Monday 1 July 2019

वीर

म्यानातुनि उसळे तरवारीची पात
आकाशातून ओघळे उष्माची लाट
डोक्यावर पगडी, हातात ढाल
अनवाणी वीर नाचले रणरणत्या उन्हात



चाळीसगांव पासून पंधरा किलोमीटरवर वसलेले एक छोटेसे गांव, धामणगांव. चाळीसगांव पासून खडकिसींम वरून काटकोनात सरळ डांबरी रोड धामणगांवाची वेस ओलांडून गांवापर्यंत जातो, धामणगांवाची  रचना इतर गावांच्या पेक्षा वेगळी नाही. गांवात प्रवेश करताना मोठी गडकिल्यासारखी कमान नसली तरी गावात शिरण्यासाठी मोठा सताड उघडा दरजा आहे. विज्ञान जरी प्रगत असले तरी गांवातील प्रत्येक कुटुंबे देवधर्म पाळतात. आजही वीर देवाला वंदन करण्यासाठी, त्यांचे स्मरण करण्यासाठी वीर काढण्याची प्रथा आहे. मला आठवतं आमच्या घराण्यात माझे काका दिनकर चव्हाण, महारु आप्पा, नामदेव काका, विनायक अण्णा हे वीर झालेले मी पाहीले आहेत. वीर देव हे चव्हाण कुळाचे देव आहेत. वीर देवांची ऐतिहासिक पार्श्वभूमी कोणाला ज्ञात नसली तरी दरवर्षी परंपरेने, श्रद्धापूर्वक वीर काढण्याची प्रथा पूर्वजांपासून चालत आलेली आहे. वीर देव नदीच्या तीरावर एका शेतात स्थित आहेत. वीर संस्कृती जपण्यासाठी वीरांची गांवातून वाजत गाजत नाचत मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीला सुरुवात झाल्यापासून वीर नृत्य करीत मार्गक्रमण करीत असतात. गांवच्या चौका चौकातून, गांवाच्या मध्यभागी असलेल्या मारुती मंदिराच्या प्रांगणात वीरांना उधाण येते. वीर जेंव्हा जोश मध्ये येवून नाचतात तेंव्हा अंगावर रोमांच उभे राहतात. मार्चच्या रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने वीर हे बेभान होवून नाचतात कसे हे एक आश्चर्यच आहे. वीर, वाजंत्री हळू हळू पुढे सरकत मराठी शाळेवरून, तुळजापूर माता भवानीचे दर्शन घेतल्या नंतर देवगांवच्या मारुतीला फेर घातला जातो आणि पुढे मूळ वीर वसलेल्या ठिकाणापर्यंत दुपारी 12च्या मध्यान्ही समाप्ती होते. बोकड कापला जाऊन मटणचं जेवण पाहुण्यांना आणि गांवाला दिले जाते. तृप्त मनाने आलेले पाहुणे हळू हळू आपल्या मूळ गांवी वापस जातात. अशा प्रकारे आपल्या वीर देवांची पूर्वापार चालत आलेली पूर्वजाप्रती कृतज्ञता जपली जाते.

No comments:

Post a Comment