Monday 29 October 2018

खिडकीतलं चांदणं

आपली कोणतीही गुपितं कोणालाही कळनार नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीची खबर बात हिच्यामार्फत घेतली जावून तुमच्यावर नजर ठेवली जाते. प्रत्येक घर, हवेली, कचेरी, राजवाडा किंवा गगनचुंबी इमारतींचा आराखडा तिच्याशिवाय पूर्ण होत नाही. आकाशाला गवसणी घालणाऱ्या गगनचुंबी इमारतींना भव्य सुशोभित दरवाजे असतील भले, परंतु ही नसेल तर त्याचं रूपांतर बंद अडगळीची कोठडी असाच करावा लागेल. आणि हिच्यातूनच म्हणजे याच खिडकीच्या माध्यमातून, अर्थात कॉम्प्युटरच्या आधुनिक विंडोज मधून साऱ्या जगाचा वेध घेतला जातो.

कोणी कल्पनाही केली नसेल की पूर्ण विश्वात राज राजवाडे पासून गगनचुंबी इमारतींचे सौंदर्य खिडकी शिवाय खुलून दिसत नाही. म्हणूनच गृह रचनेच्या आराखड्यात दरवाजा इतकेतच खिडकीला सुद्धा महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. खिडकी विषयी प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल असतं. कुणाचं आणि कशासाठी तरी हळवं मन तिच्यात दडलेलं असतं. घड्याळाचा उपयोग न करता खिडकीतूनच रस्त्यावरील चहाची टपरीवर कोणकोण लोक उभे आहेत,  वाण्याचं दुकान अजून उघडलं कसं नाही.  दूधवाला, इस्त्रीवाला यांची दुकानं आज का बरं लवकर बंद झालीत. एरवी बहिणाबाईंच्या गार्डन पर्यंत हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत जाणारी रिक्षावाल्यांची लाईन आज सामसूम का दिसत आहे, आज रिक्षावाल्यांचा संप-बिम्प तर नाहीना,  या सर्व प्रश्नांची उत्तरं या खिडकीतून व्यवस्थित मिळतात. पण खिडकीतून न बघताही भाजीची गाडी केव्हापासून येऊन तो आता जायच्या तयारीत आहे हे खिडकीतून येणारी त्याची ललकारी बायकांच्या लक्षात आलेली असते आणि म्हणून हातातला पेपर वाचायचा सोडून भाजी घ्यायला मला पळावं लागतं.  एरवी नाही त्या रिकामटेकड्या गोष्टींची दखल सुद्धा या खिडकीतूनच घेतली जाते. भिंतीला कान असतात तसे खिडकीलाही डोळे असतात बरे. कोणाच्या घरी मुलगी बघण्यासाठी पाहुणे आले, तरी त्याची खबरबात आपल्या घरच्या मंडळींना या खिडकीतून पुराव्यानिशी लागतो आणि चाळीत त्याची बातमी अगदी वाऱ्यासारखी या खिडकीतून त्या खिडकी पर्यंत पोहचते. सासू कितीही चलाख आणि हुशार असली तरी तुमच्या घरातली गुपितं सुद्धा याच खिडकीतून बाहेर पसार होतात. माहेरचा कोणीतरी दिसेल आणि त्याला निरोप देऊ या इच्छेने मिनीमिनीटाला खिडकीच्या बाजूने येरझारा घालणाऱ्या सुनेच्या आशा सुद्धा याच खिडकीत जिवीत असतात.
आपण इतिहासात डोकावून बघितले तर आपल्याला आढळून येईल की गड किल्यातल्या राणी महालांच्या खिडक्या तेवढ्याच सुशोभित असायच्या जेवढे महालांचे दरवाजे. याच खिडकीत बसून राजकुमारी आपल्या स्वप्नातला राजकुमार स्वार होवून येत असलेल्या घोड्याच्या टापांचा आवाज ऐकण्यासाठी तासन तास वाट बघत असे. राजकुमार परतीच्या प्रवासाला निघाला असतांना याच खिडकीच्या पडद्या आडून त्याला प्रेमाचा इशाराही करत असे. अश्या प्रकारे राजकुमारीचं हळवं मन याच खिडकीत दडलेलं असे .शहजहानला ज्या कारागृहात बंदिस्त केले गेले होते त्या कारागृहाच्या खिडकीतूनच ताजमहालचं सौंदर्य तो रात्रंदिवस  न्याहाळत असे.

पूर्वी गडकिल्ल्यांच्या तटबंदीला सुद्धा छोटया छोटया खिडक्या असायच्या, पण त्यांचा उपयोग शत्रूवर गरम तेल ओतण्यासाठी असायचा. आजच्या युगात अश्या तेल ओतीव खिडक्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजकाल राजकारणातल्या खिडक्यातून गरम गरम तेल एकमेकांच्या अंगावर रोज सर्रास ओतले जात आहे. तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी सरकारी मदतीची खिडकी असते परंतु असल्या खिडकीचे गज हे गंजून पूर्ण निकामी झालेले असतात.  नोव्हेंबर 2016 च्या नोट बंदीच्या काळात बँकांच्या मागच्या खिडकीतूनच नोटा बदलल्या गेल्या असं आपण प्रत्यक्ष पाहिलं होतं.

खिडकीत बसून चहा अथवा कॉफीचा घोट घेत मस्त बाहेरचा माहोल न्याहळाने हा आनंदाचा क्षण प्रगट करण्याचा आपला आयुष्यातला एक आविष्कार असतो. अशा प्रकारे मानवी मनाच्या खीडकीतूनही भाव भावनांचे अनेक वारे वाहत असतात. कवी आणि लेखकांनी सुद्धा खिडकीला आपल्या साहित्यात मानाचं स्थान दिले आहे. लेखिका सौ शुभदा खरे, त्यांच्या दोनहजार साली लिहिलेल्या वृत्तपत्रीय लेखात  खिडकीचं वर्णन करतांना म्हणतात "मध्यरात्र टळून गेली पण डोळ्यात झोपेचं नामोनिशाण नाही. येणार कशी झोप ? नुकतीच मिलर आणि बुन्सची बेहद्द रोमँटिक कादंबरी वाचून संपविली....मी लिहियतेना या टेबलावर सुद्धा चांदणं पसरलंय. खिडकी समोरच चंद्र आलाय आणि मिस्किलपणे हसत विचारतोय, काय मधुचंद्राला येणार का माझ्या घरी ! खरच रे, आपल्याला मधुचंद्राला चंद्रावर जाता आलं असतं तर किती छान झालं असतं!" खिडकी बाहेर धुंद वातावरण पसरलय ! कुसुमाग्रजांची कविता मनात बहरून येते ‘काढ सखे, गळ्यातील | तुझे चांदण्यांचे हात 'क्षितिजाच्या पलीकडे | उभे दिवसाचे दूत’

No comments:

Post a Comment