Friday 5 July 2019

रिकाम्या टिकाकारांचा देश

लोकशाहीचा धागा उलगडून बघितला तर सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखविणे हे विरोधी पक्षाचे धोरण असुच शकत नाही, म्हणून टीका जरूर करावी पण ती योग्य जागी अन योग्य शब्दात. जसं भांड्याला भांडं लागावं अन मधूर नाद निर्माण व्हावा आणि सामाजिक पर्यावरणाचा समतोल राखला जावा परंतु तसे होतांना दिसत नाही. सध्या राजकारणात प्रचंड चिखलफेक चालू आहे. वि.स.खांडेकर 1997 मध्ये लिहिलेल्या "पहिले पान"  या पुस्तकात लिहितात, गवताची गंजी पेटवायला काही वाजत गाजत मशाली आणाव्या लागत नाहीत. निष्काळजीपणाने विडी ओढणारा मूर्ख मनुष्य एक ठिणगीने ते काम करू शकतो. आणि हे त्यांचे साधे विचार आज तंतोतंत लागू पडतात.

रिकामा ..... भिंतीला तुंबड्या लावी, ही म्हण ग्रामीण भागात रोजच्या दैनंदिन जीवनात सर्रास वापरली जाते . माझी हयात निघून गेली परंतु न्हावी कधी रिकामा बसलेला मी अजून तरी पाहिलेला नाही. तरी सुद्धा ही म्हण त्याच्या माथी का मारली याचा मला काही ताळमेळ लावता येईना ! एक वेळा म्हणीतला हा न्हावी परवडला अशी म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे. कारण आपल्याकडे उठ सूट कोणत्याही घटनेवर टीकाकार आणि बिन टीकाकार सुद्धा जी झोड उठवितात त्यावरून असे वाटते की भारत हा रिकामटेकड्या टीकाकारांनी भरलेला देश आहे. कधी हे टीकाकार सध्या चालू असलेल्या वर्ल्ड कप चॅम्पियनशीप स्पर्धा मधील इंग्लंडविरोधातील भारताच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उभे करतात, तर कधी पावसामुळे यांच्या घरात गुडघाभर पाणी शिरलं तर ते सरळ सरळ सत्ताधारी पक्षावर खापर फोडतांना दिसतात. त्यांना माहीत आहे की 45 वर्षानंतर मुंबईत तुफान पाऊस झालेला आहे, परंतु टीका करून आपल्या जिभेची हौस पूर्ण करण्याचा मार्ग मात्र सोडत नाहीत. याच्यापुढे जावून, सत्ताधारी लोक नाल्यातून पैसे खातात म्हणून मुंबई पाण्यात गेली. या टिकेला काय म्हणावं ! आता अलीकडे खेकड्यानी चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फोडलं असा असा अजब युक्तिवाद जलसंधारण मंत्र्यांकडूनच ऐकायला मिळाला आणि त्याच्यावर कहर म्हणजे नवाब मलिक साहेब म्हणतात तिवरे दुर्घटना म्हणजे ‘भ्रष्ट मोठे मासे’ वाचवण्यासाठी खेकड्यांचा बळी गेला. बरं हा रमीचा डाव इथेच संपत नाही तर आता काही पक्षातील लोकांनी ठाण्यातून जलसंधारण मंत्र्यांकडे खेकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा चघाटया चघळून चघळून वीट आला नसेल तेवढ्यात दुसरं प्रॅक्टिकल समोर आलं. गोवा महामार्गावर काही राजकीय नेत्यांनी ऑन ड्युटी असलेल्याअभियंत्यावर चिखल भरलेल्या बादल्या ओतून चक्क त्याला अंघोळ घातली. आहे की नाही अजब व्यक्ती स्वातंत्र्य आपल्या देशात. आणि आताच एक बातमी येवून थडकली आहे की राहुल गांधींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना खडसावले आहे की मुंबई तुंबली तेंव्हा तुम्ही झोपला होता काय.

अतिवृष्टीमुळे महामार्गावर दरळ कोसळली तर टीकाकार  सरकारला दोष देवून टीव्ही चॅनेल वर एकमेकांचे कांन फुंकत बसले तर आश्चर्य वाटून घेऊ नये.

आशा प्रकारे आपल्या देशात भरपूर भिंतीला तुंबड्या लावणारे राजकारणी असतांना गरीब बिचाऱ्या न्हाव्याला "रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी" उगीच या म्हणीचा बकरा बनवला गेला !


No comments:

Post a Comment