Thursday 12 January 2017

झेप - 2

ही एका देशभक्ताची तपस्या आहे. आपलं सर्व आयुष्य त्याने देशासाठी वाहून घेतलं. कोणीतरी म्हटले आहे की, आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो पण याचं भान आपल्याला कधीच  राहत नाही आणि वेळ निघून जाते, ती कोणासाठी थांबत नाही. पण वेळ निघून जायच्या अगोदरच तो या देशाला ऋण न फिटण्यासारखं बरच काही देऊन गेला. आणि एक मानवी मूल्याचा आदर्श ठेवून गेला. देश त्याचं नावं सुवर्ण अक्षरात कोरून ठेवेल. कोकीळ गातो, त्याचं गाणं कानावर पडतं, परंतु त्याचं दर्शन मात्र होत नाही. सुरच त्याच्या अस्तित्वाची खुण असते

लोकसत्ता वृत्तपत्र 2005 चं जीर्ण कात्रण मोरपीस म्हणून जपून ठेवलं होतं आणि जणू ते याच क्षणाचं वाट बघत होतं.

भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक डॉ.विक्रम साराभाई प्रयोग शाळेत फिरत असतांना, एका तरुणाजवळ आलेत. आणि त्याच्याशी झालेल्या चर्चेनंतर "अंतराळ संशोधनातील तिसऱ्या टप्प्याच्या संशोधन व विकासाचे काम" करण्यास त्याला सांगितले. त्यावेळेस जगात उपग्रहाच्या संदर्भातील पहिल्या टप्प्याचेच काम व्यवस्थित झाले होते. त्या तरुणाने प्रश्न केला. दुसरा टप्पा केवळ कागदोपत्रीच आहे. आणि तोही (दुसरा टप्पा) आपल्याला माहीत नाही. अश्या अवस्थेत तिसऱ्या टप्प्याचे काम मी कसे काय करणार ? त्यावर विक्रम सारभाईंनी उत्तर दिले. वैज्ञानीक तर्कट तुला माहीत आहे. गरज आहे ती "व्हिजन" ची ! त्याचा वापर कर, सारे काही सहज शक्य आहे.

त्यानानंतर त्या तरुणाने "व्हिजन" समोर ठेवून कामास सुरुवात केली. तब्बल दोन वर्षे अशीच निघून गेलीत. साराभाईनां त्या तरुणाला दिलेल्या कामाची आठवण आली. आणि साराभाई घाईगडबडीत प्रयोग शाळेत आलेत. त्यांनी त्या तरुणाकडे चौकशी केली. त्याने त्या तिसऱ्या टप्प्याचे डिझाईन केले होते. दुसऱ्या दिवशी येणाऱ्या कॅनडाच्या शिष्टमंडळासमोर त्यांनी त्याला ते सादरीकरण करण्यास सांगितले. ते म्हणाले ते सादरीकरण व डिझाईन त्यांना आवडल्यास आपण तो तिसरा टप्पा त्यांना विकू, व देशाला चांगले परकीय चलन मिळेल. त्यानंतर कॅनडाच्या शिष्टमंडळास तो तिसरा टप्पा विकण्यात आला.

त्यानंतर बऱ्याच वर्षांनी अमेरिकेने भारताला उपग्रह तंत्रज्ञानात तिसरा टप्पा देण्याचे नाकारले. पण देशाला काहीही फरक पडला नाही. कारण त्या तरुणाने तो तिसरा टप्पा केंव्हाच विकसित केला होता.

ही कहाणी इथेच थांबत नाही. तो तरुण देशाच्या राष्ट्रपती पदी विराजमान झाला. त्याचे नांव आहे - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.

कोणीतरी म्हटले आहे. आई मी असे काम करेन, की इतिहास माझ्यासाठी एक पान राखून ठेवेल. आणि खरं असंच घडलं. ढगांच्या फटीतून सतत येणारा सोनेरी सूर्यप्रकाश 27 जुलै 2015 या दिवशी कायमचा थांबला .
या देशभक्ताला सलाम.


No comments:

Post a Comment