Monday 9 January 2017

निखारा

ती  वेगळ्याच रसायनाची बनलेली होती. अफलातून एक व्यक्तिमत्व होतं. कोणापुढेही न नमणारं, सर्वांसाठी आणि कच्या बच्यांसाठी झटणारं. माझी आई. तिच्याबद्दल लिहावे बोलावे तेवढे थोडेच. धुळे जिल्ह्यातील तामसवाडी या खेडेगावांत तिचं बालपण खडतरच गेलं होतं. आपलं जीवन क्षणभंगुर आहे असं तिला कधीही वाटलं नाही. गरिबी ही तिच्या पाचवीला पुजलेली जणू. घरात कुणी नोकरीला नाही, दिड रुपया रोजाने शेतात  काम करून तीन लेकरांचा प्रपंच कसा चालविला असेल हे आतापर्यंत मला न उलगडलेलं कोडंच आहे. कोणापुढे हात पसरवायचं नाही, कष्ट करून जगण्याचं बाळकडू प्यालेली. करारी आणि जिद्दी स्वभावाची तितकीच ती प्रेमळ होती. आपल्या मुलगा शिकावा, मोठा ऑफिसर व्हावा अशी ती आपल्या गावांतील लोकांना जिद्दीने सांगत असे. तिने आपल्या कुटुंबावर कधीच आणि कोणत्याही प्रकारे आंच येऊ दिली नाही. तशी ती आपल्या कुटुंबाचं संरक्षक ढालच होती. तिचं पुरुषासारखं धाडस करण्याचं रूप आठवतंय. म्हणून तर जळता निखारा तळहातावर घेऊन भर दुपारी रण रणत्या उन्हात अनवाणी पायांनी कामासाठी हिंडण्याचं धाडस तिच्यात होतं. तिचं आयुष्य असच रखरखीत वाळवंटा सारखं, ते ही तिनं फुलविलं. तिचं आयुष्याचं मोजमाप मोजक्या शब्दात बांधणं अवघड आहे. तिने आपल्या मुलांसाठी आपल्या अन्न वश्र  निवारा या गरजाही मर्यादित ठेवल्या होत्या. आणि म्हणूनच तिने कमळाच्या द्रोणातून भरऊन आपल्या मुलाचं संगोपान केलं.  अखेर तिची जिद्द पूर्ण झाली. तिच्या कष्टाला पालवी फुटली. जेंव्हा जेंव्हा मी माझ्या गावी धामणगांवाला जातो तेंव्हा तेंव्हा तीचा मुलगा म्हणजे भागाबाईचा  मुलगा म्हणूनच माझी ओळख निर्माण होते.


जळता निखारा

ओल्या वाळूत
रूतलेलं शिपलं
तिनं उचललं
अन अलगद छातीशी धरलं
आयुष्यभर त्याला
तळहातावर फोडासारखं जपलं
कधी दगड कपारी होऊन
दिली झऱ्याला अलगद वाट
कधी मंद वारा होऊन
फुलाच्या कळीसंगें केली कुजबुज
पण कधी झाडाची साल
तर कधी बैलगाडीची आर
कधी गर्द झाडीतली पांढरी पाऊलवाट
दुथडी भरलेली जशी थंडीची लाट
वरुळातली सळसळती नागीण
तिच्या कुऱ्हाडीला तलवारीची पात
अशी डरकाळी वाघीण
कोण कशाला जाईल तिच्या
जबड्यात घालायला हाथ



No comments:

Post a Comment