Friday 20 January 2017

प्राजक्ताचा सडा

शिशिराची पानगळ संपून वसंताची पालवी फुटावी असा बहर तिच्या आयुष्यात प्रथमच आला होता. फुटलेल्या पालवीच्या कांतीत हिरवेपणा निपजेपर्यंत झाडं , त्या मुलायम कोवळेपणाला जीवापाड जपतात. त्याप्रमाणे ती आनंदाने हरणाच्या चंचल पाडसासारखी सारखी बागडत होती. खेळत होती. कधी बाबांच्या खांद्यावर तर कधी आईच्या मांडीवर. याहूनी ठावे काय तियेला. वृक्षाला पर्णभार सांभाळता सांभाळता त्या कळ्यांची फुले कधी झालीत आणि त्या पानांना हिरवेपणा कधी आला हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्या ऋतुबदलातलं ग्रीष्माचं होरपळून काढणारा दाह पेलण्यासाठीच कदाचित ईश्वराने ही परिपक्वता   निर्माण केली असावी. अंगणात भरगच्च प्राजक्ताचा सडा पडलेला होता.  फुले वेचिता वेचिता तिचा खांद्यावरचा पदर राहून राहून ढळत होता. आज पहिल्यांदाच ती साडी नेसली होती, साडीमधलं तिच्या चेहऱ्यावरचं निरागस सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. कारण तिला लग्नाची मागणी आली होती. नवरा मुलगा तिला आज बघण्यासाठी येणार होता. तिचा बारावीचा परिक्षेचा निकाल अजून यायचा बाकी होता. तिचं शिक्षण चालू होतं. नवऱ्या मुलांकडील मंडळीने तिच्या भावी शिक्षणाची काळजी घेतली जाईल असा भरोसा दिला होता. आपला भावी जोडीदाराबद्दलचे स्वप्नं तिने अजून बघितलंच नव्हतं. हे एवढ्या घाई गरबडीत घडले की, तिच्या भविष्याबद्दल विचारच न करताच सोळाव्या वर्षीच तिच्या बाबांनी तिचे हाथ पिवळे केलेत. लग्नानंतर तिचं शिक्षण झालंच नाही. घरातल्या रितीभाती, मानमरातब, चालीरीती समजून घेण्यासाठी तिला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होती. कारण तिच्या चेहऱ्यावर अजून कुवारपणाची लज्जत रेंगाळत होती.

प्राजक्ताचा सडा


कसे आहात हो बाबा

बरे आहात ना सर्व

आमचं आहे गं ठीक सगळं !

पण तू आहेस कशी

शब्द विणा बोले काही

गालावरच्या खळ्या

कोमेजल्या होत्या फुलासारख्या

तरी म्हणाली छान सुरुवात आहे !

वाटलं

तिला अशीच हलवावी गदगदा

प्राजक्ताच्या झाडासारखी

अन दडलेले अश्रू

ओंजळीत घ्यावेत फुलांसारखे !

No comments:

Post a Comment