Monday 8 July 2019

जगबुडी

पावसाळा चालू असल्यामुळे मस्तपैकी बायकोला गिलक्याची भजी तळायला सांगावं आणि खिडकीत बसून मस्त वाफाळलेला चहाचे घुटके घेता घेता मुसळधार पावसाचं नेत्रसुख घेत राहावं, हे सर्व ठीक आहे. पण काही शब्द इतके भयानक असतात की, नुसते ते कानावर पडले किंवा डोळ्यांनी वाचले तर थरथर कापायला होतं. आज झोपेतून उठल्याबरोबर वर्तमानपत्र चाळता चाळता जगबुडी नदीला महापूर ही बातमी वाचून छातीत धडकीच भरली !  दर पावसाळ्यात जगबुडी तिच्या भोवतीचे जग बुडवतेच असा इतिहास समजल्यावर पुढचं विचारू नका. बरं ही नदी आपल्या महाराष्ट्रातून वाहते हे समजल्यावर आपण काय मागच्या जन्मी दुष्कृत्य केली म्हणून या जन्मी शिक्षा उपभोगण्यासाठी आपल्याला जगबुडी नदीच्या परिसरात जन्म घ्यावा लागला असेल !  असे विचार माझ्या मनाला घाबरवून गेलेत. थोडं हिस्ट्री जाणून घेतल्यानंतर जीव भांड्यात पडला. कोकणातल्या सगळ्याच नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावून अरबी समुद्राला मिळतात. म्हणून कोकणला एवढं सुष्टीसौंदर्य लाभलं कसं, असा प्रश्न पडत असेल तर येवा कोंकण आपलोच असा म्हणजे जावे त्याच्या स्थळी तेंव्हा कळे. पूर्वेला सह्याद्री पर्वत आणि पश्चिमेला अरबी समुद्र यांच्यामध्ये चिंचोळ्या कोकणपट्ट्यातून अनेक छोट्या-मोठ्या नद्या वाहतात. जगबुडी नदी रत्नागिरी जिल्ह्यात वडगाव येथे सह्याद्रीच्या कुशीत उगम पावते आणि वाशिष्ठी नदीला येवून मिळते. जगबुडी नदी वशिष्ठीचीच प्रमुख उपनदी आहे. सुष्टीसौंदर्यात भर टाकणाऱ्या या नद्या पावसाळ्यात उग्र रूप धारण करतात आणि धोक्याची पातळी ओलांडून आजूबाजूचं जग आपल्या कवेत घेतात म्हणून दर पावसाळ्यात जगबुडी तिच्या भोवतीचा परिसर बुडवतेच.

No comments:

Post a Comment