणि शीतचंद्रलोकवासीयांनी मनसोक्त जुन्या गाण्यांचा आनंद लुटला.  काळ्या ढगांच्या फटीतून जशी सोनेरी किरणे चकचकावीत त्या प्रमाणे या सुंदर कार्यक्रमात दुधात साखर पडली ती श्रीयुत पोंक्षे आणि श्रीमती गौरी गोठीवरेकर यांच्या अफलातून धमाल अँकरिंगमुळे. एकवेळा बालासुब्रमण्यम यांनी शंका उपास्थित केली की आप लोगोंको हमारे गाने अच्छे लगते है या इनकी, जो आप इतना रिस्पॉस दे रहे है उनको । त्यांनी तर त्यांच्या कार्यक्रमात येण्याची त्यांना ऑफर ही देऊन टाकली. ओरिजिनल लोक आहेत आमची.

ही कहाणी इथेच संपत नाही तर , पोंक्षे आणि गौरी गोठीवरीकर मॅडम यांनी A B C D च्या अद्याक्षरातून आपल्या आयुष्याचा पैलूंवर भाष्य करून त्यां अद्याक्षरांचा आपल्या समोर रहस्यमय अर्थच सांगितला.

प्रेम, मैत्रीण, आणि कोणत्याही मुलीचं शेवटचं अक्षर A किंवा आय या अक्षरानेच होतो. मी मनातल्या मनात पडताळणी करून बघितली. बायकोच्या शेवटचे अद्याक्षर A नेच संपते, काय आश्चर्य माझ्या तिन्ही मेहुण्यांचे शेवटचे अद्याक्षर सुद्धा.

V आणि H चा अर्थ ही असाच गहन सांगून, शेवटी Z च्या आद्यक्षरातून "झालं गेलं ते विसरा" हा जणू सर्व शीतचंद्रलोकवासीयांना संदेश दिला. झेड अक्षरात एवढी नम्रता मग प्रत्येकाने झेड हे अद्याक्षर आपल्या कोशात संग्रहित केलेच पाहिजे.

दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी 2019 ला श्री सत्यनारायण महापूजा  12 वाजता संपन्न होऊन चार वाजता सुश्राव्य भजन सादर झाले. महिलांचे हळदी कुंकू उत्साहात पार पडला.

सेक्रेटरी साहेबांनी मला रिक्वेस्ट केली होती की, तुम्हाला अभिप्राय द्यायचा आहे, तुमचे पर्सनल कार्यक्रम असतील ते पोस्टपोन करा. याला मात्र मी अपवाद निघालो, कारणही तसंच होतं - शिर सलामत तो पगडी पचास हे आडवं आलं. दुसऱ्या दिवसाचा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम शीतचंद्रलोक सख्यांनी गाजवला असा सुगंध दरवळला होता असं कानावर आलं. मात्र त्यांचं कौतुक करायचं राहून गेलं

प्रत्येकवेळा काही तरी सुटुन जातं आणि अभिप्राय देण्याचं औचित्य साधून ते सुटलेलं येथे थोडक्यात प्रस्तुत करतो.

सर्व सुखासुखी चाललं असतांना सुद्धा सुखाचा शोध घेतला जात असतो आणि तो थांबत नसतो. कोणी मला सुखाचं निवास दाखवलं तर मी त्याला एक लाख रुपये देईन असं म्हणणारा सुद्धा अजून माझ्या वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेला नाही. हे वाचून माझे जिवलग मित्र श्रीयुत गावडे साहेब मला चिमटे काढतील आणि म्हणतील साहेब अगोदर सोसायटीचा मेंटेनन्स भरा नंतर लाखाच्या गोष्टी करु आपण. ठीक आहे, come to the point   मला तुम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की आपल्या सोसायटीचे रिनोव्हेशनचे काम पूर्णत्वाकडे पोहचत आहे. एक अविश्वसनीय प्रोजेक्टची सांगता होईल पण काही आठवणी स्मरणात राहून जातील.

*शीतचंद्रलोक बिल्डिंग रिनोव्हेशन - एक अविश्वसनीय प्रोजेक्ट*

ज्या सोसायटीला २५ वर्षे झालीत परंतु एकही वेळा कलर दिला गेला नव्हता, जो कमीत कमी सहा वर्षातून एक वेळा दिलाच पाहिजे. अशा परिस्थितीत सोसायटीच्या ईमरतीची हालत फारच खराब झाली होती. ओपन झालेले पिलर्स , तडे पडलेल्या भिंती, उखडलेले प्लॅस्टर, गॅलरीची झालेली दुर्दशा आणि अशा परिस्थितीत गोळा झालेला सभासदांचा अपूर्ण रिपेअर फंड हा सभासदांना वापस करावा लागला. आणि साहजिकच प्रोजेक्ट लांबला. त्यातच स्टील, सिमेंट, रेती इत्यादी मटेरियल ची वाढलेली महागाईने कळस गाठला होता. परिणीती बजेट फुगलं.

स्ट्रक्चरल ऑडिट झाले, पेपरला जाहिरात दिली गेली, निविदा मागविण्यात आल्यात. कन्सल्टंट ची नेमणूक करण्यात आली. श्रीयुत फाटक साहेबांनी चॅलेंज स्वीकारलं, टीम कमिटी आणि नॉन कमिटी मेंबर्स यांनी त्यांना मोलाचं सहकार्य दिलं. रिनोव्हेशन केलेल्या सोसायटींचा वाशी, कल्याण येथे सर्वे करण्यात आला. काँट्रॅक्टरची निवड करण्यात आली, ऍग्रिमेंट बनवून त्याचं वाचन करून अर्थ समजावून घेण्यात आला. शंका objection यांचं निरसन करण्यात आलं. सोसायटी सभासदांना विश्वासात घेण्यात आले. फंड वसुली साठी कमिटीने पराकाष्टा केली. हे काम आणि हा प्रोजेक्ट साधा आणि सरळ नाही याची सर्वांना कल्पना आली होती. महिन्याला कधी पाच ते कधी सहा मिटिंग्ज घेण्यात आल्यात. फंड मॅनेजिंग श्रीयुत पावसकर साहेबानी सांभाळला, टेक्निकल बाजू श्रीयुत कुंभार आणि सचिन सुर्वे यांनी संभाळल्यात. श्री वेणूगोपाल आणि अमर यांनी टेंडर बनवून साचेबंद केले. श्रीयुत गायकवाड, काटकर आणि चव्हाण यांनी कामाची मोजदाद आणि आपापली नेमून दिलेली कामे यथोचित संभाळलीत. श्रीमती गुरव आणि सौ.गावडे यांनी ठरवून दिलेली कामे करून हातभार लावला. असा हा अविश्वसनीय प्रोजेक्ट म्हणजे प्रचंड मेहनत आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर "अनबिलिव्हेबल" अशा प्रोजेक्टचं काम पूर्ण होत आहे. And credit goes to *"Mr. Pathak and his team"*  How is the josh मी सर्जिकल स्ट्राईक वर बोलत नाही. एक वर्षांपासून काम चालले आहे आणि सर्वांना खूप त्रास होत आहे. हे तुमचं म्हणणं खरं आहे. परंतु त्याच्यात GST आडवा आला आणि विश्वकर्माने आपल्याला मार्ग दाखवला. त्यांच्यापासून खूप शिकायला मिळाले. त्यांच्याशी आपलं एक नातं निर्माण झालं हीच त्यांची आणि आपली ओळख स्मरणात राहणार आहे. शितचंद्रलोकच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांनी अशीच कृपादृष्टी शीतचंद्रलोकवर ठेवावी ही आर्जव आम्ही करतो.

खरं सांगू इच्छितो, आपले आभार व्यक्त करण्यासाठी मला शब्द सापडत नाहीत, आपण म्हणजे श्रीयुत गाडगीळ, श्रीयुत पोंक्षे, श्रीयुत चौधरी, मिसेस गोठीवरेकर आणि श्रीयुत पावसकर यांनी कमिटी सभासदांचा जो गौरव केला आहे, ती अप्रतिम भेट स्वीकारून आम्ही भारावून गेलो आहोत. भारावून गेलो आहोत.

धन्यवाद

ठेचा

ओबडधोबड शेंगदाणा आणि लसूण कुटून झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर नुसता जीव कासावीस होतो. कपाळावरच्या नसा तड तड उडायला लागतात. आमच्या शीतचंद्रलोक सोसायटीतील सख्या यांच्या शेकोटीच्या भरीत भाकरीच्या पार्टीत सर्व पुरुष लहानथोर मंडळी लायनीत उभे राहून कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. आमच्या सोसायटीतील पुरुष मंडळी डोळ्यात पाणी आल्याशिवाय कोणी एकमेकांशी ब्र शब्द बोलेल तेंव्हा ना, सर्वकाही चिडीचूप तोंडातल्या तोंडात मिटक्या मारत चाललेलं असत. ठेचा म्हटल्यानंतर कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही अस होणारच नाही, परंतु माझ्या अंगाला मात्र दरदरून घाम फुटतो. ठेचा हा निव्वळ झणझणीत मिरची पासून बनविलेला असतो म्हणून नव्हे तर त्याला स्वयंपाक घरातली सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाजूला सारून चक्क लोखंडाच्या खोलगट तुळई मध्ये घालून व लोखंडाच्याच मुसळीने तुडवला जातो. हे रेखा चित्र नव्हे, तर माझ्या लहानपणी मी एकदा मित्रांबरोबर उकिरडे तुडवीत होतो "हे आईला कळलं" असं बहिणीने मला सांगितलं. आई आज तुझा चांगलाच ठेचा करणार आहे ! परिणाम असा झाला या दहशतीची ही परंपरा वह कौन थी या सिनेमातली मेणबत्ती घेऊन भयाण अमावस्येच्या रात्री फिरणारी स्त्री बघितल्यानंतर सुद्धा घाबरायला होणार नाही एवढी दहशत आमच्या घरी जागृत अवस्थेत वावरते असते. स्त्रीयांनी संपूर्ण राग ठेचा बनविण्यात घालविला असं कधी ऐकण्यातही आलेलं नाही आणि तसं असतं तर त्याला खमंग चवही आली नसती. हे वाचून आमचे मित्र गावडे साहेबांना राक्षसी आनंद मिळणार नाही परंतु मला चिमटे जरूर काढतील आणि म्हणतील काय हाच विषय सापडला का तुम्हाला खरडायला. सुखासुखी मिळतंय ना राव खाऊ द्या ¡ सुखाचा शोध घेता घेता ठेचा चा शोध लागला असावा का म्हणून माझ्या डोक्यातलं चक्री वादळ सैरा वैरा धावत सुटलंय. परंतु या ठेचाचे कुठलेही धागेदोरे, विकपीडिया, लिखाण सापडत नाही. ब्रिटिश लोक 1947 मध्ये भारत देश सोडून गेलेत परंतु त्यांच्या मेजवणीतही ठेचून ठेचलेल्या ठेचाचा उल्लेख सापडत नाही.

आपल्या महाराष्ट्रातला हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा, हा आमच्या शीतचंद्रलोक सोसायटीत दरवर्षी शीचंद्रलोक सख्या कडून शेकोटी या अजरामर झालेल्या नावाने प्रचलित आहे. हा भरीत भाकरीची मेजवाणीचा उपक्रम दरवर्षी न चुकता सोसायटीच्या आवारातच राबविला जातो आणि आम्ही शीतचंद्रलोक रहिवासी सुद्धा तेवढीच आतुरतेने वाट पहात असतात. या वर्षी सुद्धा आमच्या सोसायटीच्या प्रांगणात संध्याकाळी हिरव्या मिरचीचा ठेच्याचा झणझणीत खमंग दरवळणार आहे.