सोमवार, १९ मार्च, २०१८

निसटलेले

मचल मचलके ये हवाये बुला रही है तूम्हे 

वाऱ्याचा मागमूस नसतांना देखील मोगऱ्याचा वास चौफेर दरवळतो त्याचं किती वारेमाप कौतुक होतं. त्याप्रमाणे न चाहूल लागू देता शिशिरची पानगळीला सुरुवात झालेली असते परंतु त्याचं कोणालाही सोयरसुतक नसतं. पण पाऊस कधी कधी एवढा उतावीळ झालेला असतो , की तो आपल्याला  छत्री उघडू देण्याची थोडी उसंत देखील देत नाही. टप टप आवाज करत तो तिच्या वेणीवरून, गालावर, तिच्या अंगा खांद्यावरनं निथळत तिच्या पदरात सामावतो. पहिल्या पावसामुळे जमिनीतून येणारा विशिष्ट प्रकारचा सुगंध दरवळला नंतर वातावरणात होणारा बदल, फुलणारे एखादे फुल, आईच्या मांडीवर रांगणारे एखादे मूल, घरात जागा नसल्यामुळे कपाटात कोंबून ठेवलेली वाचनीय आणि आवडती पुस्तके आणि त्यातून येणारा हवा हवासा कुबट वास, स्टेशनवर पोहचण्या आधीच मीस झालेली ट्रेन, आणि कोणी तरी दिलेला मदतीचा हात. पहिल्याच वेळेला सासरी गेलेल्या पोरसवदा मुलीला लागलेली माहेरची ओढ, आईच्या शेजारी उभे राहून तिने फिरविलेला मायेचा हात. दुसऱ्याच दिवशी "मला माहेरी करमत नाही, बाई गं !  असं गाणं म्हणणाऱ्या तिच्या जिवलग मैत्रिणी.  जिवलग मित्राबरोबर रायगडावर पौर्णिमेच्या रात्री मारलेल्या मनसोक्त गप्पा, भर गर्दीच्या ठिकाणी मित्राची आठवण काढावी आणि साक्षात तुमच्यासमोर त्याने प्रगट व्हावे याच्या पेक्षा दुसरा आनंद कोणता बरे असेल. दुपारचा मध्यांनं, ऊन मी म्हणत होतं. जाणाऱ्या गाड्यांचा धुराळा सहन होत नव्हता, ऑफिसला जाण्यासाठी म्हापे बस स्टॉप वर कोणी लिफ्ट देईल का त्याची वाट बघत उभा होतो. एक छोटा टेम्पो ड्रायव्हरने लिफ्ट द्यावी आणि आपल्याला कोणी बघत तर नाहीना अशी खात्री करून अंग दुमडून त्या छोट्या टेम्पोत ड्रायव्हर शेजारी आसनस्थ झालो. अल्फा लावल कंपनीच्या इच्छित बस स्टॉप वर उतरून त्याला भाड्यापोटी पाच रुपये देवू केले असता त्याने नम्रपणे नकार द्यावा. ती व्यक्ती VIP असावी. अहंकाराचा लवलेश नसलेला, नम्रताने भरलेला आणि जमिनीवर चालणारा तो  तीन फॅक्टरीचा मालक निघावा. सारेच काही समजण्या पलीकडचे होते. त्याची गाडी दिसे नाहीसी होईपर्यंत मी ऑ करून बघतच राहिलो आणि एका सेकंदात त्याने माझं आयुष्याचं गणित बदलवून टाकलं. आता पुढच्या क्षणचित्रात रात्रीचे बारा वाजून दहा मिनिटे झाली होती. 17 तारखेच्या रिझर्वेशन प्रमाणे आम्ही कल्याण प्लॅटफार्मवरून चेन्नई एक्सप्रेस पकडली. एक्सप्रेस ट्रेन ने केलेला प्रवास तर अविस्मरनियच होता कारण मध्यरात्री नंतर चोर पावलाने येवून बदलणाऱ्या तारखेमुळे होणारा प्रवासाचा महा खेळ खंडोबा झाला होता. आमची स्लीपर सिटे दुसऱ्या लोकांनी अगोदरच ऑक्युपाय केलेली होती.  रेल्वे टीसी हळूच माझ्या कानात कुजबुजला, "तुमची गाडी कालच गेली हो". कालांतराने या स्मृती जरी जाग्या झाल्यात तरी हसून हसून शरीराची पुरे वाट लागते. अशा छोटया छोटया घटना आपल्या आयुष्यात डोकावत राहतात. अनेकदा असे फजितीचे तर कधी मनाला सुखद धक्का देणारे हे क्षण न सांगता येतात आणि खूप धावपळीचे आयुष्य घालवितांना आपल्याला कधी दिसतात तर कधी ते दिसतच नाही. अश्या निसटलेल्या क्षणातूनच आपलं आयुष्य बनत जातं.

रविवार, ११ मार्च, २०१८

बांबूच्या बनात

वेळूच्या झाडाला कधी फुले येत नाहीत. परंतु निसर्गाने याच जन्मात त्या झाडाला परतावा दिलेला आहे. झाड नष्ट व्हावयाच्या अगोदर ते फुलांनी बहरून येते हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. शास्त्रीय कारण काहीही असो, परंतु मनुष्य असल्या सद्गुणांनी कमी जास्त अधिक प्रमाणात नखशिखान्त ओतप्रोत भरलेला आहे हे नक्की.

तरुण मुले आणि मुली यांच्यात फरक एवढाच आहे  की, तरुणांना बियरच्या बाटलीचं झाकण कसं उघडायचं याचं प्रशिक्षण जसं कुठंही घ्यावं लागतं नाही, त्याप्रमाणे पारंपारिक आणि अपारंपारिक उत्सव साजरे करण्यासाठी भर रस्त्यावर बांबू गाडण्याचे ज्ञान सुद्धा त्यांना सहजगत्या प्राप्त होतं. परंतु तरुण मुलीला पोळीची कणिक सैल किंवा घट्ट कशी मळायची हे मात्र तिला आईच्या शेजारीच उभं राहूनच शिकावं लागतं.

 तसं म्हटलं तर रानटी झाडांचे सोयरसुतक नसलेल्या कवी लेखकांची प्रतिभा सुद्धा ह्याच बांबूच्या स्टेजवर वृक्ष वेलींचं कौतुक करण्यासाठी बहरते आणि याच स्टेजवर मंत्री महोदय सुद्धा मोठमोठी रस्ते महामार्ग बांधण्याचं सूतोवात करून तोंडभरून स्वतःचं कौतुक करून घेतात. आयुष्यभर बांबूच्या बनात वावरताना शेवटी बांबू हेच मानवाला समशान भूमीकडे नेण्याचे काम दिन रात अव्याहतपणे करत असतात. परंतु खेडोपाडी, गावो गांवी असलेल्या स्मशान भूमीला जाणारा रस्ता सुशोभित असावा आणि तेथेही पाण्याचा नळ असावा असे कोणत्याही मंत्र्यांच्या गांवी नसते. जिकडे तिकडे बांबूचं बन असतं. महिला दिनाचा पुरस्कार करणारा पुरुष सुद्धा एक दिवसापूरताच असतो. बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस वैकुंठ भूमीला कुंपण का असावं या चर्चेचं गुऱ्हाळ मांडण्यातच तो व्यस्त असतो. कोणतेही न्यूज चॅनेल लावून बघा, अश्या बरेच बांबूचे बन आपल्याला पेटलेले दिसतील.

सोमवार, ५ मार्च, २०१८

नाना

अजुनी येतो वास फुलांना अजुनी माती लाल चमकते । खुरट्या बुंधावरी चढूनं अजुनी बकरी पाला खाते ।

बा.सी. मर्ढेकरांच्या या ओळी मला त्या विश्वात परत परत खेचून नेतात. कारण लहानपणी मी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, रुळलो, वागलो, माझ्या बालपणाचं आयुष्य काढलं आणि ज्याने माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला ते माझे नाना, नव्हे माझे दैवतच. अजून त्या माझ्या गांवी राहत आहेत. नात्याने ते माझे काका जरी असले तरी काका हा शब्द अजून पर्यंत माझ्या ओठावर कधी आला नाही आणि आजतागायत "नाना" म्हणूनच मी त्यांना हाक मारतो. बालपणाचा प्रत्येक क्षण मी त्यांच्या सहवासात घालविला. माझे दोन्ही पाय त्यांच्या मानेच्या बाजूला सोडून त्यांच्या खांद्यावर बसून मी प्रवास करत असे. कधी बैल गाडीवर बसून, गर्द रानातून चाकोरीबद्ध खडबडीत रस्त्याने राजमाने या शेजारील गांवच्या खंडोबाच्या यात्रेला जात असू. म्हणूनच मुबंई शहरात वास्तव्याला असून सुद्धा अजून मला बैल गाडी चालविण्याचं कसब माझ्या अंगी मौजुद आहे ते यामुळेच. मला आठवतंय, भाकर बांधून चांदण्या रात्री, बैलांच्या गळ्यातील घुंगर माळांची गाज ऐकत, शेतमळ्यावर राखण करायला झोपायला जात असू, कधी कधी शेतमळ्यावरून परस्पर  कोणाला चाहूल न लागू देता रातोरात शेजारच्या बाजारपेठेच्या गांवी तमाशाला जाण्याची मजा काही अलंगच होती, परंतु  सूर्य नारायणाचे दर्शन व्हावयाच्या आत त्यांचे शेत मळ्यावरील खळ्यात शेताच्या बांधावर गवत कापण्याचे नाही तर मोटेवरून पाणी भरण्याचे काम चालू झालेले असायचे. मी चार पायी खाटेवरच्या अंथरुणात पडल्या पडल्या ही सारी गंमत बघत असे. त्याच क्षणी एक विहंगमय दृश्य नजरेस पडायचं. सकाळच्या प्रहरी टेकड्यांच्या पलिकडून लालबुंद आणि तांबूस रंगाचा गोल मुंगीच्या पावलासारखा तर तर चालत पृथ्वीच्या पोटातून वर येतांना दिसायचा, जणू वसुंधरेने बाळाला जन्म दिला.

सकाळच्या सौंदर्याने ओतपोत भरलेलं ते माझं गांव धामणगांव आणि ते माझे नाना अजून गांवी त्या मातीच्या घरात राहतात. अजून असं वाटतं ते लहानपण परत एकदा यावं आणि त्यांच्या खांद्यावर दोन्ही पाय आजूबाजूला टाकून, त्यांच्या डोक्यातली टोपी माझ्या डोक्यात घालून त्यांचे केस विचके-वाचके करून टाकून त्यांच्या खांद्यावर ठाण मांडून बसावे. किती दिवस झालेत रात्रीच्याला त्यांच्या बरोबर शेतावर नाही गेलो, रात्रीच्याला परस्पर चाहूल न लागू देता त्यांच्याबरोबर तमाशा बघायला नाही गेलो. ते सकाळी सकाळी  मोटेवरचं पाणी, शेताच्या बांधावरचं गवत कापणं, तो लालबुंद सकाळचा सूर्यगोल मनातून पुढे सरकतच नाही. म्हणून अजुनी येतो वास फुलांना अजुनी माती लाल चमकते । खुरट्या बुंधावरी चढूनं अजुनी बकरी पाला खाते ।

शनिवार, ३ मार्च, २०१८

किलबिल कोवळी मने


मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यांची मनं निर्व्याज्य असतात. चिखलात उमलल्या स्वच्छ कमळांच्या पाकळ्यांसारखी. फुल उमलायच्या अगोदर त्या निर्व्याज्य नाजूक कळ्यांकडे बघा, कशी हात लावताच ती गळून पडतात.  त्यामुळे त्यांना झाडावरून तोडायचं नसतं. त्यांना झाडावरच फुलू द्यायचं असतं. आपण नुसते डोळे जरी वटारले तर त्यांच्या नाजूक पापण्या चिंब भिजतात. तृणांच्या पात्यांवर दवाने थब थबून गेलेल्या दवबिंदूसारखी त्यांची मने कधी ओथंबून विरघळतील हे त्या मातेशिवाय कोणालाच कळत नाही.  मी ज्यावेळेस तिला विचारलं, कि तुम्ही लहान मुलं पायात बूट का घालतात. "पायमोजे खराब होवू नयेत म्हणून" असं तिने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं. या नाजूक, कोवळ्या किलबिल मनाच्या भावना , त्यांनी दिलेली उत्तरे ही तितकीच कोमल पिंजलेल्या कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि परिपक्व असतात. नितळ आणि निर्मळ पाण्यात खडा टाकून त्या नाजूक लहरी निवळेपर्यंत ती कोवळी मने असच तास न तास आपलं प्रतिबिंब बघत राहतात. त्यांच्या अदा बघा किती सुंदर असतात. रीम झिम पावसात पायाने पाणी तुडविणे, साबणाच्या पाण्याचे बुडबुडे हवेत सोडणे, मोठया माणसाचे बुट पायात घालून चालण्याचा प्रयत्न करणे, बाबांचा चष्मा काढून आपल्या स्वतःच्या डोळ्यावर चढविणे, लग्नात नवरदेवाचा घोडाच पाहिजे असा हट्ट करणे, आईच्या शेजारी उभे राहून छोटया छोटया पोळ्या तयार करणे, वाकडा तिकडा वाळूचा किल्ला तयार करणे, घरात लपंडाव खेळणे, दसरा असो किंवा मकर संक्रात असो, सोनं आणि तिळगुळ घरोघरी जावून यांना कसलां कमालीचा आनंद होतोय. मांजराचं आणि कुत्र्याचं पिलांशी यांची चांगलीच गट्टी जमते.

बुधवार, २८ फेब्रुवारी, २०१८

शीत-चंद्रलोक सख्यांचं वेगळेपण



एखादया कार्यक्रमाची सांगता करतांना भव्य स्टेज वरून श्रोत्यांचे आभार मानावे लागतात, आभार प्रदर्शन करण्याची संधी मिळाल्याबद्दल कमिटीला धन्यवादही द्यावे लागतात. आणि कार्यक्रमाचा एखादा भाग आवडला असेल तर कौतुक ही करावे लागते. पण आजचा कार्यक्रमाचं व्यासपीठ आणि विषय सुद्धा थोडा अलग आणि हटकेच आहे. निमित्त सत्यनारायण पूजेचं पण इथे एका विवाह सोहळ्याची सांगता करण्यासाठी शीत-चंद्रलोक सख्यांनीं न भूतो न भविष्यती असा सांस्कृतिक गलका केला. नवी नवरी श्वेता आणि गौरव तसे च वधू-वर कुटुंबियांना कपड्यांचा आहेर देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. एका नवीन संस्कृतीचे आगळे वेगळे दर्शन घडविले. हा भावपूर्ण क्षण माझ्या मनातल्या गाभाऱ्याच्या शिंपल्यात बंदिस्त झाला.

अशा या भावपूर्ण वातावरणात शीत-चंद्रलोक सख्यां मधील एक सखी श्रीमती सुजाता पेडणेकर यांनी सर्व सख्यांच्या वतीने  त्यांच्या शब्दांत नव्या नवरीचं तोंड भरून कौतुक केलं. "तोंडभरून कौतुक करणे" त्यांना कसं जमतं हे शितचंद्रलोक सख्यांव्यतिरिक्त कोणालाही आजपर्यंत माहीत नव्हतं. देवाने त्यांना बहाल केलेली ही देणगीच असावी आणि त्यांनी ती जपून ठेवली आहे. श्रीमती सुजाता पेडणेकर यांच्या शब्दात शब्दांकन केलेलं मनोगत वाचण्या साठी मॅजिकल आवाज लाभला आहे तो सौ गौरी गोठीवरेकर यांचा. दुधात साखर पडल्यानंतर चव कशी असणार. ढगांच्या फटीतून सोनेरी किरणांचा प्रकाश पडावा तसा सौ गौरी गोठीवरेकर यांनी त्यांच्या स्वरात सर्व सख्यांच्या समोर, नेहा गाडगीळ हीच्या सुवाच्च हस्तक्षरातलं, श्रीमती पेडणेकरांचं मनोगत, एक नव्हे दोन वेळा वाचून दाखवून त्यांच्या नवीन सखीला आमंत्रित केलं आणि तिच्या भावी आयुष्याच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्यात.

सखी श्वेता

"गौरव बरोबर सप्तपदी चालून चव्हाण कुटुंबाचा भाग झालीस. तुझ्या आयुष्यात अनेक नवीन नात्यांचा समावेश झाला. गौरवचे पत्नीपद, चव्हाण वहिनी आणि सरांची सून, सुवर्णाची वहिनी, कुणाची लाडकी मामी तर कुणाची काकू. यासोबत अजून एक नात्याने भर टाकली आहे, ते म्हणजे शितचंद्रलोक सख्यांचे नाते. ज्याला वयाची बंधने नाहीत."

"सख्या म्हणजे आधार, विश्वास आणि आपुलकी. सख्या म्हणजे प्रेमळ हाथ आणि शाब्बासकीची थाप."

"अशा या सख्या ग्रुपमध्ये तुझे सहर्ष स्वागत. आयुष्याच्या नवीन वाटचालीसाठी सर्व सख्यांकडून खूप खूप शुभेच्छा."


आपल्या शीत-चंद्रलोक सख्या

वैदेही गाडगीळ
मधुरा फाटक
शोभा गावडे
साधना भुवड
गौरी गोठीवरेकर
अनुश्री सुर्वे
सारिका फडतरे
दीपाली जगदाळे
कुसूम नल्ली
सविता घारगे
स्नेहल रावराणे
हेमा राव
समता पावसकर
संगीता गुरव
वंदना गुरव
ज्योती सस्ते
मनीषा काटकर
वसुधा कांडके
जागृती चौधरी
अंजली कुंभार
श्रद्धा पोंक्षे
स्वाती गावडे
हर्षदा गिड्डे
साक्षी सनगरे
नलिनी बागवे
कल्पना गायकवाड
अनन्या राणवशे
सुजाता पेडणेकर
सान्वी पेडणेकर
विजया थोरात
शीतल थोरात
ज्योती गिरकर
दक्षा गिरकर
शीतल पाटील
सरिता पाटील
पूजा घाडगे
मनिषा हेगिष्टे
सौ पोतदार

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

दोन रेशीम धागे

श्वेता-जयेश _दोन रेशीम धाग्यांनी विणलं आयुष्याचं महावस्त्र



सोसायटीतील कुटुंबीयांशी माझं कोणतं जन्मो जन्मीचं नातं आहे, हे डहाळीला समजण्यासाठी  कळ्यांना उमलावं लागत नाही, परंतु हे नैसर्गिक लेणं परमेश्वराने मानवाला बहाल केले असतं तर ही वेळच माझ्यावर आली नसती हे मात्र खरे,  पण जेंव्हा मला हे समजलं,  त्यावेळेस मी अतिशय भारावून गेलो. नवरा-नवरीचं शितचंद्रलोक मध्ये रात्री बारा वाजता आगमन होणार होतं. सोसायटीच्या गेट वर शितचंद्रलोक कुटुंबिय त्यांची आतुरतेने वाट बघत होते. वेळो वेळी, वधू वराची गाडी कुठपर्यंत पोहचली त्याचं स्टेटस विचारलं जात होतं. सर्व जेष्ठ मंडळी आणि विशेष करून शीत चंद्रलोकच्या संख्या यांनी नव वधू-वर यांचं  स्वगत केलं. नवरदेव आणि नव्या सखीचं औक्षण करण्यात आलं. रांगोळ्या, लक्ष्मीची पाउले, गेट पासून ते गृह प्रवेशपर्यंत फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.  गेट पासून बी विंगच्या निवसस्थानपर्यंत मंगल धून वाजवण्यात आली. त्यात दुधात साखर टाकली गौरवने. मी पुण्याच्या ग्राउंडवर बघत होतो क्रिकेट, श्वेताला पाहून पडली माझी विकेट_गौरव (मुलं काय छुपी रुस्तम असतात ना !!) तब्बल त्रेपन्न शितचंद्रलोक वासीयांनी बस मधून  लग्नाला येवून वधू-वरास आशीर्वाद दिला, अन हा माझा आयुष्यातला हायेस्ट स्कोअर बघून मी कमालीचा गोंधळलो. सारेच काही अद्भुत आणि समजण्याच्या पलीकडे. किन अल्फाजोमे मैं शुक्रिया अदा करू असे राजेश खन्ना आपल्या आवडत्या फॅन बद्दल एका मुलाखती मध्ये म्हणाला होता तेंव्हा त्याची अवस्था किती केविलवाणी झाली होती हे मला आठवलं. लग्नाच्या घाई गडबडीत माझी पेन्सिल मी म्यांन करून ठेवली होती याचे मला भान राहिले नाही. म्हणून मी माझा शब्द संग्रह रिता करून बघितला परंतु  गंजलेल्या कुलुपाला कोणतीच किल्ली लागायला तयार नाही हो. शेवटी आपले आभार न मानता आपल्या ऋणात राहायचे ठरवलं आणि  हे ऋण मी माझ्या साहित्याच्या ब्लॉग वेब पेजवर आजीवन जतन करून ठेवणार आहे.

परंतु आज झालं काय,  सकाळी सकाळी सूनबाईने आयुष्यातला पहिला वहिला गरम गरम वाफाळलेला चंहा हातात दिला आणि एक अद्भुत वातावरणाची निर्मिती झाली. काय आनंद असतो तो चहा पिण्यात. जावे त्याच्या वंशा असे म्हणतात ना तेंव्हा मला कळले. आणि त्या निमित्ताने म्यांन केलेल्या लेखणीलाही लिहिण्याचे स्फुरण मिळाले. पहिल्या दिवशी किती मजेशीर फजिती असतात ते आज अनुभवला मिळाले.  बघाना, नव दाम्पत्याने पाणी गरम करण्यासाठी चक्क कळशी आणि हंडा गॅस शेगडीवर ठेवला.





आईच्या उबदार कुशीतून कधी अचानक फुलपाखरासारखं 
मन मौज मस्ती करत सुटयायचं.
कधी शुभ्र झऱ्याच्या पाण्याखाली दडून राहायचं
तर कधी शुभ्र शिंपल्यात वाळूत मचून राहायचं
आज तेच मन शुभ मुहूर्ताच्या दिनी
तृणांच्या पात्यावर दवबिंदू होवून
हळूच जमीनीत विरघळलं

रविवार, २८ जानेवारी, २०१८

नवे पंख

मला आठवतो तो दिवस 31 जुलै 2015. ऑफिसात त्या दिवशी प्रत्येकजण माझ्याशी हस्तांदोलन करण्यात उत्सुक होता. कारण त्या दिवशी मी निवृत्त होणार होतो. दिवसभर फोन वरून रिटायरमेंटच्या शुभेच्छा आणि अभिनंदनचे मेसेजेस. मी अक्षरश: भारावून गेलो होतो. संध्याकाळी चार वाजता सेंडऑफ झाला. सेंड ऑफ झाल्यानंतर सुद्धा मी काही consignments despatch केल्यात. शेवटच्या सेकंदपर्यंत काम केल्याचं समाधानाने गिफ्टचे बॉक्सेस घेवून मी जड पावलांनी घरी आलो. अंतःकरण एकदम जड झाले होते. परंतु चेहऱ्यावरचे हावभाव लपत नव्हते. मी निवृत्त झालो होतो. त्या वेदना जाणवत होत्या. घरी आल्यावर माझा चेहरा उमलला. बायकोने माझे स्वागत केले. थोडक्यात मी आपल्या आयुष्यात कसं योगदान दिलं आणि कुटुंबाचा गाडा कसा ओढून आणला अशी गर्वाने माझी छाती फुगून गेली. स्वर्गातल्या अप्सरा तुमच्या मागेपुढे चवऱ्या ढाळतील अश्या थाटात मी घरातल्या त्या आजूबाजूला फुगे लावलेल्या छोटया खुर्चीवर विराजमान झालो, परंतु गरम हवेचं बाष्पीभवन व्हायला वेळ लागला नाही. आणि लक्षात आलं, एकशेविसच्या स्पीडने धावणारं एक धावतं कोळशाचं इंजिन पटरी वरून खाली उतरवून आपल्याला जमिनीवर सोडून दिलं आहे आणि गेले सर्वजण निघून आपल्या मार्गाला.

रिटायर होवून एक आठवडा झाला, पण बोलायला कोणी नाही, चक्क तोंडाला कुलूप लावल्या सारखं. देवाने तोंड,नाक, कान, जीभ हे काय फुलांसारखे मिटून घेण्यासारखे थोडे दिले आहेत आपल्याला. शेजारी पाजाऱ्यांचे दरवाजे बंद. पिन ड्रॉप सायलेन्स. बरं  आपल्या मिटलेल्या तोंडाच्या कुलुपाला कोणाचीच किल्ली लागत नाही. कारण प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त. दुसऱ्या दिवशी खुर्चीला बिलगलेल्या फुग्यातली हवा हळू निघायला सुरुवात झाली होती.  झुकू झुकू आगीन गाडी, धुराच्या रेषा हवेत काढी हे रेडियोवर लागलेलं गाणं बरंच माझ्या मनाची समजूत काढत होते. मन कासावीस होत होतं, नव्हे अगदी रबरसारखं ताणलं जात होतं आणि तुटता तुटत नव्हतं. कोणाला सांगता ही  येत नव्हतं. सांगितलं तर त्याचे निरनिराळे अर्थ लावले जातील अशी भीती वाटत होती. शांतपणे भिंतीवर शेपटी हलवत बसलेली पाल वाकुल्या दाखवत होती. त्या पालीवर झाडू घेऊन सुसाट तिच्यामागे पळत जावून दोन तीन फटकारे मारून आपला राग व्यक्त केला. पण झालं काय, झाडूचे दोन तुकडे तर झाले ! आणि पाल ही पळून गेली.

आपण जेष्ठ  नागरीक आहोत. हे आपल्याला शोभत नाही. काहीतरी केले पाहिजे आणि हा गुंता सोडविलाच पाहिजे. भिंत असली म्हणजे तिच्यावर पाल फिरणारच, भाजीपाल्याची पिशवी घरी घेवून येतांना रस्त्यावर मांजर आडवी जाणारच, कोणाच्या घरात दूध अजूनपर्यंत ओतू गेलं नाही ! हे सांगा बरं. मग मी त्यांच्या पेक्षा वेगळा कसा. आपले कोणी कौतुक करेल !  का बरं अशी अपेक्षा करावी. आपणच आपल्या मुलांचे, नातवांचे, नातीचे कौतुक केले पाहिजे. त्यांच्यात रमलं पाहिजे. त्यांचे हट्ट पूर्ण केले पाहिजेत.

ऐन उमेदीच्या काळात जे आयुष्य जगायचं राहून गेलं होतं आता ती जगायची संधी आपल्याला मिळाली आहे, ती संधी सोडता काम नये. आणि अचानक बालपणाची मोरपिसे डोळ्यासमोर तरळू लागलीत. निळ्या अभाळाचे आणि चांदण्या रात्रीचे सौंदर्य रात्री धाब्यावर झोपतांना न्याहाळावे. अनेक ऋतुतले निसर्गातले बदलते मुड्स अनुभवावेत. कधी कधी कठीण प्रसंगांना सामोरे जावे. औदुंबराच्या झाडावरून डोहात उडी मारलेली आठवावी. शेतावर चक्कर मारणे, गोफणीत दगडाचा खडा ठेवून उभ्या पिकात भिरकावणे, पळसाला पाने खरोखर तीन असतात का ते मोजून बघावेत. रात्री शेतावर राखण करण्यासाठी कंदीलाची वात मोठी करून काकांबरोबर रात्र घालवावी. रात्रीच्याला भुईमुगाच्या शेंगा भाजून रात्रभर चांदणं न्याहाळत बसावं. बैल गाडीवर बसून कापसाच्या गाठी घरी घेवून येणे, बैल पोळ्याला बैलांच्या शिंगांना बेगड चिटकविणे अश्या कितीतरी गोष्टी लहानपणी सुटून गेल्या होत्या. त्या आता प्रत्यक्ष करायला मिळतील. निवृत्तीनंतरच आयुष्य खरंच मजेशीर असतं. आनंद दायी असतं. जे जगलो नाही, ते आता जगायचं असतं भरभरून, अशी इच्छा मनात पाहिजे फक्त. मानवी जीवन विविध पैलूने नटलेले असते. या जीवनाला जेवढे पैलू पाडून जगाल तेवढे ते आकर्षक होवून खुलून दिसणार. पाण्यावरचं शेवाळ बाजूला करून तर बघा, स्वच्छ, नितळ, निर्मळ पाणी आत भरपूर आहे.